scorecardresearch

Premium

‘गजब तिची अदा’ युद्धबंदीचे दृक-श्राव्य-काव्य

जगातील महासत्ता आता अस्तंगत झाल्या असल्या तरी चीन, रशियासारख्या नव्या महासत्ता युद्धखोरीचं तंत्र जगभर फैलावत आहेत.

ajab tichi gada drama
गजब तिची अदा

रवींद्र पाथरे

जगातील महासत्ता आता अस्तंगत झाल्या असल्या तरी चीन, रशियासारख्या नव्या महासत्ता युद्धखोरीचं तंत्र जगभर फैलावत आहेत. कधी युक्रेनसारख्या राष्ट्रावर थेट हल्ला करून, तर कधी शेजारी देशांच्या अधूनमधून कुरापती काढून. दोन महायुद्धांनी जगाची युद्धाची खुमखुमी मिटलेली नाहीए, तर नव्या कुरापतखोर राष्ट्रांनी ती सुरूच ठेवली आहे. या युद्धांनी काय साध्य होतं? तर- काहीच नाही. युद्धग्रस्त देश होरपळून निघतात, आणि त्याचे परिणाम परस्परांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांना भोगावे लागतात. ही युद्धं लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध आणि तरुणांना बरंच काही भोगायला लावतात. त्यांची काहीही चूक नसताना. अफगाणिस्तान, इराक हे देश याची जितीजागती उदाहरणं आहेत. हे देश पूर्वपदावर यायला आणखीन किती दशकं लागतील हे सांगणं अवघडच. या यु्द्धखोरीचा जगभरातून निषेध होत असतानाही ती थांबत नाहीत, हे दुर्दैव.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

अशाच एका रूपककथेतून ‘अनामिका’ आणि ‘रंगपीठ’ निर्मित, ‘साईसाक्षी’ प्रकाशित प्रा. वामन केंद्रे लिखित, दिग्दर्शित ‘गजब तिची अदा’ हे या युद्धखोरीवर प्रकाश टाकणारं नाटकं अलीकडेच रंगभूमीवर आलं आहे. एका युद्धखोर राजाची गोष्ट त्यातून उलगडते. सतत युद्धं करण्याचं त्याला व्यसनच लागलंय जणू. एक युद्ध झालं की दुसरं. मग पुढचं युद्ध. आपलं सैन्य सतत युद्धभूमीवर लढत असायला हवं, ही त्याची मनिषा. त्याच्या या युद्धखोरीने राजाच्या सैनिकांच्या बायका त्रस्त झाल्या आहेत. या युद्धांतली निरर्थकता त्यांना जाणवते. त्यावर तोडगा काय, याचा त्या एकत्र बसून विचार करतात.

आणि त्यांना तो सापडतोही. हो.. युद्धावरून परतलेल्या नवऱ्यांना ‘पुन्हा युद्धावर जाणार नाही,’ अशी अट घालायची. त्याविना त्यांना नवरा म्हणून जवळ करायचं नाही. लढाईवरून परतलेले सैनिक आपल्या घरी विजयी वीरासारखे जातात, पण त्यांना त्यांच्या बायका जवळ येऊ देत नाहीत. ‘युद्धावर जाणार नाही,’ अशी शपथ घ्या असं त्या विनवतात. सुरुवातीला ते त्यांना उडवून लावतात. मग देशापुढे आपण हतबल आहोत, हे सांगून बघतात. पण त्या बधत नाहीत. शेवटी आपल्या पुरुषार्थाचं शस्त्र ते बाहेर काढतात. पण त्यानेही त्यांच्या बायकांवर काहीच परिणाम होत नाही. शेवटी ते हतबल होतात. आणि राजासमोर जाऊन आपली व्यथा मांडतात. राजा  ना-ना युक्त्यांनी त्यांचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करतो. परंतु त्याने काहीच साध्य होत नाही. तशात पराजित देशातील एकवीस हजार अबलांना राजापुढे पेश केलं जातं. त्यांच्या आक्रोशानं तर इथल्या स्त्रिया आणखीनच संतापतात. उद्या आमच्यावर हीच स्थिती येईल, तेव्हा आम्ही काय करायचं, असा प्रश्न त्या करतात. त्याचं उत्तर राजाकडेही नसतं. तो जगाचं ‘राजकारण’ त्यांना ऐकवतो. तिथे टिकायचं असेल तर आपला दबदबा टिकवायला हवा, हे त्यांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा स्वत: राणीच त्याच्या या युद्धखोरीविरुद्ध उभी ठाकते तेव्हा त्याचा नाइलाज होतो. तो सैनिकांसह शस्त्रं खाली ठेवतो.

