लासे हॉलस्ट्रम या दिग्दर्शकाच्या चित्रपटांशी परिचित असणाऱ्यांना त्यांच्या चित्रपटातील लक्ष वेधून घेणाऱ्या काही बाबींवर एकमत होऊ शकते. पहिली बाब ते कुटुंबाशी संबंधित सूक्ष्मदर्शी शोध घेणारे मेलोड्रामिक असतात. ते पहिल्या फ्रेमपासून तुमची पकड घेणारे असतात आणि विशिष्ट काळाचा पट मांडून ते प्रेक्षकाला भावस्पर्शी अनुभव देणारे असतात. जॉनी डेप आणि गतिमंद मुलाच्या भूमिकेतील लिओनाडरे डिकॅपरिओ (टायटॅनिकआधी) यांची भूमिका असलेल्या ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’ या अमेरिकी खेडेगावातल्या गरीब, स्थितिशील कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटापासून हॉलस्ट्रम यांची अमेरिकी कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्यांच्या आधारे त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट बनविले. यात ‘चॉकलेट’, ‘द शिपिंग न्यूज’, ‘द सायडर हाऊस रुल्स’, ‘अ‍ॅन अनफिनिश्ड लाइफ’, ‘द होक्स’, ‘डिअर जॉन’, ‘सॉलमॉन फिशिंग इन द येमेन’, ‘द हण्ड्रेड फूट जर्नी’ यांचा समावेश आहे. लोकप्रिय कादंबऱ्यांवर तेवढय़ाच ताकदीचे चित्रपट बनण्याच्या मोजक्या उदाहरणांमध्ये हॉलस्ट्रम मोडतात. विल्यम ब्रुस कॅमेरॉन यांच्या ‘ए डॉग्ज पर्पज’ या २०१० साली प्रकाशित झालेल्या कादंबरीवर हॉलस्ट्रम यांनी या वर्षी बनविलेला चित्रपट काही दिवसांपूर्वी उलटसुलट गोष्टींमुळे प्रचंड गाजत होता. इतका की पुन्हा दोनेक महिने या कादंबरीच्या विक्रीने खपाची सर्वोच्च आकडेवारी गाठली. अजूनही पुस्तकाची तडाखेबंद विक्री होत आहे आणि या चित्रपटाचे प्रेमी वाढत आहेत.

‘ए डॉग्ज पर्पज’ ही कादंबरी एका श्वानाच्या निवेदनातून माणसाच्या जगाचे चित्रण करते. इथला निवेदक श्वान एकच असला, तरी कादंबरीचा कालावधी पन्नास-साठ वर्षांचा असल्याने त्या कुत्र्याचे नंतरचे तीन पुनर्जन्म आपल्याला दिसतात. प्रत्येक पुनर्जन्मात त्याची जात बदललेली (एकात लिंगही) पाहायला मिळते; परंतु सुरुवातीला भेटणारा निवेदक तोच असल्याने त्याच्या बदललेल्या भोवतालाच्या, काळाच्या वर्णनशैलीत समानता आढळते.

चित्रपटाला सुरुवात होते पन्नासच्या दशकातील अमेरिकेत जन्मलेल्या ‘गोल्डन रिट्रिव्हर’ जातीच्या श्वानपिल्लाच्या निवेदनातून. आत्यंतिक वेगवान प्रसंगाद्वारे श्वानगृहातून पळ काढून तो इथन नावाच्या मुलाच्या कुटुंबात कसा शिरकाव करतो याची हकीगत सांगतो. अगदी दोन-तीन मिनिटांचा हा प्रसंग गमतीशीर निवेदनाने प्रेक्षकाला पकडून ठेवतो. इथनच्या घरी तो बेली या नावाने वाढतो. इथनच्या बालपणापासून तारुण्यापर्यंत त्याची जिवापाड सोबत करतो. त्याच्या प्रेयसीशीही मैत्री करतो. पुढे इथनच्या घरात कटू प्रसंग निर्माण होतात. एका निर्णायक क्षणी या कुत्र्याला टाकून इथनला शिक्षणासाठी शहरगावी जावे लागते. त्याच्या जाण्यानंतर काही दिवसांतच बेलीचा झुरून त्यात मृत्यू होतो. काही क्षणांनंतर हा निवेदक पुन्हा नव्या जन्माच्या फेऱ्याद्वारे या जगात दाखल होतो. आता तो जर्मन शेफर्ड जातीची कुत्री असतो; पण त्याच्या डोक्यातील इथन आणि बेलीच्या आयुष्यातील स्मृती लख्ख ताजी असते. एली नावाची ही कुत्री डॉग स्क्व्ॉडमध्ये विविध पराक्रम गाजवून आपल्यासह आपल्या पोलीस दलातील मालकाला वृत्तपत्रांच्या पानांत झळकवत असते. एका धाडस प्रसंगात गुन्हेगाराच्या गोळीत ही एली ठार होते; पण पुन्हा नव्या जन्मात श्वाननिवेदक आधीच्या दोन्ही जन्मांच्या स्मृती घेऊन सादर होतो. ‘पेम्ब्रोश वेल्श कॉर्गी’ या बुटक्या जातीचे श्वान १९८० तील कृष्णवर्णीय तरुणी मालकिणीकडे पोसले जाते. तिथे आपल्या इमानइतबारीची कारकीर्द पूर्ण करून त्याचा सेण्ट बर्नाड जातीच्या कुत्र्यात पुनर्जन्म होतो.

दरेक जन्मानंतर या निवेदकश्वानाला आपल्या आयुष्याचा हेतू काय, आपल्या जन्माचे महत्त्व काय, कोणता हेतू साध्य करण्यासाठी पुन:पुन्हा आपल्याला सुख-दु:खाच्या आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून परत-परत जावे लागते, असले प्रश्न पडत राहतात.

अमेरिकी कुटुंबव्यवस्थेच्या साठोत्तरी विघटन आरंभाच्या अवस्थेपासून ते व्यक्तिवादी विचारसरणीचा, एकलकोंडी सुख शोधणाऱ्या आजच्या पिढीपर्यंतचे मानवी दर्शन या श्वानांच्या नजरेतून स्पष्ट होते. दरेक दशकातल्या श्वानपालनातील ट्रेण्ड्सचा अभ्यास करून यातील कुत्र्यांच्या जाती ठरविल्या असाव्यात. यातला प्रत्येक श्वानमालक भरल्या घरातही एकटेपणाशी झुंजताना दिसतो. माणूस आणि श्वान यांच्या नात्याचे गहिरे क्षण चित्रपटात तयार करण्यात आले आहेत. अर्थात आपले भागधेय शोधून काढण्यासाठीचा या श्वानाचा आटापिटा एका निश्चित वळणावर येऊन ठेपतो, हॉलस्ट्रमच्या चित्रपटांतील खास वैशिष्टय़ांनी हे वळण पूर्ण होते. श्वाननजरेतून मानवाच्या अर्वाचीन समाजेतिहासाचा हा शोध आहे.

पेट्स बाळगण्याचे प्रमाण जगभरात वाढत चालले आहे, तितकेच पाळीव प्राण्यांवरील चित्रपटही जोमाने येत आहेत. आपल्याकडच्या श्वान बाजारपेठेला कधी नव्हे इतकी झळाळी आलेली असताना, श्वान चित्रपटांचे हे अद्ययावत रूप इथल्या प्रेक्षकांनाही आवडेल. चोवीस तास छोटय़ा-मोठय़ा पडद्यांवर चालणाऱ्या मेलोड्रामाहून या चित्रपटातील मेलोड्रामा अंमळ वरच्या दर्जाचा आहे.