अभिनेता सुर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि ‘जय भीम’चे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सैदापेट कोर्टाने चेन्नई पोलिसांना दिले आहेत. रुद्र वन्नियार सेना नावाच्या वन्नियार गटाने तक्रार दाखल केल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिले आहेत. या चित्रपटात वन्नियार समुदायाबद्दल चुकीचं चित्रण करण्यात आल्याचं वन्नियार सेनेने याचिकेत म्हटलंय.

वन्नियार समाजाने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ‘जय भीम’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच चित्रपटामधून आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी करत टीमने ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आणि या समुदायाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी वन्निया संगमने केली होती. 

हा चित्रपट त्यांच्या समुदायाची प्रतिमा मलीन करत असल्याचा दावा वन्नियार समुदायाच्या सदस्यांनी केला होता. तसेच त्यानंतर वन्नियार संगमने सुर्या, ज्योतिका, दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जय भीममधील काही दृश्ये वन्नियार समुदायाची बदनामी करतात, असं पट्टाली मक्कल काची (PMK) कायदेशीर शाखेचे प्रमुख वकील बालू यांनी कायदेशीर नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच वन्नियार संगमने आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची आणि नुकसानभरपाई म्हणून ५ कोटींची मागणी केली आहे. नोटीसनंतर वन्नियार समुदायाच्या सदस्यांनी अभिनेता सूर्याला उघड धमक्या दिल्या. तसेच पीएमकेचे नागापट्टिनम जिल्हा सचिव, सीतामल्ली पळानी सामी यांनी सूर्यावर हल्ला करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

सुर्याचा जय भीम हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अमॅझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट इरुलर समुदायाच्या लोकांवर कोठडीत झालेल्या छळावर आधारीत आहे. जय भीम हा चित्रपट मोठा हिट ठरला आणि तो ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता.