‘‘ययाति’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘तुघलक’ यांसारख्या नाटकांतून जरी मी मिथकं, इतिहास वा पुराणकथांचा आधार घेतला असला तरी जुन्या नाटक कंपन्यांप्रमाणे या कथांच्या रंजक सादरीकरणात मला अजिबात रस नव्हता. उलट, माझ्या या सुरुवातीच्या नाटकांतून त्याआडून समकालीन प्रश्न व समस्या मांडण्याचाच माझा प्रयत्न राहिला. अर्थात लेखकाचा म्हणून जो एक नैसर्गिक प्रवास वा त्याच्या लेखनात कालानुरूप जी स्थित्यंतरं अटळपणे होत असतात, त्यानुसार माझंही लेखन पुढच्या काळात बदलत गेलं. अलीकडच्या माझ्या नाटकांतून मी थेटपणे आजच्या वास्तवाला भिडताना दिसतो, ते त्यामुळेच. ‘ब्रोकन इमेजेस’, ‘वेडिंग अल्बम’, ‘फ्लॉवर्स’ किंवा आता लिलिट् दुबे सादर करीत असलेल्या ‘बॉइल्ड बीन्स ऑन टोस्ट’ या नाटकांतून याचा प्रत्यय कुणालाही येईल. मिथकाधारित नाटकं ही त्या काळाची निकड होती. आज मला तशी नाटकं लिहावीशी वाटत नाहीत..’ ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त नाटककार गिरीश कर्नाड आपल्या नव्या नाटय़ावताराबद्दल सांगत होते. आज, रविवार, २० एप्रिल रोजी टाटा थिएटरमध्ये त्यांच्या ‘बॉइल्ड बीन्स ऑन टोस्ट’चा पहिला प्रयोग सादर होत आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याशी केलेल्या गप्पांमध्ये या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेबरोबरच वर्तमान भारतीय रंगभूमीसमोरील आव्हानांबद्दलही ते विस्तारानं बोलले. त्यांनी मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या या नाटकाचं हे इंग्रजी रूप! मराठीत प्रदीप वैद्य यांनी ‘उणे पुरे शहर एक’ नावानं यापूर्वीच त्याचा अनुवाद केला आहे आणि ‘आसक्त, पुणे’तर्फे दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी ते याआधीच मंचित केलेलं आहे. ‘मोहित टाकळकरने माझ्या या नाटकाला पुरेपूर न्याय दिला आहे. माझ्या या नाटकाचा मराठी प्रयोग अप्रतिम सादर होतो. गिरीश कर्नाडांचं हे अनुवादित नाटक आहे असं सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही, इतका दृष्ट लागण्याइतपत हा प्रयोग सुंदर आहे..’ कर्नाड ‘बॉइल्ड बीन्स’च्या मराठी रूपांतराची मुक्त कंठाने प्रशंसा करतात. ‘गेल्या वीसेक वर्षांत म्हणजे जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे वारे आपल्याकडे वाहू लागल्यानंतर भारतातील अनेक छोटय़ा शहरांचा विलक्षण झपाटय़ाने कायापालट झाला. बेंगलुरू, पुणे, चंदिगढ, अहमदाबाद, हैदराबाद.. तत्पूर्वी काहीशी निवांतपणे वाढणारी ही शहरं गेल्या काही वर्षांत ओळखताही येऊ नयेत इतकी आमूलाग्र बदललीयत. आजही ही प्रक्रिया सुरू आहे. तीसेक वर्षांमागे मी बेंगलुरूला आलो ते एका छोटय़ाशा गावातून. त्यावेळच्या त्या शांत, निवांत बेंगलुरूनं मला मोहिनी घातली. मला आपल्यात सामावून घेतलं. तोवर माझी घडण निमशहरी मानसिकतेत झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या २० वर्षांत या शहरानं जी विलक्षण कात