एखादी कल्पना एका दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला आवडली की त्याच्यावर चित्रपट निघायच्या आधीच बॉलिवूडमध्ये ती एखाद्या साथीच्या आजारासारखी वेगाने पसरते. आणि मग एकाच कथाकल्पनेवरचे निदान सहा-सात तरी चित्रपट प्रेक्षकांवर वर्षभराच्या आतच आदळतात. सध्या बॉलिवूडमध्ये वारे वाहतायत ते गुप्तहेरांचे. अगदी ब्योमकेश बक्षीपासून ते ‘पिंक पॅंथर’वाल्या स्टीव्ह मार्टिनपर्यंत अनेकविध कल्पनांवर आधारित गुप्तहेर आपल्याला पुढच्या वर्षी पहायला मिळणार आहेत.बॉलिवूडच्या या गुप्तहेरपटांच्या चर्चेला सुरुवात झाली तीच मुळी विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटामुळे. दिया मिर्झा निर्मित ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्या बालन गुप्तहेराची भूमिका करते आहे, या बातमीनेच अनेकांना चक्रावून सोडले होते. विद्याची उपस्थिती असल्यामुळेच की काय पण चित्रपटाच्या नावात जासूस हा शब्द असूनही त्यात हा गुप्तहेर तो आहे की ती हे क ळू नये म्हणून त्याचे नाव मुद्दाम ‘बॉबी’ असे ठेवण्यात आले. मात्र, बॉबी जासूसचे नाव जाहीर होताच अनुराग बसू कंपूत गदारोळ माजला कारण, त्यांच्याही चित्रपटाच्या नावात जासूस आहे. अनुराग बसू आणि रणबीर कपूर यांनी ‘पिक्चर शुरू’ या नव्या बॅनरखाली ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची निर्मिती सुरू केली आहे. रणबीर यात मुख्य भूमिकेत आहे.
बॉलिवूडच्या या गुप्तहेरपटांची सुरुवातही नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासूनच होणार आहे. अर्शद वारसी आणि सोहा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिस्टर जो. बी. काव्र्हालो’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. यात अर्शदची भूमिका ही ‘पिंक पॅंथर’वाल्या स्टीव्ह मार्टिनशी मिळतीजुळती असल्याचे समजते. याशिवाय, राजश्री प्रॉडक्शन या प्रेमपटांच्या जुन्याजाणत्या बॅनरनेही गुप्तहेरपटांमध्ये उडी घेतली आहे. ‘सम्राट अॅंड कंपनी’ या कविता बडजात्या निर्मित चित्रपटात राजीव खंडेलवाल गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री मदालसा शर्मा त्याच्याबरोबर आहे. याशिवाय, डीडीवर गाजलेल्या ‘ब्योमकेश बक्षी’ या गुप्तहेराची कथा आता मोठय़ा पडद्यावर उतरते आहे. दिबाकर बॅनर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून सुशांत सिंग राजपूत ‘ब्योमकेश’ रंगवणार आहे. आता या गुप्तहेरपटांच्या यादीत नव्याने भर पडली आहे ती राहूल बोस आणि अनुष्का शर्माची. झोया अख्तरच्या आगामी ‘जीने दो’ या चित्रपटात राहूल एका बंगाली गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे तर ‘एनएच १०’ या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अनुष्का शर्माही नवदीप सिंग दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटात हेरगिरी करणार असल्याचे समजते. पुढच्या वर्षभरात हे एक-दोन नव्हे जवळजवळ सात गुप्तहेरांच्या पडद्यावरची हेरगिरी बॉक्सऑफिसच्या आकडय़ांशी खेळताना दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2013 रोजी प्रकाशित
बॉलिवूडची ‘जासूसी..’
एखादी कल्पना एका दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला आवडली की त्याच्यावर चित्रपट निघायच्या आधीच बॉलिवूडमध्ये ती एखाद्या साथीच्या आजारासारखी वेगाने पसरते.
First published on: 06-12-2013 at 06:23 IST
TOPICSबॉबी जासूस
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detective movies in bollywood