३ फेब्रुवारीला संगीतमय सोहळा

तबलानवाज उस्ताद अल्लारखाँ यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अ होमेज टू अब्बाजी’ या संगीतमय सोहळ्याचे यंदाचे सतरावे वर्ष आहे. यावर्षी ३ फेब्रुवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात दिवसभर हा सुरेल सोहळा रंगणार आहे. या १६ वर्षांत भारतातील आणि आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातील नामवंत कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन जगभरच्या संगीतातील विविध परंपरा आणि तालांचा भारतीय संगीत परंपरेशी सुमधुर मेळ घातला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतविश्वात अशी अभिव्यक्ती साधण्याचे भाग्य आपल्याला मिळते, अशी कृतज्ञता उस्ताद झाकीर हुसैन यांनी व्यक्त केली.

ravi04r‘अ होमेज टु अब्बाजी, उस्ताद अल्लारखाँ’ हा कार्यक्रम ‘ताजमहल चहा’, ‘रिलायन्स फाऊंडेशन’ यांनी सादर केला असून ‘एलआयसी’ आणि ‘कोटक महिंद्रा ए एम सी लिमिटेड’ हे सहप्रायोजक आहेत. हा कार्यक्रम तीन सत्रांत पार पडणार असून खुद्द झाकीर हुसैन या तिन्ही सत्रांचे संयोजक आहेत. नामवंत कलाकार आणि ‘उस्ताद अल्लारखाँ इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’मधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. पहाटे साडेसहा वाजता ‘ताल प्रणाम’ने कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. यात राहुल शर्मा संतूरवादन करतील, तर परवीन सुलताना यांचे गायन होणार आहे. सकाळी ११.३० वाजता ‘ताल तपस्ये’ला सुरुवात होईल. यात शिवामणी, अक्रम खान आणि विद्यार्थी तबलावादन सादर करतील.

संध्याकाळच्या साडेसहाच्या सत्रात ‘जॅम सेशन’ असून त्याचे संचालन झाकीर हुसैन करणार आहेत. यात डेव हॉलंड (बास), ख्रिस पॉटर (सॅक्सोफोन), लुई बँक्स (कीबोर्ड), शंकर महादेवन (गायन), संजय दिवेचा (गिटार), जिनो बॅक्स (ड्रम्स) यांचा सहभाग असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या संयुगाचे बीज माझ्या आधीच मांडले गेले होते.  रवी शंकर, उस्ताद अल्लारखाँ आणि इतर बॉलीवूडमधील संगीत दिग्दर्शक यांनी अशा तऱ्हेच्या संगीतातील एकत्रीकरणाच्या अभिव्यक्तीवर काम केले होते. हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निमित्तमात्र ठरलो आहोत’, अशा शब्दांत झाकीर हुसैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.