छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आबालवृद्धांच्या तोंडी असतात. मात्र आता या शौर्यगाथा छोटय़ा-छोटय़ा किश्शांच्या रूपात ‘झी टॉकीज’ वाहिनीवर सादर होणार आहेत. ‘र्फजद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘जंगजौहर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर चित्रफितीद्वारे शिवरायांच्या जीवनातील काही किस्से सांगणार आहेत. ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर स्वत: इतिहास अभ्यासक आहेत. ‘र्फजद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘झी टॉकीज’ वाहिनीवर ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा वल्र्ड टेलीव्हिजन प्रीमिअर १६ ऑगस्टला होणार आहे. यानिमित्ताने दिग्पाल लांजेकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या धाडसी वृत्तीची प्रचीती देणाऱ्या घटना याद्वारे इतिहासाची पाने उलगडणार आहेत. यामुळे ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या दूरचित्रवाणीवरील प्रदर्शनासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची महती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. चित्रपटाला वेळेचे बंधन असते. त्यामुळे दिग्दर्शकाला प्रेक्षकांसमोर कथा मांडताना वेळेची मर्यादा येते. वेळेच्या बंधनामुळे अनेकदा इतिहासातील काही गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. यात मी चित्रपटात न दाखवता आलेल्या इतिहासातील काही प्रसंग सांगणार असल्याचे दिग्पालने सांगितले. यानिमित्ताने, पहिल्यांदाच चित्रपटाव्यतिरिक्तही शिवरायांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणार असल्याबद्दल दिग्पालने आनंद व्यक्त केला.