‘सिंघम रिटर्न्‍स’ आणि या चित्रपटाबरोबर अजय देवगणही परतला आहे, असं म्हणावं लागेल. दरम्यानच्या काळात अजयने साजिद खान दिग्दर्शित ‘हिम्मतवाला’ केला आणि प्रकाश झा दिग्दर्शित ‘सत्याग्रह’ केला. या दोन्ही चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला. त्यामुळे ‘सन ऑफ सरदार’नंतर खरं तर आता अजय देवगण आपल्या हुकमी एक्का रोहित शेट्टीच्या मदतीने ब्रॅण्ड ‘सिंघम’ घेऊन परत आला आहे. मात्र यावेळी गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण याच त्याच्या मित्राने म्हणजे रोहितने शाहरूख खानबरोबर ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारखा सुपरहिट चित्रपट दिला आहे. ज्या शाहरूखबरोबर अजयचे भांडण झाले होते तो शाहरूख आता रोहितचाही खास मित्र आहे. मग शाहरूखही अजयचा चांगला मित्र होणार का?
अजय देवगणला शाहरूखबद्दल प्रश्न विचारला की तो प्रामाणिकपणे उत्तर देतो, ‘शाहरूख माझा मित्र कधीच नव्हता. त्यामुळे आमच्यात दुश्मनी होण्याचाही प्रश्न येत नाही’. बॉलीवूडमधील माझ्या इतर सहकलाकारांप्रमाणे शाहरूख खानही माझा चांगला सहकलाकार आहे. आम्ही समोरासमोर आलो की एकमेकांशी बोलतो. गप्पा मारतो. पण म्हणून आमच्या दोघांमध्ये मैत्री कधीच नव्हती, असे सांगणारा अजय त्याच वेळी हेही स्पष्ट करतो की ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाच्या वेळी झालेला वाद हा माझ्यात आणि शाहरूखमध्ये नव्हता. तो वाद ‘जब तक है जान’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ‘यशराज फिल्म्स’ आणि ‘अजय देवगण फिल्म्स’ या दोन निर्मितीसंस्थांमधला होता. त्यात व्यावसायिकतेचा प्रश्न होता. दोन्ही निर्मितीसंस्थांना आपल्या चित्रपटांना चांगले आणि जास्तीत जास्त शो मिळावेत, असे वाटत होते. त्यामुळे तो वाद झाला होता. यात शाहरूखचा कुठेच संबंध येत नाही, असे अजयने स्पष्ट केले.
‘सिंघम’ यशस्वी झाला तेव्हाच ‘सिंघम रिटर्न्‍स’चा घाट घातला गेला होता. मात्र तुमचा चित्रपट खूप यशस्वी झाला की त्याचा सिक्वल करताना तुमची जबाबदारी अधिक वाढते, असे अजयने सांगितले. त्यामुळे ‘सिंघम’ हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. तरीही सिक्वल करताना दाक्षिणात्य ‘सिंघम २’चा आधार घेतलेला नाही. ‘सिंघम रिटर्न्‍स’ हा सिक्वल आहे, रिमेक नाही, असे अजयने स्पष्ट केले. ‘सिंघम रिटर्न्‍स’मध्ये बाजीराव काळ्या पैशाविरुद्ध लढताना दिसणार आहे. एवढा मोठा विषय घेण्यामागचे कारण विचारल्यावर बाजीरावची व्यक्तिरेखा ही खूप साधी, सरळ होती. त्याच्यापुढचा संघर्षही छोटा होता. ‘सिंघम’मध्ये पोलिसांचे नीतीधैर्य उंचावण्याचे काम बाजीरावच्या माध्यमातून करण्यात आले होते, असे अजय सांगतो. ती कथा तिथेच संपली होती. त्यामुळे आता सिंघमला पुन्हा आणायचं असेल तर तिथून पुढे नेताना फार वेगळा विचार करणं आवश्यक होतं. कारण सिंघमने स्वत:ची एक अशी ओळख निर्माण केली आहे की, या व्यक्तिरेखेकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि आता देशात जी मुख्य समस्या आहे ती या काळ्या पैशाचीच आहे. त्यामुळे सिंघमला या समस्येशी जोडणारी कथा मांडण्यात आल्याचे अजयने सांगितले.
