बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा मंगळवारी(दि. ९) विस्तार झाला. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून ९ उमेदवारांना व जनता दलाच्या कोट्यातून ८ उमेदवारांना मंत्रीपद देण्यात आलं.

भाजपा कोट्यातून मंत्री झालेल्यांमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे भाऊ नीरज सिंह बबलू यांचाही समावेश आहे.  मंत्रिपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर नीरज सिंह बबलू म्हणाले, बिहारमध्ये सुशांत सिंह रजपूतच्या नावाने फिल्मसिटी सुरु करण्याचा विचार आहे आणि त्या दिशेने प्रयत्नही सुरु करणार आहे.  नीरज सिंह बबलू यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटमध्ये पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन खात्याची जबाबदारी दिली आहे. निरज सिंह बबलू हे अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे चुलत भाऊ आहेत.

सुशांतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. त्यानंतर नीरज यांनी सुशांतला न्याय मिळावा यासाठी जस्टीस फॉर सुशांत ही मोहिम बराच काळ चालवली होती. सुशांतनं आत्महत्या केली नाही असं म्हणणारे ते पहिले व्यक्ती होते.  सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही नव्याने निर्माण होत असलेल्या राजगीर फिल्म सिटीला सुशांत सिंह राजपूतचे नाव देण्याची मागणी केली होती.