अमली पदार्थप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय २० ऑक्टोबरला देणार आहे. न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यापूर्वी आर्यन हा गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थाचे नियमितपणे सेवन करत असल्याचा दावा करत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी त्याला जामीन देण्यास विरोध केला. दरम्यान, अटक झाल्यानंतर जवळपास १२ दिवसांनंतर आर्यनने आई गौरी आणि शाहरुखशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुखला अश्रू अनावर झाले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, ‘आर्यनने त्याच्या आईचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. जवळपास १० मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. दरम्यान आर्यनला पाहून गौरी खानला रडू कोसळले आहे.’ आर्थर रोड जेलमध्ये व्हिडीओ कॉल ही सुविधा करोना काळात सुरु झाली आहे. जेणे करुने कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांशी संवाद साधता येईल.

Video: …अन् NCB च्या कार्यालयामधून मुलाला भेटून बाहेर पडताना गौरी खानला अश्रू अनावर

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवारी आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. त्याआधी आर्यनतर्फे जामीन का देण्यात यावा यासाठी तर तो सध्या जामिनासाठी कसा पात्र नसल्याचा दावा एनसीबीतर्फे करण्यात आला.

सुधारण्याची संधी की तुरुंग?

आर्यनसह अन्य दोन आरोपींकडून अमली पदार्थाचे नियमित सेवन केले जात असल्याचा दावा एनसीबी करत आहे. मात्र आर्यनचे वय लक्षात घेता त्याला सुधारण्याची संधी द्यायची की कट सिद्ध होईपर्यंत त्याला कारागृहात ठेवायचे, यातून काय साध्य होणार, असा प्रश्न आर्यनच्या वतीने देसाई यांनी उपस्थित केला.