लैंगिकतेपलीकडचा..

जनसामान्यांकडून काही शब्दांना आणि पर्यायाने त्यामागच्या भावनांना थेट वाळीतच टाकले जाते. समलैंगिकता या शब्दाबद्दल काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे..

जनसामान्यांकडून काही शब्दांना आणि पर्यायाने त्यामागच्या भावनांना थेट वाळीतच टाकले जाते. समलैंगिकता या शब्दाबद्दल काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. कायद्याने नाकारलेल्या या समुदायावर चर्चा होताना अनेक वेळा केवळ त्यातील लैंगिकतेवरच भर दिला जातो. पण लैंगिकतेच्या पलीकडे जात या समुदायाच्या भावभावनांवर फारशी चर्चा होत नाही. हाच मुद्दा पकडून ‘रिचिंग आऊट, टचिंग हार्ट’ ही भावना मांडणारा कशिश हा समलैंगिकांचा फिल्म फेस्टिव्हल नुकताच मुंबईत पाच दिवस संपन्न झाला.

स्ट्रेट व्यक्तींमध्ये असणाऱ्या भावभावना एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर) समुदायातदेखील असतात याचं एक सर्वसमावेशक चित्र यात दिसून आलं. तब्बल ७०० हून अधिक प्रवेशिकांमधून ४४ देशांमधील निवडक असे १४४ चित्रपट, लघुपट आणि माहितीपट या लिबर्टी सिनेमा, अलायन्स द फ्रान्सिस आणि मॅक्स मुल्लर भवन येथे २८ ते ३१ मे दरमान्य संपन्न झालेल्या महोत्सवात दाखविण्यात आले.

पौगंडावस्थेत समलैंगिकत्वाची जाणीव झाल्यावर निर्माण होणारे प्रश्न, समाजाने नाकारल्यावर होणारी असुरक्षिततेची जाणीव, घरातून स्वीकार न होणे, उतारवयातील जोडप्यांची व्यथा, समलैंगिकत्व स्वीकारल्यानंतरदेखील आडव्या येणाऱ्या सामाजिक भेदाभेदाच्या भिंती, मुलं दत्तक घेण्यातल्या अडचणी अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांनी या महोत्सवाला एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले.

पूर्ण लांबीच्या परदेशी चित्रपटांचे वाढलेले प्रमाण हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ आशयच नाही तर तांत्रिकदृष्टय़ा हे सारेच चित्रपट उत्कृष्ट असे होते. महोत्सवाच्या सुरुवातीचा ‘लव्ह इज स्ट्रेंज’ आणि समारोपाचा ‘द वे ही लूक्स’ हे दोन्ही चित्रपट म्हणजे आईंसिंग ऑन द केकच म्हणावे लागतील. साठी-सत्तरीच्या घरातील गे जोडप्याने विवाह केल्यामुळे एका जोडीदाराला नोकरी गमवावी लागणे आणि परिणामी नव्या घराच्या शोधात त्यांची झालेली ताटातूट, घालमेल, मानहानीचे प्रसंग आणि शेवटी एकाचा मृत्यू हे सारं पाहताना उतारवयातील कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांची सांगड घालणारे होते. ‘द वे ही लूक्स’मध्ये थेट शालेय वयातील अंध मुलगा, त्याचा नवा मित्र आणि सदोदीत त्याला मदत करणारी मैत्रीण हा तिढा सहजपणे मांडला आणि सोडवला आहे. अंध असल्यामुळे अर्थातच रंगरूपाच्या पलीकडच्या भावभावना, त्यातून त्याला जाणवलेली ओढ, प्रेम हे सारं प्रभावीपणे मांडत समलैंगिकांच्या आयुष्यावर एक वेगळंच भाष्य त्यातून करण्यात येतं.