टाकलीय, त्या झंझावाती वेगानं मी हबकून गेलो आहे. याचा अर्थ जुन्या बेंगलुरूच्या गतरम्यतेत (नॉस्टेल्जिया) मला रमायचंय किंवा होत असलेले हे बदल अनिष्टच आहेत असं मला बिलकूल म्हणायचं नाही. परंतु हे बदल समजून घेताना मला जे जाणवतं, किंवा ज्या मानसिकतेतून मी आज जातो आहे, ती मला कुठंतरी व्यक्त करावीशी वाटत होती. अभिव्यक्तीच्या या निकडीतूनच माझं हे नाटक आकाराला आलं आहे. एका झपाटय़ानं बदललेल्या शहराची, तिथल्या माणसांची ही गोष्ट आहे.’‘आज बेंगलुरू काय किंवा तत्सम बदलणारी छोटी शहरं काय, आपला मूळ चेहरा हरवून बसली आहेत. या शहरात इतकी र्वष राहणारा माझा मीच स्वत:ला ओळखू येईनासा झालेलो आहे. पोटापाण्यासाठी वा अन्य कारणानं इथं येणाऱ्यांचं या शहराशी कुठलंही नातं नाही. या शहराबद्दल त्यांच्या अशा कुठल्या भावना नाहीत. केवळ जगणं आणि स्वप्नांपाठी धावणं, हेच त्यांचं भागधेय असल्याचं मला जाणवतं. कुठल्या मूल्यांशी त्यांची बांधीलकी दिसत नाही. त्याबद्दल विचार करायलाही त्यांच्यापाशी फुरसत नाही. मूळं उखडलेले हे लोक अस्तित्वासाठी, आपल्या जगण्याला पूर्णत्व लाभावं म्हणून संघर्ष करताहेत. या घुसळणीतून एक वेगळीच व्यामिश्र संस्कृती जन्माला येते आहे. या शहरांच्या आश्रयाला आलेल्या विविध स्तरांतल्या माणसांचं तसंच इथं वास्तव्यास असलेल्या आणि पूर्वी वेगळ्या आर्थिक-सांस्कृतिक स्तरांत जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या उलथापालथींबद्दल मला कमालीचं औत्सुक्य आहे. त्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न मी ‘बॉइल्ड बीन्स..’मध्ये केला आहे. हे करत असताना ‘गेले ते दिन गेले’ छाप सुस्कारे मी सोडत नाही. कुणास ठाऊक, या बदलांतून पुढे चांगलंच निष्पन्न होईल.’तब्बल २१ पात्रांच्या या नाटकात समाजाच्या वेगवेगळ्या आर्थिक व सांस्कृतिक स्तरांतली माणसं कर्नाडांनी चित्रित केलेली आहेत. त्यांचं जगणं, त्यांचे बदलते अग्रक्रम, त्यांच्या जीवनजाणिवा, त्यांचा अस्तित्वाचा संघर्ष आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न व समस्या.. हे सारं समजून घेण्याचा, ते व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अर्थात याचा अर्थ हे नाटक अत्यंत गंभीर, समस्याप्रधान वगैरे आहे असं नाही; तर कर्नाडांनी हसतखेळत हे शहरवास्तव मांडलेलं आहे. ‘वास्तववादी नाटकांतून समाजातील प्रश्न व समस्याच मांडायला हव्यात असं नाही. परंतु आपल्या नाटककारांनी उगीचच तसा समज करून घेतला आहे. जगणं समजून घेणं म्हणजेही वास्तवाला भिडणंच असतं; जे महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये त्यांनी केलं आहे. ‘वाडा चिरेबंदी’मध्ये लेखकाला कशावर वा कुणावर भाष्य करायचं नाहीए, किंवा कुणाच्या वर्तनाचा न्यायनिवाडासुद्धा त्यांनी केलेला नाही. मला ‘बॉइल्ड बीन्स..’मध्ये हेच अपेक्षित आहे..’ कर्नाड वास्तववादी नाटकांबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करतात. १९६०-७० च्या दशकांत भारतीय रंगभूमीचा चेहरामोहरा घडविण्यामध्ये विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार यांच्याबरोबर गिरीश कर्नाडांचाही सिंहाचा वाटा आहे. परंतु त्यानंतरच्या काळात ‘भारतीय रंगभूमी’ नावाची एकजिनसी चीज कुठंच दिसत नाही. याबद्दल त्यांना छेडलं असता ते म्हणाले, ‘खरंय. त्याकाळी ते घडू शकलं याचं कारण तेव्हा टीव्ही नव्हता. कलात्मक समाधानासाठी आम्ही लिहीत होतो. आणि रसिकही त्याच ओढीनं त्याचं स्वागत करत होते. पुढे टीव्ही आणि दूरचित्रवाहिन्यांचं पेव फुटलं आणि सगळं चित्रच बदललं. त्यांनी प्रायोगिक नाटकांची चळवळ संपवली. नाटकांचा प्रेक्षकही हरवला. समर्पित रंगकर्मीही या बहुगलबल्यात मार्ग भरकटले. टीव्हीच्या या भस्मासुराला २४ तास सतत खाद्य पुरवावं लागतं. त्याच्या खातीरदारीत सृजनशील कलावंत लागले. त्यातून त्यांना आर्थिक स्थैर्य, मानमान्यता वगैरे लाभली खरी; परंतु त्यांच्यातली सृजनशक्ती या बकासुरानं फस्त केली. टीव्हीसाठी रतीब घालता घालताच त्यांची इतकी दमछाक होते, की त्यावेगळं अन्य काही तरल, संवेदनशील लिहिणं/ करणं त्यांच्याच्यानं शक्य होत नाही. आज त्यांचे अग्रक्रमही बदलले आहेत. गाडी, घर, प्रॉपर्टी, बॅंक बॅलन्स यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व आलेलं आहे. अर्थात त्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही. कारण आपल्या ठायी असलेल्या सृजनक्षमतेवरच त्यांना भविष्यासाठी तरतूद करून ठेवायची आहे. असुरक्षिततेच्या भावनेतूनच त्यांचं हे जीवघेणं धावणं सुरू आहे. त्यामुळे चिरंतन असं आपल्या हातून काहीतरी निर्माण व्हावं, असा विचार करायलाही त्यांना आज वेळ नाही.’ ‘दुसरीकडे शहराच्या प्रचंड वाढत्या पसाऱ्यामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या समस्यांमुळे हैराण झालेल्या माणसांना नाटक वा अन्य कुठल्या कलेच्या आस्वादासाठी सायास करण्याचं त्राण उरलेलं नाही. तशात घरबसल्या टीव्हीसारखं विनासायास रंजनाचं माध्यम उपलब्ध असल्यानं प्रचंड दगदग करत घरी परतल्यावर पुन्हा नाटक-सिनेमाकरता घराबाहेर पडणं आता लोकांना नको वाटतं. अर्थात टीव्हीवरचे कार्यक्रम नाटक वा इतर कलांपेक्षा चांगले असतात म्हणून पाहिले जात नाहीत, तर विनासायास ते पाह्य़ला मिळतात म्हणून ते पाहिले जातात. त्यात सवयीचा भागही असतो. म्हैसूर, दावणगिरीसारख्या छोटय़ा शहरांतून काही ग्रुप्स नाटकं करतात, कारण तिथं हा टीव्हीचा भस्मासुर नाही. परंतु त्यांचं नाटक तिथंच संपतं. याचं कारण त्यांच्यापुढच्या आर्थिक अडचणी! ते बेंगलुरूत नाटक करू शकत नाहीत. कारण त्यांना ते परवडत नाही. अशी एकूण आजच्या रंगभूमीची अवस्था आहे. तिथं कसली अपेक्षा करणार? महाराष्ट्रात काही तरुण रंगकर्मी या प्रलोभनांपासून जाणीवपूर्वक दूर राहून नाटकं करताना दिसतात, याचं समाधान वाटतं..’ कर्नाडांचं रंगभूमीच्या सद्य:स्थितीबद्दलचं अवलोकन किती टोकदार आहे याचा प्रत्यय त्यांच्या या वक्तव्यातून येतो.