मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनानं केलेल्या नव्या विधानांची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘मी शिवसेनेला मतदान केले आणि ते माझ्यासोबत असे वागत आहेत,’ असं तिने म्हटलं आहे. मात्र कंगनाचं नाव ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या मागील सत्य वेगळं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“युतीमुळे मला निवडणुकीत नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावं लागलं,” असं कंगना रणौतने एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं. ‘मी भाजपा समर्थक आहे आणि जेव्हा मी मतदान करण्यासाठी भाजपाचा पर्याय शोधत होते, तेव्हा मला शिवसेनेचं बटन दाबा असं सांगितलं गेलं.’ कंगनानं मतदानाविषयी केलेलं हे विधान खोटं असल्याचे निदर्शनास आलं आहे.

टाईम्स नाऊ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “जेव्हा मी वांद्रे येथे माझे मत देण्यासाठी गेले होते, तेव्हा वोटिंग मशिनमध्ये भाजपाचा पर्याय नसल्याने मला आश्चर्य वाटले, कारण मी भाजपा समर्थक आहे. पर्याय नसल्याने शिवसेनेला मत द्यावे. मला राजकारण समजत नाही. मला याचा अनुभव नाही. ही युती का झाली हे मला माहिती नाही, परंतु पर्याय नसल्याने मला शिवसेनेचं बटन दाबायला भाग पाडलं गेलं. कारण भाजपाचा पर्याय नव्हता. त्यांच्या युतीमुळे त्या भागासाठी फक्त शिवसेनेचाच उमेदवार होता. म्हणून मी त्यांना मत दिले आणि आणि ते माझ्याशी असं वागत आहे,’ असं कंगना म्हणाली. मात्र कंगनानं केलेलं हे विधान खोटं असल्याचे समोर आले आहे. दैनिक भास्करनं याविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीत कंगनानं वांद्रे पश्चिम आणि लोकसभा निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघामधून मतदान केलं होतं. २००९ ते २०१९ च्या काळात तीन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या निवडणुका शिवसेनेनं महायुतीमध्ये लढवल्या. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीतून बाहेर पडली होती. युती नसल्यामुळे अंतर्गत विधानसभेसाठी वांद्रे पश्चिम आणि लोकसभेसाठी मुंबई-मध्य जागा भाजपाकडे होत्या. त्यामुळे सहाही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार तिथे नव्हता. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान केलं हे विधान खोटं ठरतं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार समोरासमोर होते. अशा वेळी कंगनाला भाजपाचाही पर्याय होता. परंतु नाईलाजाने तिला शिवसेनेला मतदान करावे लागले, असं तिनं सांगितलं.

कंगनाने खार पश्चिम येथील बीपीएम शाळेत शिवसेनेच्या नेत्याला मतदान केले होते. त्यामुळे खोट्या बातम्या देणे बंद करा असे प्रतिउत्तर दिले आहे. मात्र २०१२च्या नंतर कंगना खार पश्चिममधील डीबी ऑर्किड ब्रिज या इमारतीत राहायला आली. या इमारतीचे बांधकाम २००८ मध्ये सुरू झाले आणि सदनिकेच्या मालकांना २०१२ मध्ये ताबा देण्यात आला. या इमारतीचा पत्ता कंगनाच्या मतदार ओळखपत्रावर आहे. त्यामुळे कंगना २०१२ नंतरच तिथे राहण्यास आली हे सिद्ध होते. खार पश्चिमचा हा परिसर वांद्रे पश्चिम विधानसभा आणि मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात येतो.

दरम्यान, शिवसेनेला मतदान केल्याचा दावा चुकीचा असल्याचं पत्रकार कमलेश सुतार यांनी लक्षात आणून दिलं. मात्र, कंगनानं त्यांना थेट कोर्टात खेचण्याची धमकी दिली. कंगनाच्या या धमकीनंतर त्यांनी आपण ट्रोल्स नसून, पत्रकार असल्याचं सांगत उत्तर दिलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did kangana really vote for shiv sena what is the truth abn
First published on: 18-09-2020 at 13:05 IST