बऱ्याच काळानंतर बॉलिवूड अभिनेता गोविंदा प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी स्वत:बद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. मागच्या काही दिवसांमध्ये आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयकॉट करण्यात आलं होतं. याबाबत गोविंदा यांना जेव्हा विचारण्यात आले. यावेळी गोविंदा यांनी बॉयकॉट ट्रेंडवर मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आणि बॉलिवूड कलाकारांना मोलाचा सल्लाही दिला.

‘बिग एफएम’शी संबंधित एका कार्यक्रमात गोविंदा यांना बॉलिवूडच्या विरोधात सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवर प्रश्न विचारण्यात आले. ‘तुम्हालाही काही बोलताना याची भीती वाटते का की तुमच्या तोंडून असे काही बोलले जाईल ज्यामुळे तुमच्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात होईल?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मला वाटतं याला एखाद्या व्यायामासारखं स्वीकारलं पाहिजे आणि चांगले नियम पाळले तर पुढच्या अडचणी येणार नाहीत.”

आणखी वाचा-“तो म्हणाला मी स्वतःच्या मुलीबरोबरही…” प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

गोविंदा पुढे म्हणाले, “आपल्याला जर विचार करून बोलण्याची सवय लागली तर बोलल्यानंतर विचार करण्याची गरजच भासणार नाही. मग हे चांगलंच आहे, त्यात काही चूक नाही. यात काय वाईट आहे, जनतेनेही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. आमच्याकडून कुठेतरी चूक झाली आहे असे वाटले तर आम्ही माफी मागतो. त्यात चुकीचं काय आहे.”

आणखी वाचा- गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’ चित्रपटाच्या रिमेकबद्दल मोठा खुलासा; शाहरुख साकारणार मुख्य भूमिका?

दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना गोविंदा यांनी असेही सांगितले की, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते त्यांच्या पत्नीला नक्कीच विचारतात. तिचा सल्ला घेतात. गोविंदा गमतीने म्हणाले, “हीरो नंबर १ तुम्ही तर बघितलाच असेल, पण ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटात मी काय केले तेही तुम्ही पाहा”