रवींद्र पाथरे

‘कुर्र्र्र्र…..’

How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही

काय कळलं? नाही कळलं ना? कुणालाच कळणं शक्य नाही. नाटक बघायला जाताना आपण नेमकं कसलं नाटक बघायला चाललोय, काही कळत नाही. कलाकारांच्या नावांमुळे थोडाफार अंदाज बांधता येतो खरा.. पण तो तेवढाच!

तुम्ही नाटक पाहायला बसलात की मात्र लक्षात येतं : हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे! अर्थात त्यासाठी मुळात आधी तुम्ही नाटकाला जायला हवं! असो. अशा काहीशा संभ्रमित मन:स्थितीत प्रेक्षक नाटकाला येतो. ..आणि सुरुवातीच्या काही क्षणांतच तुमच्या लक्षात येतं, की हे नाटक मूल न होणाऱ्या अक्षर आणि पूजा या तरुण जोडप्याबद्दलचं आहे. म्हणजे ते गंभीर वळणानंच जाणार! तुम्ही मग मनाची तयारी करून सरसावून बसता. पण प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. मूल व्हावं म्हणून या जोडप्याचे डॉक्टरी उपाय सुरू असतात. ‘फर्टिलिटी पीरियड’ वगैरे चर्चाही होताना दिसते. मात्र त्यांच्या नाना प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. त्यातून अपत्याकरता आसुसलेली पूजा आता नैराश्यात जाणार की काय असं वाटत असतानाच तिची आई कुणा बुवा-बाबाकडून यावर ‘तोडगा’ काढायचा विचार करते. आता नाटक अंधश्रद्धेकडे झुकणार की काय अशी आशंका तुमच्या मनात येते. ..अशात एके दिवशी कुणी एक साधू अक्षर आणि पूजाच्या घरात जबरदस्ती घुसतो. पूजा चिडून त्याला हाकलूनच देण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढय़ात तो साधू खुलासा करतो, की ते तिचे २५ वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेले वडील आहेत! त्यांनी हिमालयातील साधूंकडून नाना व्याधींवरील जडीबुटींचं ज्ञान प्राप्त केलेलं असतं. पूजाच्या अपत्यहीनतेवरही त्यांच्याकडे इलाज असल्याचं ते आत्मविश्वासानं सांगतात. ते तिला जडीबुटी देतात.

परंतु..

एक गडबड होते : पूजाबरोबर तिची आईसुद्धा गर्भवती राहते! हे काय आक्रित घडलं? या वयात पूजाची आईही प्रेग्नंट राहावी? तीही जडीबुटीने? की ..?हे कसं घडलं? का घडलं? आता पुढे काय होणार? हे प्रत्यक्ष नाटकातच पाहणं उचित ठरेल.  लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी हा गंभीर विषय छान हसत-खेळत, मधेच गंभीर होत मांडला आहे. विषयातलं गांभीर्य ढळू न देता मूल नसण्याचा हा विषय विनोदी ढंगाने हाताळणं ही तशी तारेवरची कसरतच! पण खांडेकर यांना ती लीलया जमली आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी गरोदर असण्याचा काळ खरं तर आता  इतिहासजमा झाला आहे. आजच्या पिढीला तर ते माहीत असणंही शक्य नाही. त्यामुळे आजच्या काळात आई आणि मुलगी एकाच वेळी गरोदर असण्याची सिच्युएशन कशी हाताळली जाईल, हे मोठे कोडंच आहे. शिवाय आता समाज काय म्हणेल, हा कळीचा मुद्दाही आहेच. याचा अर्थ आजच्या समाजात असं काही घडत नाही असं बिलकूलच नाहीए. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांची दुसरी, तिसरी लग्नं पहिल्या पत्नीची मुलं लग्नाळू वयात आलेली असताना होताना आपण पाहतोच आहोत. आणि त्यांच्या दुसरेपणाच्या बायकांना मुलंही झालेली आपण बघतो. अपवाद म्हणून ही गोष्ट आपण आज स्वीकारत असलो तरी त्याचे लोण समाजात पुढे पसरणारच नाहीत असं नाही. त्यामुळे यापुढच्या काळात अशी सिच्युएशन सार्वत्रिक झालेली बघायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये. ‘तिशीतली विवाहित स्त्री शाळकरी मुलाबरोबर पळून गेली..’ वगैरे बातम्या हल्ली आपल्या वाचनात येत असतातच. तेव्हा नाटकातली ही सिच्युएशन अपवादात्मक म्हणून सोडून देता येणार नाही. असो.

आता अशा सिच्युएशनमधून मार्ग काय?

..प्राप्त परिस्थिती स्वीकारणं! लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनाही हेच म्हणायचं आहे. यासाठीच त्यांनी ‘कुर्र्र्र्र’चा घाट घातलाय. पूजा आणि तिची आई दोघीही एकाच वेळी गरोदर राहिलेल्या. अशावेळी लोकलज्जेस्तव आईचा गर्भपात करायचा तर तीही वेळ निघून गेलेली. आईच्या दृष्टीनेही ही शरमेचीच बाब. वडीलही हवालदिल झालेले! मुलीसाठी तर ही महाभयंकरच ऑकवर्ड स्थिती. शेवटी जावई अक्षरच यातून मार्ग काढतो : दोघींचीही बाळंतपणं होऊ द्यायची! समाजबिमाज गेला खड्डय़ात! मग अर्थात येणाऱ्या परिस्थितीस सामोरं जाणं ओघानं आलंच!