गे जोडप्याला दत्तक मुलं हवं असणं आणि त्यातूनच तयार झालेली विचित्र तेढ दाखविणारा ‘द ड्रीम चिल्ड्रन’, बॅटन रिले स्पर्धेतील स्पर्धक जोडप्यातील समलैंगिकत्वाची जाणीव आणि काही काळ ताणलेले संबंध आणि त्या पाश्र्वभूमीवर जिंकलेली स्पर्धा मांडणारा ‘बॉईज’,  क्लासिक क्विअर म्हणून ओळखला जाणारा ‘द अ‍ॅडव्हेंचर ऑफ प्रिसिलिया’ अशा अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. महोत्सवातील भारतीय चित्रपटांचे प्रमाणदेखील यंदा वाढले होते.

story--3महोत्सवाचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे समलैंगिकांच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करणारे दर्जेदार असे माहितीपट. गे व्यक्तीला समाज कशा कशा प्रकारे पाहतो याची साद्यंत आणि चिकित्सक माहिती देणारा ‘डू आय साऊंड गे’ हा माहितीपट प्रेक्षकांची आणि परीक्षकांचीदेखील पसंती मिळवून गेला. स्पेनमधील संसद सदस्य असणाऱ्या लेस्बियन कार्लाचे जीवन उलगडणारा ‘कार्लाज जर्नी’, ‘आऊट इन द लाइन-अप’मध्ये दाखवलेलं जगभरातील सी-सफर्समध्ये असणाऱ्या गे समुदायाचं जीवन, ‘टू मेन अ‍ॅण्ड अ क्रेडल’ या माहितीपटात पॅरिसमध्ये राहणाऱ्या गे जोडप्याने मुलासाठी केलेली धडपड, तर ‘ओपन विंडोज’मध्ये केलेली उतारवयातील लेस्बियनांच्या आयुष्याची चर्चा अशा सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या माहितीपटांनी प्रेक्षकांना बौद्धिक खाद्य दिलं.

हा चित्रपट महोत्सव असला तरी तो भारतातील एलजीबीटी समुदायाला बळकटी देणारा उपक्रमदेखील आहे. त्यामुळेच त्या संदर्भातील माहितीपट, लघुपटांचा समावेशदेखील होता. घटनेतील ज्या कलमाने समलैंगिकांचं जगणं मुश्कील केलं त्या ३७७ कलमाचा आजवरचा प्रवास, या कलमाचा गैरवापर यावर देशभरातील तज्ज्ञ, वकील, डॉक्टर आणि कार्यकर्ते यांच्या मुलाखतींवर आधारित ‘ब्रेकिंग फ्री’ हा श्रीधर रंगायन यांचा माहितीपट देशातील समलैंगिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा आहे. तर आपलं लैंगिकत्व बेधडकपणे मांडणाऱ्या चार तरुणांचा ‘टेल मी द स्टोरी’ हा लघुपट दबून राहिलेल्या समलैंगिकांना आपल्या भावना मांडण्यास बळकटी देणारा होता.

मागील वर्षांपासून फेस्टिव्हलच्या निमित्ताने समलैंगिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येतो. संपूर्ण आयुष्यभर समलैंगिकांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या अशोक रावकवी यांनी २०१४ साली कशिश रेनबो वॉरियर अ‍ॅवॉर्डने गौरविले होते, तर २०१५ चा हा पुरस्कार बेटू सिंग हिला मरणोत्तर देण्यात आला. सोलारिस (र’ं१्र२) पिक्चर्स आणि हमसफर ट्रस्टच्या माध्यमातून सादर होणारा कशिश हा महोत्सव आता दक्षिण अशियातील सर्वात मोठा आणि भारतातील एकमेव असा हा क्विअर फिल्म फेस्टिव्हल झाला आहे. देशभरातील समलैंगिकांच्या चळवळीला एकप्रकारे बळकटीच देण्याचं काम यामुळे होताना दिसत आहे. चित्रपट हे जरी करमणुकीचं माध्यम असलं तरी त्याचबरोबर एखादा विषय मोठय़ा जनसमुदायापर्यंत पोहचविण्याचं प्रभावी माध्यमदेखील आहे हेच कशिश फिल्म फेस्टिव्हलच्या आजच्या यशातून स्पष्ट होत आहे.

