मुंबई : चित्रपटाला भाषेचे बंधन नसते. उत्तम कथा, सशक्त अभिनयाबरोबरच चित्रभाषा उठावदार असेल तर त्याची परिणामकारकता अधिक वाढते. हिंदी किंवा अन्य भाषिक मोठ्या चित्रपटांची चित्रभाषा, दृश्यपरिणाम प्रभावी व्हावे, यासाठी छायांकन तंत्राबरोबरच रंगांकन (कलरिंग) अचूक करण्यावर भर दिला जातो. सध्या कथा, अभिनय आणि चित्रण या तिन्ही बाबतीत लक्ष वेधून घेतलेल्या ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाचे रंगांकन करण्यासाठी नेटफ्लिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या इजिप्शियन रंगकाराची (कलरिस्ट) मदत घेण्यात आली आहे. मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच विषयाच्या अनुषंगाने त्याचा दृश्यप्रभावही उठावदार करण्याचे आव्हान रंगांकन क्षेत्रात निष्णात असलेल्या परदेशी कलाकाराने पेलले आहे.
सुबोध खानोलकर लिखित – दिग्दर्शित, झी स्टुडिओ प्रस्तुत ‘दशावतार’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात ‘दशावतार’ ही कोकणातील पारंपरिक लोककला आणि वर्षानुवर्ष दशावतार करणाऱ्या कलाकाराची कथा केंद्रस्थानी आहे. ‘या चित्रपटाची बरीचशी कथा ही जंगलात घडते. आजवर प्रेक्षकांनी कोकण म्हणजे निळाशार समुद्र आणि टुमदार दिसणारी कौलारू घरे हे चित्र अनुभवले आहे. मात्र, कोकणातील सदा बहरलेल्या, हिरव्यागार घनदाट जंगलाचे चित्रण आजवर फारसे झालेले नाही. कोकणात मोकळे पठार आणि त्यावरचे जंगल हा प्रकार नाही. तिथल्या जंगलांमध्ये चढउताराचा भाग आहे. त्यामुळे अशा जंगलात चित्रीकरण करणे आणि ते जंगल जसे आहे तसा दृश्यानुभव प्रेक्षकांना देणे हे खचितच सोपे नव्हते.
‘दशावतार’सारख्या भव्य कथापट असलेल्या चित्रपटात कथेच्या अनुषंगाने त्याचे प्रभावी चित्रण असले पाहिजे हा आमचा आग्रह होता आणि त्यासाठी छायांकनाबरोबरच रंगांकनावरही अधिक मेहनत घेतली’ अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी दिली.
चित्रपटाचे छायाचित्रणकार देवेंद्र गोलतकर आणि त्यांच्या चमूने खूप मेहनत घेत केलेले चित्रण तितकेच प्रभावी दिसायला हवे, यासाठी उत्तम रंगकाराचा शोध सुरू झाला आणि नेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या इंग्रजी वा अन्य भाषिक चित्रपटांसाठी काम करणाऱ्या हॅनी हलीम या इजिप्शियन कलाकाराशी ओळख झाल्याचे सुबोध यांनी सांगितले.
‘दशावतार’चे चित्रण पाहिल्यानंतर मला भाषा कळत नाही, मात्र याचे दृश्यचित्रण अत्यंत प्रभावी असून त्या जोरावर जगभरात हा चित्रपट दाखवला जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत हॅनी हलीम यांनी चित्रपटाच्या रंगांकनाची धुरा खांद्यावर घेतली. मराठीत पहिल्यांदाच रंगाकन क्षेत्रात नावाजलेल्या इजिप्शियन रंगकाराकडून काम करून घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यासाठी प्रचंड खर्च येतो, मात्र ‘दशावतार’सारख्या भव्य कथापट असलेल्या चित्रपटासाठी हे गरजेचे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. हॅनी हलीम यांच्या ‘न्यूब सिरस’ या स्टुडिओने ‘दशावतार’चे रंगांकन केले आहे.
हा विलक्षण चित्रपट हॅनी हलिम
मी जगभरातील विविध चित्रपटांवर, वेबमालिकांवर काम केलेले आहे, मात्र ‘दशावतार’ हा चित्रपट विलक्षण अनुभव आहे. भाषा कळत नव्हती, तरीही या चित्रपटाची एकेक दृश्यचौकट पाहताना मला चित्रपट उलगडत गेला. या चित्रपटाचा छायाचित्रणकार देवेंद्रबरोबर काम करताना एकेक गोष्ट लक्षात आली. कोकणातल्या जंगलात आणि तेही रात्रीच्या वेळी कथेचे चित्रण केलेले आहे. प्रेक्षकांना रात्रीच्या जंगलाचा अनुभव द्यायचा होता. त्यांना पाहताना अगदी अंधारात चित्रपट पाहतो आहे असेही वाटता कामा नये आणि कृत्रिम प्रकाशही दिसता कामा नये. दिवसा जंगलाची हिरवाई आणि रात्री तेच अंधारात गुडूप होणारे जंगल हा दृश्यानुभव अतिशय नैसर्गिक दिसणे हे एक आव्हान होते. शिवाय, दशावतार ही रंगमंचीय कला, तिथेही अनेक रंग आहेत. जंगलात आगीचीही दृश्ये आहेत, आगीचा लोकांच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश अशा बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन हे रंगांकन करण्यात आले आहे. मला स्वत:ला या चित्रपटाचा भाग होता आले, याचा आनंद वाटतो. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत तोकड्या निर्मिती खर्चात मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत इतका भव्य चित्रपट केला जातो, हे पाहून मी थक्क झालो. वैश्विक स्तरावरील प्रेक्षकांनी अनुभव घ्यावा, असे चित्रपट बनवण्याची ताकद मराठी चित्रपटांनी कमावलेली आहे.