महाराष्ट्राला शाहीर संभाजी भगत हे नाव काही नवं नाही. पथनाट्य, पोवाडे, पुस्तकं, गीतं, नाटकं अशा विविध माध्यमातून हा माणूस भेटत असतो आणि मनाला भिडतो. संभाजी यांनी २५ वर्षांपेक्षाही अधिक वर्षे पथनाट्य केली. पण नंतर एनजीओ आणि इतर संस्थांनी पथनाट्याचे व्यापारीकरण केल्यामुळे त्यांनी रंगभूमीकडे आपला मोर्चा वळवला. मराठी रंगभूमीवर नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात होते आणि रंगभूमीलाही संभाजी भगत यांच्यासारख्या माणसाची गरज होतीच. रंगभूमीवर येताना संभाजी चक्क शिवाजींनाच घेऊन आले… ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या आपल्या नाटकाबद्दल आणि त्यामध्ये आलेल्या इतर अनुभवांबद्दल लोकसत्ता ऑनलाइनशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
मला काही मोठ्या कलाकारांसारखी पार्श्वभूमी नाही. मी सामान्य माणसांमधून आलोय. त्यामुळे त्यांच्या गरजा, समस्या या सगळ्या मी जवळून अनुभवल्या आहेत. जेव्हा शिवाजी अंडरग्राऊंड… या नाटकाची संकल्पना माझ्या डोक्यात आली तेव्हा या नाटकाचं पुढे काय होणार हे मला माहिती नव्हतं. निर्मात्यांच्या शोधात असतानाही अनेक संकटं आली.
या नाटकात काम करणारे कलाकार हे जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत. आम्ही नाटकाची तालीमही शेतात करायचो. सुट्यांमध्ये मी जालन्यात जायचो आणि तिथे ही मुलं एकत्र यायची. हे नाटक उभं करताना अनेक अडथळे आले. पण सर्वांमधून बाहेर पडत हे नाटक बसवलं गेलं. आता वेळ होती ती वृत्तपत्रात जाहिरात देण्याची. वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यासाठी लागणाऱ्या रकमेचीही आम्ही सोय केली. पण एका वृत्तपत्राने नाटकाचे नाव बघून जाहिरात द्यायला नकार दिला. नाटकाचं नाव त्यांना वादग्रस्त वाटले, म्हणून या नाटकाची जाहिरात आमच्या वृत्तपत्रात येणार नाही असे सांगण्यात आले.
शिवाजी हे उच्च जातीचे आराध्य दैवत आणि आंबेडकर कनिष्ठ जातीचे दैवत असा समज समाजात आहे. मला ही फळीच मोडून काढायची आहे. त्यासाठी केलेला हा लहानसा प्रयत्न आहे. या नाटकामुळे अनेक लोकांचे रोष पत्करावे लागले. काही ठिकाणी विरोधही सहन करावा लागला. पण हे नाटक कधी थांबलं नाही.
‘कोर्ट’ सिनेमा ऑस्करला गेला. अनेक स्तरांवरून सिनेमाचे कौतुक झाले त्याचा नक्कीच आनंद आहे. पण तरीही महाराष्ट्रात नाटकासाठी जेव्हा फिरतो तेव्हा तिथे असे अनेक माणसं भेटतात जी माझ्यासाठी भाकर मीठ घेऊन येतात. त्यांना हा विश्वास आहे की हा आपल्यातलाच माणूस आहे. मला हाच विश्वास नवीन उमेद देऊन जातो. मी त्यांच्यातलाच एक आहे आणि मला त्यांच्यातलाच म्हणून राहायचं आहे.
शब्दांकन- मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@indianexpress.com