बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर कलाविश्वातील घराणेशाहीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कंगना रणौत, रवीना टंडन, प्रकाश राज, अभिनव कश्यप यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडमधल्या मक्तेदारीविरोधात आवाज उठवला. तर मराठी मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही आहे, मक्तेदारी चालते. पडद्यामागून ही सूत्रं हलवली जातात, असं रोखठोक मत निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडलंय. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी यावर भाष्य केलंय.

“इंडस्ट्रीत कोणी नवीन आलं असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम इथेही केलं जातं. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल तरी त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात,” अशी टीका त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, “मला अनेकांनी आव्हान दिलं होतं की तुला इंडस्ट्रीतून काढून टाकेन. मी माझ्या जिद्दीने टिकून आहे. ही लोकं मानसिक खच्चीकरण करतात. माझ्या चित्रपटांवरून अफवा उठवल्या गेल्या. मी असे अनेक राजकीय डाव हाणून पाडले आहेत. शेतकरी कुटुंबातून मी इथवर आलो. गॉडफादर नसतानाही पाय रोवून उभा आहे. ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचं कोणीच कधी कौतुक केलं नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी ही लोकं अनाथाश्रमात जातात, खोटंखोटं रडतात आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण प्रामाणिकपणे काम केलेल्यांचं कौतुक केलं जात नाही.”

“इंडस्ट्रीत फक्त २० टक्के लोकं चांगली आहेत. बाकी सगळी ग्रुपमध्ये वावरणारी आहेत. नको त्या चित्रपटांना पुरस्कार दिले जातात, त्यांचा उदोउदो केलं जातं. यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. नवीन आलेल्या कलाकारांना पाण्यात बघितले जातात. जसं हिंदीत चालतं तसंच इथेही चालतं. मैत्रीचं वातावरण फक्त दाखवण्यापुरतं आहे,” अशी टीका त्यांनी केली.