बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट किंवा काही दिवसांपासून ओळखला जाणारा मिस्टर पॅशनेट अभिनेता आमिर खान नुकताच त्याच्या ऑनस्क्रिन मुलींसह करण जोहरच्या कार्यक्रमात आला होता. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो मध्ये आमिर फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्यासोबत आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये अनेकांनाच आमिरची नव्याने ओळख झाल्याचे म्हणावे लागेल. करणसोबत गप्पा मारताना आमिरने अनेक खुलासेही केले. पण या सर्वांमध्ये त्याच्या एका वक्तव्याने मात्र अनेकांचेच लक्ष वेधले.
आमिरच्या या वक्तव्यामुळे ‘बेफिक्रे’ फेम अभिनेता रणवीर सिंग आणि संजय लीला भन्साळींनी सुद्धा धक्काच बसू शकतो. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘रामलीला’ या चित्रपटातील ‘ततड-ततड’ हे गाणे आपण कधीच ऐकले नाहीये, असे आमिरने या कार्यक्रमात स्पष्ट केले. किंबहुना असे कोणते गाणे आहे हे सुद्धा आमिरला ठाऊक नसल्याचा खुलासा ‘कॉफी विथ करण’च्या या खास भागात झाला आहे. आमिरच्या या वक्तव्यामुळे रणवीरच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. आमिरला या कार्यक्रमादरम्यान ज्यावेळी एक प्रश्न करत ‘ततड-ततड’ या गाण्यावर नाचण्यास सांगितले तेव्हा ‘हे कोणते गाणे आहे?’ असा प्रश्न आमिरने केला.
आमिरने केलेला हा खुलासा पाहता त्याला गाणी व संगीताची आवड नसल्याचा अंदाजही सध्या वर्तविण्यात येत आहे. पण, असे असले तरीही आमिरच्या आवाजातील ‘धाकड’ हे गाणे सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. हरयाणवी भाषेचे वजन असणाऱ्या या गाण्याच्या खास व्हिडिओमध्ये आमिरने चक्क नृत्यही केले आहे. दरम्यान, अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. अवघ्या काही दिवसांवरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आल्यामुळे सध्या सर्वत्र ‘दंगल’संबंधीच्या चर्चा रंगत आहेत.
https://twitter.com/StarWorldIndia/status/810523118091411457
‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत सर्वांच्याच नजरेस पडत आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर, फातिमा सना शेख ही ‘गीता फोगट’च्या आणि सान्या मल्होत्रा ‘बबिता कुमारी’च्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.