रंगभूमी म्हणजे एक वेगळंच जग. इथे एकदा का चेहऱ्याला रंग लागला की तो माणूस स्वतःचा राहत नाही. तो समोर बसलेल्या रसिकांचा होऊन जातो. रंगभूमीची झिंग एकदा का चढली की ती आजन्म त्या व्यक्तीसोबतच असते. रंगभूमीच्या जगात तुम्ही विविध अनुभव घेत समृद्ध होत असता. अशा या रंगभूमीविषयीचे कलाकारांचे अनुभव आपण या सदरातून अनुभवले. आतापर्यंत अनेकांनी आपल्या कष्टाने आणि एकनिष्ठेने मराठी रंगभूमी गाजवली. जेवढं नितातं प्रेम कलाकारांनी या रंगभूमीवर केलं, तेवढंच प्रेम रंगभूमीनेही त्यांना दिलं. अनेक वर्षांनंतर ‘एकच प्याला?’ या नाटकातून रसिकांच्या भेटीला आलेला अभिनेता सुशांत शेलारने त्याचे रंगभूमीवरचे अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे शेअर केले.
माझ्यासाठी रंगभूमी म्हणजे माझा आत्माच आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासून मी रंगभूमीशी जोडलो गेलोय. खरेतर ‘देखणी बायको दुसऱ्याची’ हे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक. गेल्या अनेक वर्षांपासून एखादं नाटक करावं अशी फार इच्छा होती पण तसं नाटक मिळालं नाही, चांगल्या नाटकांसाठी विचारणाही व्हायला हवी तेही झालं नाही. खरेतर या सगळ्या गोष्टींचा योग जुळून यावा लागतो. ‘एकच प्याला?’ या नाटकातून हा योग जुळून आला आणि मी हे नाटक घेऊन प्रेक्षकांसमोर आलो.
रंगभूमीवर काम करणं हे जिवंत असण्याची निशाणी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करणं, तिथले प्रेक्षक वेगळे, त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या या सगळ्यातून एक कलाकार म्हणून तुम्ही घडत जातात. प्रयोगावेळची प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेची साक्ष देऊन जाते. एका ठिकाणी झालेला प्रयोग जसाच्या तसा दुसऱ्या ठिकाणी होतोच असं नाही. प्रत्येक वेळा त्यात काही ना काही बदल होतच असतो. रंगभूमीची ओळखच ती आहे की ती तुम्हाला सतत नवीन शिकण्याची संधी देते, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी देते. एक कलाकार म्हणून जीवंतपणा अनुभवायला मिळणं फार आवश्यक आहे.
आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं ‘एकच प्याला?’ हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याला नाही बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. सध्याची बोली भाषा आणि तेव्हाची भाषा यात फार फरक आहे. एक कलावंत म्हणून सध्याच्या परिस्थितीत एवढी शुद्ध भाषा बोलायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. सध्या मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्येही शुद्ध भाषेचा उपयोग केला जात नाही. या नाटकातले संवादच इतके सुंदर आहेत की ते समजून घेऊन प्रेक्षकांसमोर सादर करणं यात वेगळीच मजा आहे.
आपल्याला नाटकात काम करणं कितीही आवडणारं असलं तरी त्यासाठी पॅशनची फार आवश्यकता असते. इथे सगळेच येत नाहीत आणि आलेले सगळेच टिकतात असं नाही. कोणत्याही साधनेसारखी रंगभूमीहीसुद्धा एक साधना आहे. मुळात नाटकात काम करण्याची इच्छा शक्ती हवी. नाटकाच्या तालमीसाठी द्यावा लागणारा वेळ, त्याचे दौरे ही सर्व तारेवरची कसरत आहे. नाटकामुळे तुम्ही समृद्ध होत असला तरी जे बाहेरगावावरुन नोकरी निमित्त इथे येतात त्यांना पोटापाण्याचाही विचार करावा लागतो. मालिका करणाऱ्यांना प्रत्येकवेळी नाटकांसाठी वेळ द्यायला जमतोच असे नाही. अनेकांची नाटकात काम करण्याची इच्छाही असते. पण इतर काही अडचणींमुळे ते करु शकत नाही. म्हणूनच रंगभूमीवर काम करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ती तुम्हाला सर्व बाजूने तावून सुलाखून काढते. त्यातून तुम्ही निभावून नेलं तर मग तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.
मला माझ्या लहानपणीचा एक अनुभव लख्ख आठवतो. ‘देखणी बायको दुसऱ्याची’ या नाटकाचा एकदा गोव्यात दौरा होता. तेव्हा मी १२-१३ वर्षांचा असेन. रात्रीचा प्रयोग झाल्यावर प्रेक्षक जसे कलाकारांना भेटायला येतात तसे एक आजोबा मला भेटायला आले आणि माझ्या कामाचं कौतुक केलं. पण ते आजोबा माझं कौतुक करुन थांबले नाही तर त्यांनी मला २ रुपयांची नोट बक्षीस म्हणूनही दिले. रात्रीचा प्रयोग असल्यामुळे आम्ही जास्त पैसे आणले नव्हते. पण तुला काही तरी द्यावसं वाटलं म्हणून हे २ रुपये घे. त्यांना कदाचित आपण फक्त २ रुपये देतोय अशी खंत होती पण माझ्यासाठी तो एक अमुल्य ठेवा आहे. जेव्हा थोरा मोठ्यांकडून आपल्या कामाचं कौतुक होतं तेव्हाचे ते अनूभव शब्दात मांडण्यासारखे नसतात. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकासाठी मिळालेलं ते बक्षिस मी आजही विसरु शकलो नाही.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com