‘हृदयांतर’ या प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करते आहे. या भूमिकेच्या निमित्ताने आपल्याला लहानाचं मोठं करताना आईला कुठल्या स्थित्यंतरांमधून जावं लागलं असेल, याची पहिल्यांदा जाणीव झाल्याचे मुक्ताने सांगितले. नाही म्हणायला याआधी तिने ‘वायझेड’ चित्रपटातही आईची भूमिका केली होती, मात्र ती खूपच छोटी होती. ‘हृदयांतर’मध्ये पहिल्यांदाच तिने इतकी मोठी भूमिका केली आहे.

आज मातृदिन असल्याने मुक्ताने आपल्या पडद्यावरच्या दोन मुलींबरोबर खास छायाचित्र काढून घेतलं आहे. आई आणि मुलींचं नातं हे मैत्रिणीसारखं असावं असं सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुक्ताला ‘हृदयांतर’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटत होतं. हा चित्रपट मुक्ताच्या आईने पाहिला आणि तिने थेट दिग्दर्शकाला जाऊन ‘तुझ्या चित्रपटाने मला नि:शब्द केले’, अशी प्रतिक्रि या दिली. आईची ही प्रतिक्रिया ऐकून या चित्रपटाबद्दलचा आपला आत्मविश्वास बळावला असल्याचं मुक्ता सांगते.