देमार हाणामारी, स्पेशल इफेक्ट्सचे बीग बजेट सिनेमा यानंतर आपल्या चित्रगृहांमध्ये भयपटांचा क्रमांक लागतो. पण दरवेळी चांगला भूतपट पाहायला मिळण्याची शक्यता कमी असते. ११९९ साली आलेल्या ‘ब्लेअर विच प्रोजेक्ट’ या चित्रपटानंतर भयपट एकतर पडद्यावर काहीच न दाखविता भीती निर्माण करणारे असतात किंवा राक्षसांचे खूप ओंगळ चेहरे सारखेच दाखवत भीतीची मात्रा कमी करणारे असतात. गेल्या वर्षी पडद्यावर आल्यावर टीका झालेला, मात्र सध्या बऱ्यापैकी ‘कल्टहीट’ बनून माध्यमांवर गाजत असलेला ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ याबाबतीत खूपच मध्यममार्ग काढणारा म्हणावा लागेल.

‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ला पाश्र्वभूमी आहे ती समाजमाध्यमावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकची. सध्या या समाजमाध्यमाच्या वापरकर्त्यांची त्याकडे जाण्याची ओढ अन् त्यावाचून अडण्याची स्थिती पाहता, हे माध्यम माणसांचा खाऊ पाहणारा वेळच भयावह प्रकार आहे. सायमन व्हरहोवन या दिग्दर्शकाने या गोष्टीला एका चांगल्या भूतपटात रूपांतरित केले आहे.

चित्रपटाला सुरुवात होते लॉरा (अ‍ॅलिशिया डेबनम कॅरी) या सुस्वरूप समाजमाध्यमवीर तरुणीच्या खुशालचेंडू जगण्यातील घटकांनी. आपल्या कॉलेजमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्ये अत्यंत लोकप्रिय असतानाच तिच्या फेसबुक स्टेट्सवर वाढणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या आकडय़ांचा आलेखही चढता आहे. वास्तव आयुष्यात तिचा बॉयफ्रेण्डही आहे आणि सोबत राहणाऱ्या दोन लाडक्या मैत्रिणीही. फेसबुकवरील पोस्ट्सवरून आणि मित्रसंख्येवरून व्यक्तीचा आडाखा मांडणाऱ्या लॉराच्या आयुष्यातील या सुखचित्रामध्ये एकाएकी अमूलाग्र बदल होतो. तिच्या वर्गातीलच मरिना (लिसल आरल्स) नावाच्या एका विचित्र मुलीशी तिची फेसबुकवर गाठ पडते. लॉराचे मरिनाविषयीचे कुतूहल वाढण्यास तिची शून्य मित्रसंख्या अधिक कारणीभूत असते. लॉरा सहानभूती म्हणून तातडीने मरिनाशी फेसबुकवर मैत्री करते. फेसबुकवरील इतर मित्र-मैत्रिणींसारखीच तिच्या लेखी मरिनाची मैत्री असते. मात्र लादलेल्या एकटेपणात गूढविद्येचा अवलंब करणारी मरिना लॉराला नको असतानाही घनिष्ट मैत्रीची अपेक्षा ठेवते. याचा परिणाम कॉलेजमध्ये लॉराकडून मरिनाचा अजाणतेपणी अपमानात होतो. या अपमानाने दुखावलेली मरिना आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलते. त्यानंतर काहीच दिवसांत लॉराच्या सुखचित्राचा आलेख घसरण्यास सुरुवात होते, कारण मरिनाचे भूत फेसबुकवरूनच तिच्या मानगुटीवर बसते.

या चित्रपटाचा आराखडा टीनहॉरर सिनेमांसारखाच आहे. ज्यात पिकनिकसाठी किंवा मौजेसाठी जमलेल्या चित्रपटातील तरुणांची एकामागोमाग हत्या केली जाते. फक्त इथे पिकनिक आणि मौजेची जागा फेसबुकने घेतली आहे. त्यामुळे लॉराच्या अवतीभवती असलेल्या जिवलग मित्रमंडळींना मरिनाचे भूत टिपायला सुरुवात करते. वर त्या सर्व हत्या प्रकारांचे व्हीडिओ मरिना लॉराच्या फेसबुक अकाउंटवरून अपलोड करत सुटते. लॉराला आपल्या फेसबुकवरील अकाउंटचा ताबा अज्ञात शक्तीने घेतल्याचे लक्षात येते. ती हरप्रकारे फेसबुकपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, पण मरिनाची कृत्ये तिला पुन:पुन्हा फेसबुकवर आणतात. दर वेळी आपल्याला तिच्या फेसबुकवरील मित्रसंख्येची घटती गणना लक्षात येते.

‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ त्याच्या रचनेमध्ये दोन्ही मार्गाचा वापर करतो. पहिला मार्ग लॉराच्या आयुष्यावर मरिनाने केलेला शिरकाव दाखविताना लॉराचे ओंगळवाणे भूत दाखविण्याचा अन् दुसरा त्याहून लॉरासाठी भीतीदायक असलेला. तिची फेसबुक अकाउंटवरील घटत चाललेली मित्रसंख्या आणि तिची कॉलेज आणि समाजात घटत चाललेली वास्तव प्रतिमा दाखविण्याचा. मरिनाचे भूत सूड म्हणून लॉराला फेसबुकी आणि वास्तव आयुष्यात एकटे पाडण्याचे उद्योग करीत सुटते आणि लॉरा तिच्या पूर्वआयुष्याचा शोध घेण्यासाठी मित्राला घेऊन आडगावात येऊन पडते. त्यातून गोष्टी खूपच कठीण बनत जातात.

फ्रेण्ड रिक्वेस्टचा वेगळेपणा हा की त्यात सर्वसाधारण टिन  हॉररचे सर्व चढ-उतार असूनही तो उत्तम भयपट आहे. आज फेसबुकशी एकरूप झालेली पिढी वेगाने त्याची व्यसनाधीन होत आहे आणि या आभासी जगावरच्या अपेक्षाभंगांनी अधिक एककल्लीपणाकडे झुकत आहे, त्या सर्वाचे रूपक येथे आणले आहे. जाणूनबुजून दुसऱ्याच्या आयुष्यात शिरल्यानंतर आपल्या आयुष्यात काय घडू शकते, त्यातून वाढत्या अपेक्षा कोणत्या थराला जाऊ शकतात आणि या सर्वातून जगणे किती भीषण बनू शकते, याचा एकप्रकारे भयआढावाच या चित्रपटामध्ये घेण्यात आलेला आहे. ब्लेअर विच प्रोजेक्टनंतर ‘फाइंड फुटेज’ या प्रकाराचा जो सुळसुळाट झाला, त्यात बदल म्हणून सोशल नेटवर्किंग साइट्चा भयपटांसाठी वापर गेल्या दोन-तीन वर्षांत वाढला आहे. फ्रेण्ड रिक्वेस्ट हा फेसभूतपट त्यातले चांगले उदाहरण आहे. फेसबुक वापरणाऱ्या प्रत्येकाला तो आवडेल, यात शंका नाही.