अभिनेता हृतिक रोशनची व कंगना रणौत यांच्यातील वाद जगजाहिर आहे. या वादानंतर काही जणांनी कंगनाचा विरोध केला तर काही तिच्या पाठिशी उभे राहिले. आता खुद्द हृतिकची बहिण सुनैना रोशनने कंगनाला पाठिंबा दर्शविला आहे. ‘माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं ट्विट सुनैनाने केलं आहे.
सुनैना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुनैना दुभंगलेलं व्यक्तीमत्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने ग्रस्त असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. काही दिवसांपूर्वी कंगनाची बहिण रंगोली हिने सुनैनाबाबत ट्विट केलं होतं. कदाचित त्यानंतर सुनैनाने कंगनाला पाठिंबा देण्यासाठी हे ट्विट केल्याचं समजत आहे. ‘हृतिकने कंगनाला सोडल्यानंतर सुनैनाला आमची मदत करत आली नाही किंवा आमची बाजू घेता आलं नाही यासाठी तिने अनेकदा फोन करून माफी मागितली,’ असं रंगोलीने ट्विट केलं होतं.
I support Kangana all through
— Sunaina Roshan (@sunainaRoshan22) June 18, 2019
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुनैना व मी चांगल्या मैत्रिणी आहोत असं कंगनाने स्पष्ट केलं होतं. सुनैनाने जरी आता कंगनाला पाठिंबा दर्शविला असला तरी हृतिक व सुनैना यांच्यात काही वाद आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हृतिक व कुटुंबीयांशी असलेल्या वादामुळे सुनैनाने आता मौन सोडलं आहे असं नेटकरी म्हणत आहे. तर काहींनी उशिरा का होईना कंगनाच्या बाजूने उभं राहिल्याबद्दल सुनैनाचे आभार मानले आहेत.