अनेकदा एखाद्या व्यक्तीबद्दल सांगताना त्यांची थोडी ओळख द्यावी लागते. पण या रचनेलाही त्या व्यक्तीच्या नावानेच छेद दिला जातो. एखाद्या कलाकाराचं फक्त नाव जरी घेतलं तरी पुरेसं असतं. आज ‘कथा पडद्यामागची’मध्ये असंच एक नाव आपले रंगभूमीवरचे अनुभव सांगणार आहे. हे नाव म्हणजे अभिनेते विजय पाटकर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकमध्ये तुम्ही कितीही कुस्ती खेळली तरी मातीच्या आखाड्यात जी कुस्ती शिकवली जाते तीच खरी कुस्ती. रंगभूमीच्या बाबतीतही काहीसं असंच आहे. तुम्ही कितीही मालिका, सिनेमे केले तरी रंगभूमीला पर्याय नाही. आम्ही आजही या क्षेत्रात टिकून असण्यामागचं मुख्य कारण रंगभूमीच आहे. ‘माझी पहिली चोरी’ या एकपात्री नाटकापासून माझा रंगभूमीसोबतचा प्रवास सुरू झाला. १४-१५ वर्षे नाटकांत काम केल्यानंतर तुमच्यात एक अभिनेता म्हणून एक विचार रुजायला लागतो. एकपात्री प्रयोग, व्यावसायिक नाटकं असं करत करत, पडत- धडपडत पुन्हा रंगभूमीचाच हात पकडत आम्ही आज उभे राहिलो आहोत. या प्रवासात तुम्हाला तुमची बलस्थानं कळायला लागतात. आपली शैली काय, आपण कोणत्या पद्धतीत चांगलं काम करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रयोग करता करता कळत जातात. मला माझी स्टाइल रंगभूमीवरच मिळाली आणि नाटकात काम करत असतानाच ती मी पक्की केली. रंगभूमीवर काम करून जो पुढे जातो त्याला नंतर कोणतेच अडथळे येत नाही. भविष्यात काम मिळणं न मिळणं हा जरी नशिबाचा भाग असला तरी एक अभिनेता म्हणून मनात ती भीती राहत नाही हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. रंगभूमी ही मातीच्या आखाड्याप्रमाणे आहे. मातीच्या आखाड्यात जसा मल्ल घडतो तसंच रंगभूमीवर एक नट घडत असतो.

‘बोल बोल म्हणता’ या नाटकापासून माझा व्यावसायिक रंगभूमीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी जवळपास ३५-४० व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं. तर १० ते १२ नाटकं दिग्दर्शित केली. तरीही गेल्या १९ वर्षांमध्ये मला नाटकात काम करता आलं नाही, याचं मला दुःख आहे. मुळात नाटकात काम करायचं तर त्या गोष्टीला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. नाटकांच्या तालमी, प्रयोग, दौरे या सगळ्या गोष्टींसाठी निर्माता म्हणेल तेव्हा वेळ देणं गरजेचं आहे. पण माझे हिंदी, मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या तारखांमुळे ते कधी शक्य झालं नाही. शिवाय आधी ९ ते ५ नोकरी असल्यामुळे सोमवार ते शुक्रवारमध्येही नाटकांना गर्दी व्हायची, आता ते होतच नाही. नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग हे शनिवार आणि रविवार याच दिवसांमध्ये लागतात. नेमके या दिवसांमध्येच जर सिनेमाचे चित्रीकरण असले तर ते दिवसही गेलेच. त्यामुळे मीच जाणीवपूर्वक रंगभूमीपासून थोडा दूर गेलो.

