एक शुक्रवार आणि पाच वेगवेगळ्या अभिरुचीचे चित्रपट.. प्रेक्षकांना मानसिक आणि भौतिकदृष्टय़ा (खर्चीक) तसा सहजी न पचणाराच प्रकार म्हणा ना! पण तरीही आज तुम्हाला या पक्वान्नांमधले नेमके तुमच्या आवडीचे चित्रपट कोणते त्याची निवड करूनच ते पचवावे लागणार आहेत. नाही म्हणायला आठवडाभर असल्याने सावकाश एकेक करतही पचवू शकता. कारण तसे पाहायला गेले तर प्रत्येक चित्रपटाची चव वेगळी आहे हे नक्की! मराठीत तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ‘दशक्रिया’ आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हिंदीतही विद्या ‘तुम्हारी सुलू’ म्हणत चित्रपटगृहात दाखल झाली आहे आणि तिच्या बरोबरीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची कहाणी सांगणारा ‘अ‍ॅन इनसिग्निफिकन्ट मॅन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. तर हॉलीवूडमध्ये ‘डीसी’च्या सगळ्या सुपरहिरोंना एकत्र आणणारा ‘जस्टीस लीग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दशक्रिया

‘दशक्रिया’ हा चित्रपट साहित्यिक बाबा भांड यांच्या त्याच नावाने प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर बेतलेला आहे. १९९४ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीत मृत्यूनंतर दहाव्या दिवशी केले जाणारे विधी, हे विधी करणारा किरवंत समाज आणि त्याआधारे उभे रााहिलेले त्यांचे अर्थकारण, समाजकारण या मुद्दय़ांना हात घालण्यात आला होता. संजय कृष्णाजी पाटील यांनी त्याला पटकथेचे स्वरूप दिले असून संदीप भालचंद्र पाटील यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, मिलिंद फाटक, आदिती देशपांडे असे सरस कलाकार आहेत.

हंपी

‘कॉफी आणि बरेच काही’, ‘अ‍ॅण्ड जरा हटके’ असे हटके आणि आजच्या तरुणाईचे विषय हाताळणारे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक प्रकाश कुं टे यांचा ‘हंपी’ हा तिसरा चित्रपट आहे. प्रकाश कुंटेंचा चित्रपट आणि सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर असे वेगळे कलाकारांचे त्रिकूट असलेल्या या चित्रपटाबद्दल साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याचे चित्रीकरण कर्नाटकातील हंपीमध्ये झालेले आहे. या निसर्गरम्य आणि देवळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुंदर प्रदेशाच्या पाश्र्वभूमीवर घडणारी ही तितकीच हळूवार प्रेमकथा आहे. ललितचा हा नायक म्हणून या वर्षी आलेला लागोपाठ तिसरा चित्रपट आहे. ललित, सोनाली आणि प्राजक्ताबरोबरच प्रियदर्शन जाधवचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

तुम्हारी सुलू

एक सर्वसामान्य गृहिणीचा रेडिओ जॉकीपर्यंतचा गमतीशीर प्रवास ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘तुम्हारी सुलू’ चित्रपटाची नायिका सुलोचना हिला अचानकपणे रेडिओ स्टेशनवर रात्रीचा शो चालवण्याची संधी मिळते. आरजे म्हणून सुलू रात्रीच्या या शोमधून लोकांच्या आयुष्यात काय गमतीजमती घडवते हे या हलक्याफुलक्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात विद्या बालनबरोबर मानव कौल, नेहा धुपिया आणि आरजे मलिष्का यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जस्टीस लीग

‘डीसी’च्या सुपरहिरोंना एकत्र आणणारा ‘जस्टीस लीग’ हा खऱ्या अर्थाने ‘डीसी कॉमिक’च्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. माव्‍‌र्हलने ‘अ‍ॅव्हेंजर्स’च्या माध्यमातून हे प्रयोग तिकीटबारीवर कधीच यशस्वी केले आहेत. अर्थात आता ‘डीसी’ने ही मोहीम हातात घेतली आहे. बॅटमॅन, सुपरमॅन, वंडर वुमन, फ्लॅशमॅन, अ‍ॅक्वामॅन अशी सगळी डीसीची हिरो मंडळी एकत्र येऊन करामती करताना दिसणार आहेत.

‘अ‍ॅन इनसिग्निफिकन्ट मॅन’

चित्रपटाचे शीर्षक एका माणसाची कथा सांगणारे आहे असे दाखवणारे असले तरी हा चित्रपट म्हणजे फक्त ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांची कथा नाही. खुशबू रांका, विनय शुक्ला दिग्दर्शित आणि ‘शिप ऑफ थीसस’ फेम आनंद गांधी निर्मित ‘अ‍ॅन इनसिग्निफिकन्ट मॅन’ हा चित्रपट सामान्य माणसांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतून जन्माला आलेल्या ‘आप’सारख्या पक्षाची जडणघडण मांडणारा चित्रपट आहे. अनुबोधपटाच्या शैलीत चित्रीकरण करण्यात आलेला असल्याने वास्तवातील व्यक्तिरेखा अर्थातच अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव ही मंडळीच चित्रपटातील कलाकार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five different taste of movie release this friday
First published on: 17-11-2017 at 02:28 IST