बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच ठिकाणी त्याचं आज निधन झालं. अभिनेता अनुपम खेर यांनी टी रामा राव यांच्या कुटुंबीयांकडून जारी करण्यात आलेलं स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली.

अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून टी रामा राव यांच्या निधनानंतर एक ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दुःख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचं सौभाग्य लाभलं. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी रामा राव यांनी १९६६ ते २००० या कालावधीत बऱ्याच हिंदी आणि तेलुगू चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांनी १९५०च्या अखेरीस त्यांचे चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत आपल्या करिअरची सुरुवात केली. जयाप्रदा यांच्यासोबत १९७७ मध्ये त्यांनी दिग्दर्शक केलेला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘यमगोला’ त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याशिवाय ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचानी कपूरम’ हे त्यांचे गाजलेले तेलुगू चित्रपट आहेत. तर हिंदीमध्येही त्यांनी अंधा कानून’, ‘एक ही भूल’, ‘मुझे इंसाफ चाहिए’ आणि ‘नाचे मयूरी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले.