बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी दीपिका पदुकोण सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत आगामी चित्रपटात स्क्रिन शेअर करणार असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शक पा. रंजीत याने दीपिका पदुकोण रजनीकांत यांच्या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या चित्रपटात रजनीकांतसोबत दीपिका पदुकोण झळकणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून जोर धरु लागल्या होत्या. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रंजीत याने त्याच्या आगामी चित्रपटाचा दीपिका पदुकोण चेहरा नसल्याचे स्पष्ट केले. रंजीतला ट्विटरवर एका नेटिझन्सने दीपिका आणि रजनीकांत एकत्र काम करणार आहेत का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना आगामी चित्रपटात रजनीकांत काम करणार आहेत. मात्र या चित्रपटात दीपिकाची भूमिका नसल्याचे तो म्हणाला. यापूर्वी रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने दिग्दर्शित केलेल्या ‘कोच्चदियान’ या चित्रपटात रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता.

‘कबाली’ चित्रपटाच्या यशानंतर पा. रंजीत रजनीकांत यांच्यासोबत आणखी एक चित्रपट करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे कथानक स्पष्ट नसताना चित्रपटातील नायिकेबाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. दीपिकाचे नाव चर्चेत येण्यापूर्वी रजनीकांत यांच्यासोबत राधिका आपटे दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, रंजीतच्या स्पष्टीकरणावरुन रजनीकांत यांच्या नायिकेचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे, असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाबद्दल बोलायचे तर चित्रपटाची निर्मिती धनुष करणार असून, चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. तर ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.