स्वच्छ मनोरंजक मध्यमवर्गीय चित्रपट म्हणताक्षणीच रसिकांच्या एका पिढीसमोर येणारे हुकमी नाव म्हणजे दिग्दर्शक बासू चटर्जी. सत्तरच्या दशकात बासूदानी ‘पिया का घर’, ‘रजनीगंधा’, ‘चितचोर’, ‘खट्टा मिठ्ठा’, ‘शौकिन’, ‘चक्रव्यूह’, ‘दिल्लगी’, ‘एक रुका हुआ फैसला’, ‘अपने पराये’ अशा किती तरी चित्रपटातून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. असाच एक ‘छोटी सी बात’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदी चित्रपटाचा हीरो मुंबईतील बेस्ट बसमधून प्रवास करतोय. तो व नायिका नरीमन पॉईंटच्या कार्यालयात नोकरी करताहेत. तो आपले प्रेम व्यक्त करण्यात घाबरतोय अथवा कमालीचा बुजरा आहे. धर्मेंद्र व हेमा मालिनीचा चित्रपट पाह्यला गेल्यावर तो त्या दोघांच्या जागी स्वतःला व त्या आवडत्या युवतीला पाहतोय (जानेमन जानेमन तेरे दो नयन) अखेर तो प्रेमात पुढचे पाऊल उचलण्यात सल्ला घ्यायचे ठरवतो… अशा गोष्टीची कल्पनाच करु शकत नाही ना? पण हीच खूप साधी वाटणारी गोष्ट ‘छोटी सी बात'(१९७६) चे वेगळेपण ठरले व मुंबईत अप्सरा थिएटरमधे मॅटीनी खेळात चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश संपादले. अर्थात अशा यशासह अशा चित्रपटांचा ट्रेन्ड येणे स्वाभाविक. तसा तो आला व गिरगाव गावदेवीत राहणारा अमोल पालेकर ‘स्टार’ होऊन काही वर्षांतच जुहूला राह्यला गेला. विद्या सिन्हा देखील स्टार होऊन राजेश खन्ना, शशी कपूर, संजीवकुमार यांची नायिका झाली. दोघांचेही अष्टपैलुत्व वेगळाच विषय.

‘छोटी सी बात’ सर्वानाच आश्चर्याचा मोठाच धक्का देणारा ठरला. चित्रपटाची निर्मिती बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरखाली झाली. मोठी निर्मिती संस्था असल्याने चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन असे बडे स्टार पाहुणे म्हणून लाभले. तर चोप्रांच्याच ‘अफसर’, ‘गुमराह’ इत्यादींत अशोक कुमार होते. त्यानुसार ते यातही आले. मात्र चित्रपट खणखणीत यशस्वी ठरेल अशी कोणालाच अपेक्षीत नव्हते. हीच तर खरी गंमत असते. योगेश यांच्या गीताना सलिल चौधरीचे संगीत हे देखिल उल्लेखनीय. ‘न जाने क्यू होता है यह जिंदगी से साथ’ ( लता मंगेशकर) हे गाणे सूचक. काही दृश्यांचे चित्रण नरिमन पाँईंट विभागात तर झालेच पण इंडियन एक्स्प्रेसचा पहिला मजला, लिफ्टची रांग येथेही झालेय. मध्यमवर्गीय नोकरदार नायक नायिका हा मूड या सार्‍यातून उत्तमच पकडलाय…
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback choti si baat
First published on: 21-04-2017 at 01:05 IST