लहान मुलांच्या भोवतालचे असंख्य सामाजिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न आहेत. चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून हे विषय मोठ्या संख्येने येणं गरजेचं असतानाही तसे चित्रपट होत नाहीत. ‘निबार’ हा चित्रपट त्यामुळे महत्त्वाचा ठरतो. या चित्रपटात शाळाबाह्य मुलांची कथा केंद्रस्थानी आहे, मात्र मुळातच या समस्येला अनेक कारणांचे, शक्यतांचे, अडथळ्यांचे पदर आहेत. आणि या सगळ्याची किमान जाणीव होईल, अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी लेखक – दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी केली आहे.
या चित्रपटाच्या नावातच दिग्दर्शकाने आपला उद्देश बऱ्याच प्रमाणात स्पष्ट केला आहे. लहान मुलं ही शोषणाला चटकन बळी पडतात. जगण्याची भ्रांत असलेल्या समाजात तर कित्येकदा त्यांच्याकडून काम करून घेऊन रोजचा घास मिळवण्यासाठी त्यांना जन्माला घातले जाते. पैसा नाही म्हणून शिक्षण नाही, आई-वडिलांचे सहकार्य नाही, समाजातील सुजाण नागरिकांचे सहकार्य मिळेल अशीही आशा धरता येत नाही. कारण ही मुलं शिकली तर गावातली घाण कोण उचलणार? आमचे उकिरडे कोण साफ करणार? असा प्रश्न निर्लज्जपणे विचारला जातो.
सरकारने गावखेड्यातील मुलांनाही शिक्षण मिळावं म्हणून योजना आखल्या आहेत, देशपातळीवर सर्व शिक्षा अभियान मोठ्या गाजावाजात राबवले जाते. मात्र, खरोखरच शिक्षण व्यवस्थेत मोठमोठ्या पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते शाळेत येऊन खिचडीही करा, निवडणुकांची कामंही करा, सगळंच आपल्याला करावं लागतं या त्राग्यापोटी मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांपर्यंत किती जण खरोखरच शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेपर्यंत आणावं यासाठी प्रयत्न करण्यास उत्सुक असतात. आदर्श शिक्षक पुरस्कार जिंकलेले सगळेच शिक्षक मुलांसाठी झटून काम करणारे असतात असं नाही, याकडेही दिग्दर्शकाने या चित्रपटातून लक्ष वेधलं आहे.
एकूणच मुलांच्या आई-वडिलांपासून ते शिक्षण व्यवस्थेपर्यंत सगळ्यांच्याच मनात त्यांच्या शिक्षणाविषयी असलेली अनास्था, त्यांच्या भल्या-बुऱ्याविषयी काडीचीही जाणीव न बाळगणाऱ्या या सगळ्यांच्या निगरगटट्पणात अनेक कोवळी स्वप्नं कशी करपून जात आहेत, याचं चित्रण ‘निबार’मध्ये पाहायला मिळतं.
कोल्हापूरमधल्या एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत नव्याने नियुक्ती झालेल्या तरुण मुख्याध्यापकाच्या शाळा प्रवेशापासून चित्रपटाची सुरुवात होते. अभिनेता शशांक केतकर याने तरुण मुख्याध्यापक किरण शिंदे याची भूमिका केली आहे. तरुण असल्याने देश बदलण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुख्याध्यापकाला आजूबाजूला भीक मागणाऱ्या, परिस्थितीमुळे शाळा सोडायला लागलेल्या मुलांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे. त्यासाठी शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या अनुभवी जाधव सरांकडून निश्चित मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा किरणच्या मनात असते. अगदी पहिल्या भेटीत मुख्याध्यापकाच्या मनातील सळसळणाऱ्या तरुण विचारांची जाणीव झालेले जाधव सर होता होईता या उत्साहाला आवर घालण्याविषयी त्यांना सूचक इशारे देतात. मात्र, किरण आपला ध्यास सोडत नाही. गावात एसटी स्थानकाच्या परिसरात रस्त्यावर उत्तम चित्रं काढून वा भीक मागून लोकांकडून पैसे मिळवणाऱ्या रम्या, गुंड्या, सगुणा, बाळ्या या भावंडांची आणि अन्य मुलांशी किरणची ओळख होते. रम्याने शाळेचं तोंडही पाहिलेलं नसलं तरी तो उत्तम चित्रं काढतो, शाळेत शिकणाऱ्या मुलांपेक्षाही चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलतो, हे पाहून किरण रम्याला आणि त्याच्या भावंडांना शाळेत येण्यासाठी आग्रह धरतो. मात्र, भीक मागून घरी पैसे दिले नाही तर अमानुषपणे मारणारा बाप आपल्याला कधीही शाळेत जाऊ देणार नाही, याची मुलांना खात्री आहे. तरीही किरण आपल्या परीने प्रयत्न करत राहतो. मुलांच्या आई-बापांना समजावण्यापासून ते शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात खेटे घालून सगळ्या पद्धतीने या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी तो प्रयत्न करत राहतो. पण या सगळ्यांच्याच मनातला निबारपणा, त्यांची निगरगट्ट झालेली मनं किरणच्या प्रयत्नांना दरवेळी सुरुंग लावतात. या सगळ्या खटाटोपात खरंच मुलं शाळेपर्यंत पोहोचतात का? शिक्षण घेण्याची, मौजमजा करण्याची बालसुलभ इच्छा आणि वाट्याला आलेलं प्राक्तन या कोंडमाऱ्यातून मुलांची सुटका होते का? या प्रश्नांची उत्तरं सांगतानाच वास्तवाचे सगळे पैलू प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी केला आहे.
‘निबार’ चित्रपटाची मांडणी साधी-सरळ आहे. कुठलीही कलात्मकता त्यात नाही, फार नाट्यमय वळणं नाहीत. मात्र, या मुलांच्या जगण्यातली असहायता आणि एकूणच स्वमग्न असलेल्या समाजाचा दृष्टिकोन, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थांमुळे होणारी त्यांची परवड याविषयी केलेलं स्पष्ट भाष्य यामुळे नाही म्हटलं तरी चित्रपट दखल घ्यायला लावतो. शशांक केतकर, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, सायली संजीव, अरुण नलावडे अशा नावाजलेल्या नव्या-जुन्या कलाकारांबरोबरच बालकलाकारांनीही केलेला उत्तम अभिनय यामुळे चित्रपट जोर पकडतो. उत्तम कथाविषय असलेला चित्रपट प्रभावी मांडणी आणि तंत्राचं साहाय्य लाभलं असतं तर अधिक उठावदार झाला असता, यात शंका नाही. तरीही चित्रपटाचा विषय लक्षात घेत केलेल्या प्रामाणिक मांडणीमुळे ‘निबार’कडे दुर्लक्ष करता येत नाही.
निबार
दिग्दर्शक – सुनील शिंदे
कलाकार – शशांक केतकर, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, सायली संजीव, अरुण नलावडे, आज्ञेश मुडशिंगकर, सक्षम कांबळे, सुमीत सुतार, प्रनवी पाटील, मीनल डिसोझा.