दिल्ली शहराला सध्या धुरक्याने विळखा घातला आहे. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर दिल्लीत ये-जा करणारे सेलिब्रिटीही या परिस्थितीमुळे त्रासले आहेत. अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, वरुण धवन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनाच प्रदूषण आणि धुरक्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले.

वाढते वायू प्रदूषण आणि धुके यांचे मिश्रण असणाऱ्या धुरक्यामुळे हरयाणातील पिकांचेही नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत अभिनेता आयुषमान खुरानाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने धुरक्यामुळे दूषित होणारी हवा शुद्ध करण्यासाठी एक उपाय सुचवला. बीजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘स्मॉग कटर’ या यंत्राचा व्हिडिओ त्याने शेअर केला असून, सध्या सोशल मीडियावरही तो बराच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ‘स्मॉग कटर’ नावाचे हे अनोखे यंत्र नेमके कसे काम करते हेसुद्धा थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतातही अशा प्रकारची यंत्रणा लागू करण्याची मागणीसुद्धा अनेकांनी केली आहे.

वाचा : दिल्ली सर्वांची; पण दिल्लीचे कोण?

महानायक अमिताभ बच्चन यांनासुद्धा आयुषमानने सुचवलेला उपाय पटला असून, त्यांनीही या ‘स्मॉग कटर’विषयी कुतूहल व्यक्त केले. इतकेच नव्हे तर त्यांनीही भारतात अशा प्रकारची यंत्रणा लागू करण्यात यावी, असे मत मांडले आहे. सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ‘स्मॉग कटर’च्या व्हिडिओवर अभिनेत्री दिया मिर्झानेही आपले मत मांडले. ‘बिघडलेल्या गोष्टी सुधारण्याची क्षमता असण्याचा एक गुणविशेष मानवी स्वभावात आढळतो’, असे म्हणत तिने आयुषमानने केलेल्या ट्विटची लिंक सोबत जोडली आहे. दिल्लीतील हवेत धुरक्याचे वाढते प्रमाण पाहता सध्या अनेकांनाच ही परिस्थिती भेडसावत असून, स्थानिक प्रशासनाने त्याविषयी गांभीर्याने काही पाऊले उचलण्याची गरज असल्याचीही मागणी करण्यात येत आहे.