केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली. शिवाय बँकेमधून पैसे काढण्यावरही मर्यादा आली ज्याचा परिणाम विविध व्यापारावर आणि व्यवसायावर झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सर्वत्रच आर्थिक अडचणींचा आणि काटकसरीचा काळ सुरु झाला आहे. चलनबंदीमुळे एटीएम आणि बँकांमध्ये रांग लावून पैसे काढण्यात व्यग्र असलेले मुंबईकर काही प्रमाणात शॉपिंग सेंटर, नाट्यगृह आणि चित्रपटगृहांकडे पाठ वळवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही चित्रपटांचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून नाटकांचे प्रयोगही रद्द करण्यात आले आहेत. पण, असे असतानाही जर प्रेक्षकांनी नाटकाला उदंड प्रतिसाद दिला तर त्या कलाकारासाठी याहून मोठी कोणतीच गोष्ट नसणार. असाच काहीसा प्रतिसाद अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री गिरीजा ओक यांच्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाला मिळत आहे.
जितेंद्र आणि गिरीजा यांच्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाला आजवर रसिक प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. प्रेक्षक आणि मराठी कलाकार यांनीही या नाटकाची प्रशंसा केली होती. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांना काही प्रमाणात फटका बसत आहे. पण, या परिस्थितही ‘दोन स्पेशल’ नाटकाच्या एका प्रयोगाला नुकताच प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे समजतेय. पैशांची पर्वा न करता प्रेक्षकांनी नाटकाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे, हा प्रयोग काही महाराष्ट्रात झाला नाही. तर चक्क जबलपूर आणि भोपाल येथे झाला होता. या प्रयोगाला लोकांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे याकडे पाहता “तुटवडा नोटांचा असला तरी रसिकांचा नाही !” हे सिद्ध झाले आहे.
"तुटवडा नोटांचा असला तरी रसिकांचा नाही ! "दोन स्पेशल" च्या जबलपूर आणि भोपाळ येथील प्रयोगांना 'स्पेशल' रसिकप्रेक्षकांची स्पेशल गर्दी. pic.twitter.com/xC5C0DhuBu
— अथर्व थिएटर्स (@AtharvaTheatres) November 25, 2016
या चलनकल्लोळाचा एक फायदा मराठी नाटय़सृष्टीला मात्र झाला आहे, तो म्हणजे तिकिटविक्रीबाबत ऑनलाइन हा पर्याय निवडल्याने मराठी नाटक ‘स्मार्ट’ झाले आहे. मराठी नाटकांची तिकिटे ‘बुक माय शो’, तिकिट्स डॉट कॉम’ या संकेतस्थळांवरून प्रेक्षकांना या आधीही काढता येत होती. मात्र नाटय़निर्माते, नाटय़संस्था यांच्याकडून ही सोय उपलब्ध नव्हती. इतकेच नव्हे तर कोणत्याही नाटय़गृहावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेही नाटकाच्या प्रयोगाची तिकिटे विकत घेता येत नव्हती. मात्र चलनकल्लोळाचा फटका नाटकाच्या प्रयोगांना बसायला सुरुवात झाल्यानंतर काही नाटय़संस्था व निर्मात्यांनीही ऑनलाइन तिकिटविक्रीचा पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.