रोमॅण्टिक गाणी म्हटली की त्या गायकाचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आवर्जून येतं. त्याच्या आवाजाने श्रोत्यांना कधी मंत्रमुग्ध केलं तर कधी आपल्याच भावविश्वात नेऊन गीताचा मनमुराद आनंद लुटू दिला. तो गायक म्हणजे अरिजीत सिंग. आज त्याचा ३०वा वाढदिवस. केवळ २८ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अरिजीतने एवढय़ा कमी वयात एवढा आवाका गाठलाय, की त्याच्याकडे कौतुकाने पाहावे की ईर्षेनं हेच कळत नाही.

अरिजीतचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं झाला. त्याचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे. सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजितने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, हा शो त्याला जिंकता आला नाही. हार न मानता त्याने ‘१० के १० ले गए दिल’ या अन्य रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या शोचादेखील तो विजेता होऊ शकला नाही. या शोमध्ये त्याचा सामना दुसऱ्या रिअॅलिटी शोच्या विजेत्यांबरोबर होता. बऱ्याच काळापर्यंत अरिजीतने सहाय्यक संगीत प्रोग्रॅमर म्हणून शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आणि मिथुन या दिग्गज्यांबरोबर काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ मध्ये ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ गाण्याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली. यानंतर अरिजीतने संगीतकार प्रीतमबरोबर ‘एजंट विनोद’, ‘प्लेअर्स’, ‘कॉकटेल’ आणि ‘बर्फी’सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली. अरिजीतला खरी ओळख ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने दिली. या गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. २०१४ मध्ये त्याने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानबरोबरदेखील काम केलं. आज अरिजीत जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करत असून, त्याला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येत चाहते उपस्थित असतात.