ते चौघं या परिस्थितीला कसं सामोरे जातात, त्याचंच हे नाटक.. ‘कुर्र्र्र्र’! लेखक प्रसाद खांडेकरांनी ही परिस्थिती अतिशय संवेदनशीलतेनं हाताळली आहे.  गंभीर विषय.. पण त्याची हाताळणी मात्र विनोदी. त्यामुळे निसरडय़ा जागा भरपूर. पण त्यांनी हा तोल व्यवस्थित सांभाळलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन तर करायचं, पण विषयाचं गांभीर्यही राखायचं.. दोन्ही त्यांनी छान जमवलंय. आपण समाजाला कितीही फाटय़ावर मारायचं ठरवलं तरी मानवी भावभावना कुणाला चुकल्यात? नको त्या वयात आलेलं गर्भारपण, त्याबद्दल वाटणारी शरम, समाज काय म्हणेल, मुलगी आणि जावयाला कसं सामोरं जायचं, करूनसावरून नामानिराळ्या झालेल्या नवऱ्याबद्दलची तीव्रतेनं वाटणारी चीड आणि त्याचवेळी २५ वर्षांनी पुनश्च मातृत्वाचा आनंद अनुभवताना घेताना झालेली विचित्र मन:स्थिती.. अशा संमिश्र भावभावनांच्या कल्लोळाचा आलेख एकीकडे.. तसंच कुटुंबातील प्रत्येकाच्या नात्याच्या कोनानुसार त्याची या अवकाळी गर्भारपणाकडे पाहण्याची दृष्टीही वेगवेगळी. अशा अनेकानेक कंगोऱ्यांचं हे नाटक. विनोदी हाताळणीपायी या भावकल्लोळांकडे दुर्लक्ष करणंही अक्षम्यच.

दिग्दर्शक म्हणून लेखकाच्या हेतूंशी, त्याच्या विचारांशी प्रामाणिक राहणं आलंच. स्वत:च लेखक-दिग्दर्शक असल्याने प्रसाद खांडेकर यांना ते अवघड गेलं नाही. विषयाच्या गांभीर्यास छेद न देता त्यांनी त्यास मनोरंजनाची मस्त फोडणी दिली आहे. परिणामत: नाटक कधी भावनात्मक होतं, तर कधी विनोदाच्या हास्यकल्लोळात बुडवून टाकतं. पात्रानुरूप त्याची त्याची मानसिकता दिग्दर्शकानं अचूक टिपली आहे. काही वेळा पात्रांना ढिल सोडून हशांचे फवारे फुटताना दिसतात, तर कधी भावविभोर क्षण प्रेक्षकांना अंतर्मुखही करतात. अगदी बाबा झालेल्या पॅडी कांबळे यांनीही गांभीर्याचा हा पोत आवश्यक त्या ठिकाणी नीट सांभाळलाय. ही अर्थात सारी दिग्दर्शकाची किमया. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य, अमीर हडकरांचं संगीत, अमोघ फडकेंची प्रकाशयोजना, उलेश खंदारे यांची रंगभूषा आणि कलार्चना- अर्चना ठावरे-शहांची वेशभूषा नाटकाची मागणी पुरवतात.

कलाकारांची जमून आलेली भट्टी ही या नाटकाच्या यशाची मोठीच बाजू. विशाखा सुभेदार या गुणी अभिनेत्रीने नको त्या वयात, जावयाच्या घरात आलेलं गर्भारपण आणि त्यापायी झालेली विलक्षण कुचंबणा अत्यंत उत्कटतेनं व्यक्त केलीय. आपल्या गर्भारपणापेक्षा पहिलटकरीण मुलीचं सगळं साग्रसंगीत साजरं करण्याची तिची असोशी न बोलताही खूप काही सांगून जाते. विनोदी अभिनय तर त्यांच्या रक्तात आहेच. त्यामुळे त्यात त्यांनी सहजी बाजी मारली तर त्यात विशेष नाही. ते तर त्या लीलया पेलतात. पॅडी कांबळेंनी अर्कचित्रात्मक शैलीचा आधार घेत साकारलेले बाबा प्रसंगी गंभीरतेनं व्यक्त होतात. नम्रता आवटे-संभेराव यांनी पूजाच्या भूमिकेतील हिंदोळे, त्यातलं अलवारपण, उत्स्फूर्तता आणि लोभसपण नेमकेपणानं पोहोचवलंय. गर्भवती तरुणीच्या भावनांचे हेलकावे त्यांनी समूर्त केलेत. प्रसाद खांडेकर यांनी लेखक-दिग्दर्शक या नात्याने नाटकाचा तोल सांभाळताना अक्षरच्या भूमिकेतही आपली छाप सोडली आहे. क्षणात गंभीर, तर क्षणात ‘हॅपी गो लकी’ छापाचा अक्षर त्यांनी उत्तम वठवलाय. एकुणात, करोनाकाळाने मनावर आलेलं मळभ घालवायचं असेल तर ‘कुर्र्र्र्र’ला जायलाच हवं.