प्रा. वामन केंद्रे यांनी नेहमीच्या पठडीत नाटकाची उभारणी केलेली नाही, तर त्याला दृक -श्राव्य-काव्याची जोड दिली आहे. सहसा मराठी रंगभूमीवर या प्रकारचं नाटक बघायला मिळत नाही. दृश्यात्मकतेचं जणू आपल्याला वावडंच असतं. आशयप्रधानता ही मराठी नाटकाचा आत्मा. त्याच्याच जोरावर नाटक सादर केलं जातं. आणि रसिकही ते स्वीकारतात. इथे प्रा. वामन केंद्रे यांनी हा साचा बुद्धय़ाच दूर ठेवला आहे. दृश्यात्मकता, संगीत, नृत्य, काव्य यांच्या साहाय्यानं नाटक सादर केलं आहे. त्यामुळे या नाटकाला एक लय, गती आणि ताल आहे. जो प्रेक्षकांना आपल्याबरोबर बांधून ठेवतो. या नाटकाची पार्श्वभूमीही रजपूत राजेरजवाडय़ाची आहे. साहजिकपणेच वेशभूषेपासून संगीत, नृत्याचा एक वेगळा बाज आपल्याला यात पाहायला मिळतो. त्याचा एक फ्लेवर या नाटकात मिसळला आहे. मराठी रंगभूमीवरील हे वेगळं रसायन आहे, जे सहसा राष्ट्रीय रंगभूमीवर पाहायला मिळतं. ‘दिग्दर्शकाची रंगभूमी’ ही संकल्पना त्यात अनुस्यूत आहे. रतन थिय्याम, कन्हैय्यालाल आदींची ही रंगभूमी म्हणता येईल. तिथं आशयाला प्रधान स्थान नसतं, तर सादरीकरणाला महत्त्व असतं. दृश्यात्मकता, संगीत, वेशभूषा, नृत्य, कोरिओग्राफी यांच्या साहाय्यानं नाटक रचलं जातं. या अर्थानं आपल्याला हे नवं आहे. असो.

नावेद इमानदार यांनी स्तरीय नेपथ्यातून नाटय़स्थळं निर्माण केली आहेत. अनिल सुतार यांनी नृ्त्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून प्रसंग उठावदार, गडद, गहिरे केले आहेत. एस. संध्या यांची रंगीबिरंगी वेशभूषा आणि उलेश खंदारे यांची रंगभूषा नाटकात महत्त्वाची भूमिका बजावते. संगीताची महत्त्वाची बाजू प्रा. वामन केंद्रे यांनीच सांभाळलेली आहे. नाटकात पंचवीसेक कलाकार आहेत. त्यातही करिश्मा देसले (लक्ष्मी, कलाकार) यांनी उत्तम प्रमुख भूमिका साकारली आहे. राजाच्या भूमिकेत ऋत्विक केंद्रे शोभले आहेत. अन्य सर्वानीच आपापली कामं चोख केली आहेत. एकुणात, मराठी रंगभूमीवरचा हा वेगळा ‘प्रयोग’ आहे. त्याचं स्वागत करायला हवं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gajab thii ada drama base on ceasefire period ysh

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×