बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत जे पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात. पण त्यानंतर कलाविश्वात त्यांचा फारसा वावर नसतो. अशीच एक अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी. ‘स्वदेस’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात गायत्रीने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केला होता. पण आता ही अभिनेत्री आहे कुठे, ती काय करते हे फारशा लोकांना माहित नाही.
गायत्रीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. १९९९ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. त्यात टॉप पाच जणांमध्ये तिने आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर २००० साली ‘मिस इंटरनॅशनल’ सौंदर्यस्पर्धेत गायत्रीने जपानमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यादरम्यान तिला जाहिराती व म्युझिक अल्बमचे ऑफर्स येऊ लागले होते. ती ‘बॉम्बे डाइंग’, ‘फिलिप्स’, ‘सनसिल्क’ यांसारख्या जाहिरातींमध्येही झळकली.
शाहरुखसोबतच्या ‘स्वदेस’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जरी फारशी कमाई केली नसली तरी चित्रपट समीक्षकांकडून त्याची फार प्रशंसा झाली होती. प्रेक्षक-समीक्षकांकडून गायत्रीला कौतुकाची थाप मिळाली होती. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होईल अशी आशा अनेकजण व्यक्त करत असतानाच तिने इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर नेलं.
२००५ साली गायत्रीने व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर तिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून फारकत घेतली. गायत्रीचा पती विकास हा ओबेरॉय रिअॅलिटीचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहे. गायत्री व विकासला दोन मुलं आहेत. इंडस्ट्रीपासून दूर असलेली गायत्री फिटनेसवर अजूनही भर देते. पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये तिला एकदम फिट पाहिलं जातं. अभिनेत्री सोनाली बेंद्रे व हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांच्याशी तिची खास मैत्री आहे. या तिघींना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.