मराठी चित्रपटांनी ‘श्वास’पासून कात टाकली असे मानले जाते. परंतु, ‘फँड्री’ या चित्रपटापासून मराठी चित्रपट आणखी एक वेगळे वळण घेत आहे असे म्हणता येईल. काव्यमय, प्रतीकात्मक पद्धतीची मांडणी करताना जळजळीत वास्तवही मांडायचे परंतु त्यात कुठेही आक्रोश नसणे या पद्धतीचे लेखन-दिग्दर्शन असलेला हा चित्रपट गोष्ट, मांडणी, अफलातून छायालेखन आणि हळुवार पण निश्चित असे भाष्य करणारा चित्रपट आहे. अतिशय संवेदनशील पद्धतीने वेगळ्या वाटेवरचं प्रेम दाखविणारा आणि ग्रामीण भागातील समाजाच्या अनिष्ठ रूढींवर, जात संघर्षांवर टीका करणारा हा चित्रपट आहे. कोणताही आविर्भाव न आणता दिग्दर्शकाने आपली गोष्ट पडद्यावर मांडली आहे.
‘फँड्री’ म्हणजे ‘टाईमपास’ नव्हे!
जांबुवंत कचरू माने ऊर्फ जब्या हा कैकाडी समाजातील शाळकरी मुलगा. पौगंडावस्थेतील हा मुलगा आपल्याच वर्गात शिकणाऱ्या शाली या वरच्या जातीतील मुलीच्या प्रेमात पडतो. त्याचे हे प्रेम एकतर्फी आहे. समाजातील जातीपातींची उतरंड, आपण आणि आपले कुटुंब यांना अकोळनेर या गावात मिळणारी वागणूक, समाजाकडून मिळणारी अवहेलनेची वागणूक यामुळे जब्या शालीकडे आपले प्रेम व्यक्त करायचे ठरवतो फक्त. आपला मित्र पिराजी याच्यासोबत माळरानावर जाऊन काळी चिमणी म्हणजे कोतवाल पक्षी शोधून काढणे आणि पकडणे हा त्याचा आवडीचा छंद आहे. शाळेच्या लेझीम पथकामध्ये हलगी वाजविणे, गावच्या जत्रेत हलगी वाजवून शालीवर छाप पाडण्याचा प्रयत्न तो करतो. मिळेल ती मोलमजुरी करून, पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणे हे कचरू मानेचे जीवन आहे.
‘फँड्री’- समाजातील जातीव्यवस्थेचे दाहक स्वरूप मांडणारी प्रेमकथा
विशेषत: समाज निषिद्ध मानत असलेल्या पिसाळलेले डुक्कर पकडून मारणे यासाठी गावाला नेहमी कचरू मानेची आठवण होते. जत्रेतल्या बाजारात टोपली विकणे, डुक्कर पकडणे, वडिलांसोबत मोलमजुरीची कामे करणे खास करून शालीसमोर अशी कामे करणे, यामुळे तिच्यावर आपली छाप पडणार नाही, आपल्याला कमीपणा येईल या भावनेने जब्या लपूनछपून कामे करतो. परंतु, एका प्रसंगात शालीसमोर त्याला डुक्कर पकडण्याचे काम करावे लागते.
दिग्दर्शकाने अकोळनेर या नगरजवळील एका गावात गोष्ट घडवली आहे. जब्या आणि त्याचा मित्र पिऱ्या रोज माळरानावर भटकायला जाताना काळी चिमणी शोधतात. या गोष्टीचा प्रतीकात्मक वापर सबंध चित्रपटात लेखक-दिग्दर्शकांनी केला आहे. डुकराला एका भाषेत फँड्री असे म्हटले जाते. आणि हा शब्द उच्चारून लोक कचरू, त्याचा मुलगा जब्या यांना चिडवतात. दिग्दर्शकाने रूढार्थाने प्रेक्षकांना माहीत नसलेल्या जातीतील लोकांची अवस्था, त्यांची अवहेलना, समाजाकडून केली जाणारी पिळवणूक याचे दर्शन घडविताना कुठेही आव आणलेला नाही. मुख्य म्हणजे पहिल्या चित्रचौकटीपासून ते शेवटपर्यंत अखंड चित्रपट प्रेक्षक जब्याच्या नजरेतून पाहतो. त्यामुळे त्याच्या नजरेतून समाज, गाव, तिथली उतरंड, त्यांच्याकडून जब्याला मिळणारी वागणूक, जातीसंघर्ष, जब्याच्या कुटुंबाची परिस्थिती, वरच्या जातीतल्या जब्याच्याच वर्गातील मुलाने हाकलले, मारले, बोलले तरी त्याला विरोध न करणे अशा अनेक बारीकसारीक गोष्टी जब्याच्या नजरेतून चित्रपट पाहताना लगेच जाणवतात, भिडतात.