पण आता पुन्हा एकदा नाटकामध्ये काम करावसं वाटतं. त्या टाळ्या, ते व्यासपीठ, ते प्रेक्षक आणि या सगळ्याच्या मध्यभागी असणारे आपण… या गोष्टीची तुलना कधीही ‘लाईट, कॅमेरा, अॅक्शन’ला येऊच शकत नाही. या प्रवासात मला सर्वात जास्त कोणाचं कौतुक करावसं वाटतं तर ते प्रशांत दामलेंचं. प्रशांतचं मन सिनेमांपेक्षा रंगभूमीवर जास्त रमतं. स्वतःच्या कामात सातत्य ठेवून तो रंगभूमीशी प्रामाणिक राहिला. स्वतःला यात पुरतं मुरवून घेतंलं तसंच आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी नाटकं त्याने केली. आज त्याचा स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग आहे. त्याने नाटकाशी निगडीत खूप अभ्यासही केला. प्रयोग कुठे असावा, कोणत्या वेळी असावा या सगळ्याचा सखोल अभ्यास करूनच तो नाटक रंगभूमीवर आणतो. प्रशांतसारखंच भरत जाधवही रंगभूमीवर गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. भरतचाही स्वतःचा असा प्रेक्षक वर्ग आहे. मुक्ता बर्वे, सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार आहेत जे रंगभूमीवर जीव ओतून काम करतात आणि त्यांच्या कामाची पोचपावती त्यांच्या नाटकांना हाऊसफुल्लची पाटी लागून मिळते.

नाटकांची संख्या वाढली, तसा खर्चही खूप वाढला. सगळी आर्थिक गणितं बदलली गेली. प्रेक्षकांच्या विचारातही बदल झाले आहेत. नाटकांच्या या भाऊगर्दीत ज्या चांगल्या कलाकृती आहेत त्या मात्र आजही टिकून आहेत. ‘कोडमंत्र’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ यात काही प्रशांत दामले किंवा भरत जाधव नाही तरीही या नाटकांना चांगली पसंती मिळतेय. नाटक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तेवढे नाटकांचे प्रयोग करावे लागतात. ५०- ६० प्रयोगांपर्यंत अयशस्वी वाटणारं नाटक अचानक उसळी घेतं आणि नंतरचे प्रयोग चांगले जाऊ लागतात. एखाद्या कलाकारासाठी ही जशी एक तपस्या असते तशीच निर्माता, दिग्दर्शक आणि पडद्यामागील कलाकारांचीही असते.

रसिका जोशी, विजय कदम आणि नंदू गाडगीळ यांना घेऊन मी हलकं फुलकं नाटक केलं होतं. या नाटकाचं दिग्दर्शन करत असतानाचा प्रत्येक क्षण मला आजही लक्षात आहे. या नाटकाने दिलेलं आठवणींच गाठोडं मला आयुष्यभर पुरणारं आहे. मी जेवढी नाटकं दिग्दर्शित केली त्यातील हे नाटक मला सर्वात आवडतं आणि जवळचं आहे. अभिनय केलेल्या नाटकांपैकी ‘मुंबई मुंबई’ हे नाटकही मला तितकंच जवळच आहे. या नाटकात माझी मुख्य भूमिका होती आणि या नाटकात मला एकही वाक्य नव्हतं. पुरूषोत्तम बेर्डे यांनी खास माझ्यासाठी हे नाटक लिहिलं होतं. घर घर नावाचं नाटक मी केलं. या नाटकावरूनच रोहित शेट्टी याचा ‘गोलमाल’ हा सिनेमा आला होता. ही तीन नाटकं मी आयुष्यात विसरु शकत नाही.

रंगभूमीने मला सर्व काही दिलं. तिने मला ओळख दिली, माझ्यातली स्टाइल मी तिथेच ओळखली, नोकरी दिली, पैसा दिला, प्रसिद्धी दिली. आयुष्यात ज्या काही पहिल्या महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या त्या सर्व मला रंगभूमीमुळेच मिळाल्या. त्यामुळे नवोदितांनाही मी हेच सांगेन की, आयुष्यभर जर या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर रंगभूमीला पर्याय नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive katha padyamagchi marathi actor vijay patkar shares his experience in drama
First published on: 02-08-2017 at 11:05 IST