मराठीची छाप..
यंदाच्या महोत्सवात मराठी लघुपटांनी स्वत:ची छाप उमटवली आहे. तांत्रिकतेच्या बाबतीत काही लघुपट कमी पडले असले तरी कथानकाच्या वेगळेपणामुळे समलैंगिकांच्या जीवनाबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या काही विषयांवर भाष्य करणारे ठरले. चित्रपटातील दोन महिला कलाकारांच्या चुंबनदृश्यादरम्यान झालेली एका कलाकाराची मानसिक आंदोलने ‘शॉट’ लघुपटात गणेश मतकरी यांनी नेमकी पकडली आहेत. तर समलैंगिकत्व हा केवळ उच्चभ्रूंचे फॅड नसून समाजातल्या अन्य स्तरातदेखील त्याचे पडसाद कसे उमटत आहेत हे इतर लघुपटांतून मांडले आहे. कामवाल्या महिलेला आपला मुलगा गे आहे हे स्वीकारणं कसं जड जाऊ शकतं ह्य़ावर सुरेख भाष्य वैभव हातकर यांनी ‘एक माया अशीही’ या लघुपटातून केलं आहे. तर मुलाचं गे असणं स्वीकारल्यानंतरदेखील इतर पारंपरिक भेदभाव (जात, धर्म) कसे अडथळा आणू शकतात याची एक झलकच मनोज थोरात यांनी ‘भ्रम’ या लघुपटात दाखवली आहे. बैठय़ा चाळीमध्ये राहणाऱ्या ट्रान्सजेंडर मुलाला नवरात्रीच्या दरम्यान स्त्रीवेशात नृत्याला घरून आडकाठी होणं, त्यातून निर्माण होणारी त्याची घालमेल आणि त्यावर त्याने केलेली मात ही दृश्यमाध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर करत कृष्णधवल ते रंगीत चित्रणातील परिवर्तनाच्या माध्यमाने उलगडणारा रोहन कानवडेचा ‘सुंदर’ हा  लघुपट प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनावर आधारित ‘जयजयकार’ हा चित्रपट मराठीतदेखील अशा विषयांचे पूर्ण लांबीचे चित्रपट बनतात हेच सिद्ध करणारा होता.

 

 

कशिश २०१५ पुरस्कार

बेस्ट इंडियन शॉर्ट नॅरेटिव फिल्म – ‘सुंदर’ – (रोहन कानवडे) आणि ‘अ फुल स्टॉप दॅट सर्चेस फॉर इटस् एंड’ – (विवेक विश्वनाथन)

रियाद वाडिया अ‍ॅवॉर्ड  फॉर बेस्ट इमर्जिग फिल्ममेकर – वैभव हातकर – ‘एक माया अशी ही’

बेस्ट डाक्युमेंटरी फीचर – ‘डू आय साऊंड गे?’ – डेव्हिड थोर्पे

बेस्ट डाक्युमेंटरी शॉर्ट फिल्म अ‍ॅवॉर्ड – ‘नोविना’ – अ‍ॅवॉर्ड रॉजर्स

बेस्ट इंटरनॅशनल नॅरेटिव फिल्म – ‘०९:५५ – ११:०५ इंग्रिड एकमन बर्गजगॅटन ४बी’ –   क्रिस्टिन बर्गलंड

बेस्ट नॅरेटिव फीचर फिल्म अ‍ॅवार्ड – ‘बॉइज’ – मिशा कॅम्प

बेस्ट परफॉर्मन्स – क्रिस्तिना हर्नानडेट्झ ट्रान्सजेंडर अ‍ॅक्टर – ‘स्टेल्थ’

 

चित्रा पालेकर, अनुभव सिन्हा, आमीर बशीर, मेघना मलिक, मालविका संघवी यांनी महोत्सवासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Film festival of homosexual people

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या