या चित्रपटात बाजीराव हा मुंबई पोलीस अधिकारी म्हणून काम करणार आहे. तो पहिल्यापेक्षा अधिक बुद्धीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काळ्या पैशाविरुद्ध लढा उभारताना दिसणार असल्याचेही अजयने सांगितले. ‘सिंघम रिटर्न्‍स’ चित्रपटात करिना क पूर-खान ही अजयची नायिका असणार आहे. या जोडगोळीचा ‘गोलमाल २’ हिट ठरला होता. ‘सत्याग्रह’मध्येही ते दोघे एकत्र होते, पण चित्रपटच चालला नाही. अजयबरोबर पडद्यावर रोमान्स करताना धम्माल येते, असे करिनाने मुलाखतीदरम्यान म्हटले होते. अजय मात्र यावर एक स्मितहास्य करत उत्तर देतो. करिनाची आणि माझी फार आधीपासूनची ओळख आहे. याआधीही आम्ही एकत्र चित्रपट केलेत. त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना नेहमीच एक मोकळेपणा असतो. या चित्रपटात करिनाने धम्माल केली असल्याचे अजयने सांगितले. करिनाही या चित्रपटात एका मराठी तरुणीची भूमिका करते आहे. ती पहिल्यांदाच एका हेअर स्टायलिस्टच्या भूमिकेत आहे, तिचं स्वत:चं असं छोटं पार्लर आहे. करिना या चित्रपटात मराठीत भरपूर शिव्या घालताना दिसणार आहे, असेही तो म्हणाला.
‘सिंघम रिटर्न्‍स’ चित्रपटही तिकीटबारीवर ‘सिंघम’सारखीच धमाल उडवून देईल, अशी अपेक्षा अजयला आहे. पण चित्रपटाचे यशअपयश हे वेगळेच गणित असल्याचे तो सांगतो. ‘हिम्मतवाला’चा त्याच नावाने रिमेक करताना त्याही चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. ‘हमशकल’ चित्रपट चालला तरी साजिद खानच्या चित्रपटांवर टीका होतेच. खुद्द सैफ अली खाननेही ‘हमशकल’ ही आपली चूक होती, असे म्हटले आहे. ‘हिम्मतवाला’च्या बाबतीत अजयलाही तसेच वाटते का? असे विचारल्यावर त्या चित्रपटाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी चुकल्या हे तो मान्य करतो. पण चित्रपट चालला नाही याबद्दल दिग्दर्शक साजिद खानला आपण पूर्ण दोष देणार नाही, हेही त्याने स्पष्ट के ले. चित्रपट हे टीमवर्क असते. एखादा चित्रपट चालला नाही म्हणून टीका करण्यात अर्थ नाही, असे सांगत यापुढेही चांगली कथा मिळाली तर साजिदबोरबर काम करणार असे तो म्हणाला. ‘सिंघम’ लोकांनाच नाही तर पोलिसांनाही खूप भावला, याबद्दल तो आनंद व्यक्त करतो. म्हणूनच १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम रिटर्न्‍स’चेही लोकांकडून चांगले स्वागत होईल, अशी अपेक्षाही तो व्यक्त करतो.
“शाहरूख माझा मित्र कधीच नव्हता. त्यामुळे आमच्यात दुश्मनी होण्याचाही प्रश्न येत नाही’. बॉलीवूडमधील माझ्या इतर सहकलाकारांप्रमाणे शाहरूख खानही माझा चांगला सहकलाकार आहे. आम्ही समोरासमोर आलो की एकमेकांशी बोलतो. गप्पा मारतो. पण म्हणून आमच्या दोघांमध्ये मैत्री कधीच नव्हती.”
अजय देवगण