सुपरहिट चित्रपट आणि दीपिका पदुकोण हे एक सुंदर समीकरण होउन बसले आहे. सध्या बॉलीवुडची ‘लीला’ म्हणजेच दीपिका तिच्या हॉलिवुड पदार्पणासाठी व्यस्त असतानाच बॉलिवुडमध्येही काही चित्रपट तिच्या प्रतिक्षेत आहेत. ‘राम- लीला’, ‘बाजीराव – मस्तानी’ यांसारख्या चित्रपटांतून काम करत दीपिका, रणवीर आणि संजय लीला भन्साळींचे हे त्रिकुट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात प्रत्येक वेळी यशस्वी झाले आहे.
हेच यश अबाधित राखण्याचा मनसुबा ठेवत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह ‘पद्मावती’ हा नवीन चित्रपट साकारणार आहेत अशी सध्या चर्चा आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भन्साळींसोबतच यापूर्वी दोन सिनेमे करणाऱ्या दीपिकाने तिच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली आहे. ही बातमी भुवया उंचावणारी असली तरीही चित्रपटसृष्टीतीत यशाच्या अचूक मार्गावर असणाऱ्या दीपिकाची ही मागणी कितपत खरी आहे हे तिच जाणते. येणाऱ्या काळात ‘पद्मावती’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटात ऐतिहासिक काळाची पार्श्वभूमीचा आधार घेत संजय लीला भन्साळी अल्लाउद्दीन खिलजी आणि मेवाडची राणी पद्मावती यांच्याशी निगडीत कथानकावर चित्रण करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. एकिकडे मानधन वाढवून देण्याच्या मागणीमुळे चर्चेत आलेली दीपिका तुर्तास ‘xxx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारण्यात व्यस्त आहे. विन डिझेलसेबतचा तिचा बहुप्रतिक्षित असा हा ‘xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.