संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाचेच वारे सध्या प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीमध्ये वाहत आहेत. हा चित्रपट भव्यतेच्या परिभाषा बदलणार याची प्रेक्षकांना अपेक्षा होतीच. पण, भन्साळींनी चित्रपटातील वेशभूषेचीही परिभाषा बदलली आहे असे म्हणायला हरकत नाही. ‘पद्मावती’ ही भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली आहे. तिच्या देखण्या रूपामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे दागिने आणि पारंपरिकतेची झाक असलेल्या तिच्या वेशभूषेने. भन्साळींच्या या स्वप्नवत चित्रपटासाठी दीपिकाने जवळपास ३५ किलोंचा लेहंगा घातला होता. या लेहंग्यासोबत असलेल्या ओढणीचे वजन जवळपास चार किलो होते. त्यामुळे ऐतिहासिक पात्र साकारण्याचा भार पेलण्यासोबतच दीपिकाने वेशभूषेचा भारही चांगलाच पेलला.
वाचा : अबब! मालिकेसाठी ५०० कोटींचा खर्च
‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांच्या भरजरी आणि वजनदार कपड्यांवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ‘घुमर’ गाण्यात दीपिकाने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गाण्यात दीपिकाने घातलेला लेहंगा आणि दागिन्यांची किंमत तब्बल ३० लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे राणी पद्मिनीची भूमिका निभावणाऱ्या दीपिकाच्या या लूकची भुरळ सर्वांनाच पडली आहे.
ऐतिहासिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी भन्साळी हे नेहमीच नावाजले जातात. त्यांच्या चित्रपटांची भव्यता चित्रपटासाठी उभारण्यात आलेले सेट, कलाकारांसाठी डिझाइन करण्यात आलेले कपडे आणि दागिने यातून स्पष्ट दिसून येते. ‘पद्मावती’ चित्रपटही अशाच धाटणीतील असून, त्यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे कळते.
वाचा : आता करण जोहरच्या सिनेमात दिसणार विराट कोहली?
युट्यूबवर ‘घुमर’ गाण्याला आतापर्यंत दोन कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.