अभिनेता इरफान खानने त्याच्या दमदार अभिनय कौशल्याने, व्यक्तीमत्त्वाने चाहत्यांना आपलंसं केलं होतं. म्हणूनच त्याच्या निधनानंतर कोणीतरी जवळची व्यक्ती गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली. इरफान खानचा मुलगा बाबिल याने सोशल मीडियावर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं मन भरून आलं.

बाबिलने शेअर केलेल्या या व्हिडीओत इरफान पाणीपुरीचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहे. ‘जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि शूट संपल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाता..’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

इरफान खान आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून इरफान न्यूरोएंडोक्राइन ट्युमरशी लढा देत होता. मात्र या संपूर्ण लढ्यात तो कधीच खचलेला, कोमेजलेला दिसला नाही. एका आदर्श कलाकाराची प्रतिमा त्याने चाहत्यांसमोर ठेवली. म्हणूनच इरफानच्या निधनाची बातमी सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.