अमिताभ बच्चन यांच्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि रणबिर कपूर पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार असल्याचे कळल्यापासून याविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती, आता चित्रपटकर्त्यांकडून या दोन अभिनेत्यांची झलक असलेला ‘भूतनाथ रिटर्न्स’चा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला असला कारणाने चाहत्यांना अधिक वाट पाहावी लागणार नाही. यात रणबिर आणि शाहरूख खान मतदानाचे महत्व पटवून सांगताना दिसतात.

रणबिर कपूर यात स्वत:चेच व्यक्तिमत्व साकारत असून, प्रोमोमध्ये तो एक चित्रीकरणाच्या स्थळी दिसतो. येथील एका सदस्याकडे मतदात्याचे कार्ड नसल्याने रणबिर त्याची खिल्ली उडवताना दिसतो. जेव्हा तो सदस्य त्याला शॉट देण्यासाठी बोलावतो, तेव्हा रणबीर ऐकून न ऐकल्यासारखे करतो आणि मतदात्याचे कार्ड जवळ असणे खूप महत्वाचे असल्याचे सांगताना दृष्टीस पडतो. तर, शाहरूख खान जो २००८ साली आलेल्या ‘भूतनाथ’ चित्रपटाचा भाग होता, या चित्रपटात भूत बनलेल्या अमिताभ बच्चन यांना ‘आम्हा सर्वांना भूताचा अभिमान आहे’, हे सांगताना दिसतो.

भ्रष्टाचारी राजकीय नेत्याविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या एक भूताची कथा असलेला ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा चित्रपटात देशातील निवडणुकीच्या वातावरणात प्रदर्शित होत आहे, हा निव्वळ योगायोग असल्याचे अमिताभ बच्चन म्हणाले. परंतु, हा चित्रपट मतदानाचे महत्व पटवून देत असल्याची पुष्टीदेखील त्यांनी जोडली. ‘भूतनाथ रिटर्न्स’ ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.