अनेक तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडलच्या सेटवर नेहा आदित्य नारायणशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण हा सर्व मनोरंजनाचा भाग आहे म्हणत नेहाने सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला. त्यापूर्वी नेहा हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहित ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडणे किती वेदनादायी असते असे म्हटले होते. मात्र या सर्वावर हिमांशने बोलणे टाळले होते. आता एका मुलाखतीमध्ये हिमांशने धक्कादायक खुलासा केला आहे.

हिमांशने नुकताच ‘बॉम्बे टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मोठा खुलासा केला आहे. ‘सोशल मीडियावर सुरु असलेल्या ब्रेकअपच्या चर्चांबद्दल मला खूप काही बोलयचे होते. मी अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मेसेज देखील लिहिला होता. पण मी थोडा वेळ घेतला आणि नंतर माझे विचार बदलले. कारण ज्या व्यक्तीवर मी प्रेम केले त्याच व्यक्तीच्या विरोधात मी कसे बोलू शकतो. ही माझी प्रेमाची व्यख्या नाही’ असे हिमांश म्हणाला.

‘मला त्यावर फार काही बोलायचे नाही. पण मी इतकच सांगेन की तिला या रिलेशनमध्ये राहायचे नव्हेत. म्हणून आम्ही दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेतला. हे सगळे विसरुन आयुष्यात पुढे जाणे हा तिचा निर्णय होता आणि तिच्या या निर्णयाचा मी आदर करतो. पण नंतर सर्व गोष्टी बदलल्या. प्रत्येक वेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि त्याचा सामना मला करावा लागला’ असे हिमांश पुढे म्हणाला.