बॉलीवूड चित्रपटांमध्ये अधूनमधून बडे बडे कलावंत असलेले ‘मल्टिस्टारर’ असे बिरुद मिरविणारे चित्रपट येत असतात. सिनेमाची आर्थिक गणिते सहज सुटावीत, प्रेक्षकांनाही एकदम सगळेच बडे कलावंत एकत्र पाहायला मिळावेत हा सरळ उद्देश त्यामागे असतो. गाजलेल्या दिग्दर्शिकेचा बहुचर्चित चित्रपट म्हणून ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाकडे पाहिले जात होते. परंतु, प्रत्यक्षात टीव्हीवरील दैनंदिन मालिकेचाच विस्तार प्रेक्षकाला पाहावा लागतो. अर्थात बॉलीवूड पद्धतीचे मनोरंजन, गाणी, धमाल, कलावंतांचा उत्तम अभिनय, तुर्कस्तानचे जहाजावरून दर्शन या सगळ्या गोष्टींमुळे हा मालिकेतील गोष्टींचाच विस्तार आहे हे पटकन लक्षात येत नाही. परंतु, लांबलचक मालिकांचा विस्तार असलेला जरुरीपेक्षा अधिकच लांबीचा हा चित्रपट प्रेक्षकांची किमान करमणुकीची अपेक्षा पूर्ण करीत असला तरी त्यापेक्षा अधिक काहीच करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूड आणि पंजाबी संस्कृती यांचे अतूट नाते आजपर्यंत असंख्य हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकाने पाहिले आहे. या चित्रपटातही उद्योग विश्वातील नामांकित असे मेहार हे पंजाबी कुटुंबीय आहेत. गर्भश्रीमंत मेहरा कुटुंबाचे प्रमुख कमल मेहरा दिल्लीच्या प्रतिष्ठित वर्तुळाचे अग्रणी असले तरी त्यांचा उद्योग दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. नीलम मेहरा आणि कमल मेहरा यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दिवाळखोरीतून बाहेर येण्याची क्लृप्ती म्हणून मेहरा कुटुंबीय आपल्या वर्तुळातील उद्योगपतींना सहकुटूंब तुर्कस्तानमधील जहाज सफरीवर घेऊन जातात. तिथे मेहरा कुटुंबातील प्रत्येकाचे आणि त्यांच्या वर्तुळातील लोकांचे खरे रूप उलगडत जाते.

अनिल कपूरने कमल मेहरा ही मध्यवर्ती भूमिका उत्तम साकारली असून पंजाबीच असल्यामुळे पंजाबी मानसिकता, एका कोटय़धीश उद्योगपतीची स्टाइल, लकबी, पेहराव यातून अनिल कपूरने अचूक सादर केले आहे. अनिल कपूरच्या मुलाच्या भूमिकेतील रणवीर सिंग, अनिल कपूरच्या मुलीच्या भूमिकेतील प्रियांका चोप्रा, रणवीर सिंगच्या प्रेयसीच्या भूमिकेतील अनुष्का शर्मा, फरहान अख्तर अशी सगळी आजची आघाडीची बडी कलावंत मंडळी असूनही अनिल कपूर अभिनयात आणि एकूणच पडद्यावरचा वावर यामध्ये या सगळ्यांपेक्षा सरस ठरतो. नीलम मेहरा या भूमिकेतून शेफाली शहाने आपल्या जबरदस्त अभिनयाची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. एका बडय़ा उद्योगपतीची पत्नी, नवऱ्याचा लोकांसमोर वागण्याचा चेहरा आणि खरा चेहरा पुरेपूर माहीत असण्याच्या अनेक छटा शेफाली शहाने आपल्या अभिनयातून अचूक पद्धतीने दाखविल्या आहेत.

संबंध चित्रपटात उच्चभ्रू लोकांचे तथाकथित आयुष्य आणि त्यातला खोटेपणा, दिखाऊपणा यांवर बोट ठेवण्याचा दिग्दर्शिकेने चांगला प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. मात्र हे दाखविताना चित्रपटाची लांबी इतकी वाढविण्याचा घाट घालण्यात आला आहे. सर्व पात्रांची ओळख करून देण्यासाठी श्वानाचा वापर हे नावीन्य चित्रपटात आहे. परंतु, प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख करून देण्यात घालविलेला वेळ यामुळे प्रेक्षक मध्यांतरापूर्वीच कंटाळतो. उच्चभ्रू, उच्चशिक्षित, गर्भश्रीमंत असलेल्या माणसांचे स्वभाववैचित्र्य आणि दांभिकपणा याबाबत कुटुंबसंस्था, संस्कृतीच्या अनुषंगाने भाष्य करण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शिकेने नक्कीच केला आहे. परंतु, चित्रपटाची अति लांबी आणि मालिकांमधील कथानकाचाच विस्तार असलेला हा चित्रपट करमणूक करीत असला तरी निराळा दृष्टिकोन मांडण्यात अयशस्वी ठरतो.

दिल धडकने दो

निर्माते – रितेश सिधवानी, फरहान अख्तर

दिग्दर्शक – झोया अख्तर

कथा-पटकथा – रीमा कागती, झोया अख्तर

संवाद – फरहान अख्तर, जावेद अख्तर

छायालेखक – कालरेस कॅटॅलन

संगीत – शंकर-एहसान-लॉय

संकलक – आनंद सुबाया, मनन मेहता

कलावंत – अनिल कपूर, शेफाली शहा, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा, राहुल बोस, झरिना वहाब, रिद्धिमा सूद, विक्रांत मासे, परमीत सेठी, पवन चोप्रा, शिरीष शर्मा व अन्य.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil dhadakne do movie review
First published on: 07-06-2015 at 02:20 IST