बॉलीवूडमध्ये नवे चेहरे काही वेगळं करू पाहत आहेत. ग्लॅमरपेक्षा त्यांना चित्रपटाची कथा – पटकथा – संवाद खुणावतात. या नव्या कलाकारांच्या लाटेतलं एक नाव म्हणजे अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा. त्याला स्वत:लाही लेखनात रस असल्यामुळे एका लघुपट लेखन – दिग्दर्शनानंतर निर्माता लेखक निखिल अडवाणी यांच्या ‘बाजार’ चित्रपटातून तो बॉलीवूडच्या सप्तरंगी दुनियेत पहिलं पाऊल टाकतो आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथवरचा प्रवास खूप कठीण होता. आज वडील असते तर त्यांनी चांगला अभिनेता होण्यासाठी मार्गदर्शन केलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून त्यांनी मला घडवलं असतं. वडिलांच्या निधनानंतर आई आणि मी भारतातून केनियात गेलो. मी केनियातच लहानाचा मोठा झालो. गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आहे. संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर मी छायाचित्रणाच्या छंदात रमलो. या छायाचित्रणामुळेच ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून ‘बाजार’ हा पहिला चित्रपट मिळाल्याचं रोहनने सांगितलं.

चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना रोहन म्हणाला, ‘बाजार’ चित्रपटात मी ‘रिझवान अहमद’ ही व्यक्तिरेखा साकारतोय. तो अलाहाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. यशस्वी व्यावसायिक शकून कोठारीबरोबर काम करायचं त्याचं स्वप्न आहे. पैसा, सत्ता, व्यवसाय आणि शेअर बाजाराची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात  अभिनेता सैफ अली खानबरोबर माझी मुख्य भूमिका आहे. मी साकारत असलेल्या ‘रिझवान अहमद’ची स्वप्नं खूप मोठी आहेत. ती पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत येतो. त्यासाठी त्याची खूप मेहनत घ्यायची तयारी आहे. मात्र कितीही महत्त्वाकांक्षी आणि व्यवहारी असला तरी तो तेवढाच हळवा, संवेदनशीलही आहे. आणि त्याची ही संवेदनशीलताच त्याला योग्य मार्गावर ठेवते.

मी अर्थशास्त्राचा पदवीधर असून मोठा झाल्यानंतर ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ बनण्याचं माझं स्वप्नं होतं. योगायोगाने या चित्रपटात मला ‘स्टॉक ब्रोकर’ची भूमिका मिळाली. त्याचा खूपच आनंद आहे. कारण प्रत्यक्षात नाही तर माझं स्वप्न अशा प्रकारे पडद्यावर तरी पूर्ण झालं. अर्थात, शेअर बाजारातील काम कसं चालतं याचा अनुभव असल्याने त्याचा या भूमिकेसाठी फायदाच झाला. ‘रिझवान’ची व्यक्तिरेखा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आणि महत्त्वाची आहे. ‘रिझवान’ मुंबईत येऊ न एक यश मिळवितो ते नक्कीच पाहण्यासारखं आहे, असं रोहनने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

बॉलीवूडपटांमध्ये संवादांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. चित्रपटातील कलाकारांनी म्हटलेले संवादच्या संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ असतात. ‘बडा आदमी बनने के लिए लाईन क्रॉस करनी पडती है.. ’ अशा प्रकारचे या चित्रपटाचे संवाद खूपच लोकप्रिय होत आहेत. त्याविषयी रोहन म्हणाला, प्रेक्षकांना डायलॉगबाजी आवडते, माझा यातला आवडता संवाद म्हणजे ‘हम यहा स्ट्रगल करने नही, सेटल होने आये है’. हा संवाद मला आवडतो कारण तो आजच्या काळाशी जोडलेला आहे. आजची पिढी याच विचाराने वागतेय, कारण प्रत्येकाला वाटतं कधी ना कधी एक वेळ अशी यावी आणि आपण स्थिरस्थावर व्हावं. प्रत्येकजण अशा संधीच्या शोधात असतो. त्यामुळे हा संवाद मला त्याअर्थाने महत्त्वाचा वाटतो.

मुंबईत आलो तेव्हा मला असं वाटत होतं की मला या शहराची खूप चांगली माहिती आहे. पण ‘बाजार’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मला मुंबईचं एक वेगळंच रूप दिसलं. शेअर बाजारचा चकचकीतपणा एकीकडे होता. तर नागपाडा, प्रभादेवी, परळ अशा भागांत आम्ही चाळीतलं जगण्याचं चित्रीकरण केलं, या जागी मी कधीच आलो नव्हतो. त्यामुळे या चित्रपटामुळे माझी मुंबईशी नव्याने ओळख झाली. मी मुंबईत राहात होतो, पण १९९० नंतर  मुंबई सोडून केनियाला राहायला गेलो. तिथे अभिनय क्षेत्राविषयी काही बोललंच जायचं नाही. कुणालाच तिथे अभिनयाविषयी काहीच माहिती नव्हतं, तिथे अभिनय शिकण्याचीसुद्धा काहीच सोय नव्हती. तिथे सर्व काही फक्त व्यवसायाशी निगडित होतं. इथे मुंबईत तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी शिक्षण हवं असेल तर ते मिळतं. तिथे तसं नव्हतं. अभ्यास आणि संगीताची आवड असल्यामुळे गिटार वाजवणं आणि संगीत देणं हे नेहमीच करत आलो आहे. त्याचबरोबर लँडस्केप छायाचित्रणाची आवडही मी इतकी र्वष जपली असल्याचं रोहन म्हणाला.

आताच्या कलाकारांपैरी वरुण धवन आणि रणवीर सिंग या दोघांचं काम मला खूप आवडतं. ते मनोरंजनाबरोबरच सहजतेने आशयघन चित्रपटही करतात. आपला प्रेक्षकवर्ग खूप सजग आहे. हॉलीवूड, बॉलीवूड आणि ‘सैराट’सारख्या प्रादेशिक चित्रपटांकडे मी आकर्षित होतो. आताचा काळ असा आहे की कुठला चित्रपट गाजेल हे कोणीही सांगू शकत नाही.  चित्रपट यशस्वी होण्यासाठी असा कुठलाच साचा नाही. कोणत्याही क्षेत्रात चांगल्या गोष्टी असतात तशा वाईटही असतातच. पण चुकीचं काही घडतंय तर त्याविषयी बोलायलाच हवं, अशा स्पष्ट शब्दांत सध्याच्या ‘मी टू’ मोहिमेविषयी त्यानं आपलं स्पष्ट मतं मांडलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First film got because of instagram
First published on: 21-10-2018 at 01:31 IST