…मोठी त्याची सावली.!
अप्रतिम छायालेखन असलेला हा चित्रपट पाहताना दिग्दर्शकावर जागतिक सिनेमाचा असलेला प्रभाव जाणवतो. अकोळनेर हे गाव दाखविताना कुठेही दिग्दर्शकाने सेट्स उभारलेले नाहीत. सगळे चित्रीकरण वास्तवस्थळी आणि त्याच गावचे केल्याने सगळी पात्रे, गावातील लोक सारे एक वास्तव आहे हे लगेच पटते. चंक्या आणि जब्या यांचे एक वेगळे नाते आहे. चंक्या हा उडाणटप्पू, सडाफटिंग माणूस आहे, त्याच्याविषयी गावकऱ्यांचे अनेक समज आहेत. त्या अर्थाने एक प्रकारे तो नालायक मानला गेलेला माणूस आहे, परंतु, जब्याचे आणि चंक्याचे नाते, त्यांच्यातील संवाद यातून दिग्दर्शकाने समाजाच्या प्रथा, रूढी, परंपरा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सूचक पद्धतीने मांडला आहे. शेवटच्या प्रसंगात डुक्कर मारून नेत असताना लगतच्या शाळेच्या भिंतीवरील शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची चित्रे दाखवली आहेत. यातून समाजातील जाती संघर्षांबद्दल टोकदारपणे भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
अजय-अतुल मराठीत परतले!
किशोर कदम यांनी जिवंत केलेला कचरू माने प्रेक्षकांना सहज भिडतो. किशोर कदम यांच्या अभिनयाला दाद देण्याबरोबरच सोमनाथ अवघडे याने साकारलेला जब्या, सुरेश पवारने साकारलेला पिराजी, राजेश्वरी खरातने साकारलेली शाली यांनाही दाद द्यावी लागेल. सहजाभिनयाची झलक या तिन्ही बालकलाकारांनी दाखवली आहे. रूढार्थाने पौगंडावस्थेतील मुलगा-मुलगीची प्रेमकथा नसलेला हा चित्रपट नकळतपणे समाजातील प्रथा-परंपरा, जाती संघर्ष याविषयी टोकदार भाष्य करतो. त्यात दिग्दर्शक सपशेल यशस्वी ठरला आहे.
फँड्री
एस्सेल व्हिजन प्रस्तुत
निर्माते – नीलेश नवलाखा, विवेक कजारिया
लेखक-दिग्दर्शक – नागराज मंजुळे
संवाद -भूषण मंजुळे, नागराज मंजुळे
छायालेखन – विक्रम अमलाडी
संकलन – चंदन अरोरा
पाश्र्वसंगीत – आलोकनंदा दासगुप्ता
कलावंत – सोमनाथ अवघडे, किशोर कदम, सूरज पवार, राजेश्वरी खरात, छाया कदम, प्रवीण तरडे व अन्य.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2014 रोजी प्रकाशित
वेगळ्या वाटेवरचं प्रेम..
अतिशय संवेदनशील पद्धतीने वेगळ्या वाटेवरचं प्रेम दाखविणारा आणि ग्रामीण भागातील समाजाच्या अनिष्ठ रूढींवर, जात संघर्षांवर टीका करणारा हा चित्रपट आहे.
First published on: 16-02-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fandry review a charming film about caste identity and young love