अभिनेता फरहान अख्तर त्याच्या अभिनय आणि गायनासोबतच त्याच्या कल्पकतेसाठीही नेहमीच चर्चेत असतो. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या चर्चेत असणाऱ्या फरहान अख्तरने त्याच्या मुलींना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात फरहानने अनेक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या पत्रात त्याने बुरसटलेल्या चालीरिती आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी मुक्त संवाद साधला आहे. फरहानने लिहिलेले हे पत्र पाहता देशातील इतर मुलींच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे, असेच म्हणावे लागेल. फरहानच्या पत्रातील काही मजकूर खरंच अनेकांना विचार करायला भाग पाडत आहे.

‘मी तुमच्याशी लैंगिक अत्याचार आणि बलात्काराविषयी काही बोलू शकतो? माझा स्वभाव एका सर्वसामान्य पित्याप्रमाणेच आहे. हे असे काही मुद्दे आहेत, ज्याविषयी आपण खुलेपणाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे’, अशी लिहित फरहानने या पत्राची सुरुवात केली. ‘तरुण पिढीला अनेक प्रश्न पडत असतात. महिलांना आपण कशी वागणूक देतो याबाबत आजवर आपण अनेकदा विचार केला असेल. पालक म्हणून आम्ही तुम्हाला समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगा आणि मुलगी असा फरक करता कामा नये, असेही आम्ही तुम्हाला शिकवले आहे’, असे म्हणत अगदी संक्षिप्त स्वरुपात फरहानने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पालक म्हणून आम्ही तुम्हाला नेहमीच सांगितले आहे, की कोणाचाही स्पर्श वाईट असेल तर तो स्पर्श होऊ देऊ नका. त्या व्यक्तिला विरोध करा. फक्त तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्यासोबत कोणालाही काहीही करण्याची परवानगी आहे असा विचार करु नका. तुम्हाला जर मलाही मिठी मारावीशी वाटत नसेल, मी तुम्हाला स्पर्श करु नये असे वाटत असेल तर मी तुम्हाला स्पर्श न करणे अपेक्षित आहे. कारण तुमच्या शरीरावर तुमचा आणि फक्त तुमचाच अधिकार आहे’, अशा शब्दांत फरहानने स्वत:चे विचार मांडले आहेत.

‘तुमच्या फेसबुक पोस्टवरुन मला सहज लक्षात येतं की तुम्ही जीवनात भरारी घेण्यासाठी कधी तयार आहात, तुम्ही कधी अडचणीत आहात. आपण एका असुरक्षित, असमान दुनियेत राहात आहोत. तुम्ही हेच कपडे घाला, असे कपडे घालू नका असे आम्ही तुम्हाला कधीच सांगितले नाही. तुम्ही एक आत्मविश्वासू, स्वावलंबी आणि सजग महिला बनणार आहात. या चित्रपटसृष्टीत महिलांचे चित्रण कसे केले जाते, त्यांना एखाद्या वस्तूप्रमाणे कशी वर्तणूक दिली जाते, याविषयीचे प्रश्न तुम्ही मला विचारले आहेत आणि मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. मुली, महिला आणि लैंगिकतेविषयी तुमच्यासोबत असा खुला संवाद साधून मला फार चांगले वाटते आहे’, असे फरहानने या पत्रातून स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे अतिशय काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेने फरहान अख्तरने लिहिलेले हे पत्र सध्या अनेकांनाच विचार करायला भाग पाडत आहे. फरहानचे हे पत्र पाहता बलात्कार, लैंगिकता आणि अशा कित्येक विषयांवरुन पालकांनी त्यांच्या पाल्यांशी मुक्त संवाद साधण्याची गरज आहे, हा महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ‘पिंक’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या नातींना उद्देशून लिहिलेले पत्रही बरेच चर्चेत होते.