‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाला जल्लोषात सुरुवात झाली असून, यावेळी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘बिग बॉस’च्या मंचावर आली होती. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस १०’चा सूत्रसंचालक असून त्याने दीपिकाला एका स्पर्धकाच्या रुपातच ‘बिग बॉस’च्या मंचावर पाचारण केले होते. एका जबरदस्त परफॉर्मन्सद्वारे ‘बिग बॉस’च्या मंचावर एण्ट्री करणाऱ्या दीपिकासोबत सलमानने एक प्रश्न-उत्तराचा खेळदेखील खेळला. ‘बिग बॉस’च्या घरात तुला कोणाला पाठवायला आवडेल, असा प्रश्न सलमानने दीपिकाला विचारला. या यादीत दीपिकाने सर्वात प्रथम अभिनेता आमीर खानचे नाव घेतले. करण जोहर आणि संजय लिला भन्साळींमधून एकाची निवड करताना तिने संजय लिला भन्साळींना ‘बिग बॉस’च्या घरात पाठवणे ठिक राहिल, असे सांगितले. रणवीर सिंग आणि स्वत: दीपिकामधून कोणाला ‘बिग बॉस’च्या घरात जायला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर एक परफेक्ट एंटरटेनर असून, मी फारच बोरिंग असल्याने ‘बिग बॉस’च्या घरात रणवीर सिंगने जाणे उत्तम, असे ती म्हणाली. यानंतर ती ‘बिग बॉस’च्या घरात गेली, तिथे तिने थोडा वेळ घरातील स्पर्धकांसोबत घालवला. पुन्हा मंचावर येत xXx: Return Of Xander Cage या आपल्या हॉलिवूडपटाचा ट्रेलर तिने लाँच केला.
ट्रेलरच्या भारतीय आवृत्तीत दीपिकाचा जलवा पाहायला मिळतो. भारतात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये दीपिकाला केंद्रस्थानी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. याआधीच्या ट्रेलरमध्ये दीपिकाला फारसे दर्शविण्यात न आल्याने तिचे चाहते नाराज झाले होते. आता ती चूक सुधारण्यात आली असून, ट्रेलरमधील अनेक दृश्यांमध्ये दीपिकाचा जलवा पाहायला मिळतो. दीपिकाने कमालीची मेहनत घेतल्याचे ट्रेलर पाहून जाणवते. तिने साकारलेले अॅक्शन सिन्स, डॉयलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटातील तिचा लूक सर्वकाही लाजवाब. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दीपिकाने सेरेना नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आम्हाला तर वाटतं होतं की दीपिकाने हॉलिवूड चित्रपटात काम केलय. परंतु, इथे तर विन डिझेलनं हिंदी चित्रपटात काम केलय, असं म्हणत सलमानने त्याच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दीपिकाची थोडीशी गंमत केली.
ट्रेलर २
ट्रेलर १