अभिनेता अक्षय कुमार दोन दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहे. अॅक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयनं गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या भूमिका करत बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘एअर लिफ्ट’, ‘रुस्तम’, ‘हॉलिडे’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटातून अक्षयनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. केवळ अॅक्शन फिल्म पुरता मर्यादीत न राहता प्रेमकथा, विनोदी चित्रपटही त्यानं केले आणि यातही प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवण्यास तो यशस्वी झाला. मात्र ऐकेकाळी सतत एकाचप्रकारेच चित्रपट करुन मला स्वत:ची लाज वाटू लागली होती असं तो म्हणाला.

अक्षयनं सुरूवातीच्या काळात अनेक अॅक्शनपट केले. ‘एक चित्रपट यशस्वी झाल्यानंतर मला तशाच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या. मी रोमँटिक चित्रपट करू शकतो यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मला रोमँटिक चित्रपटात काम मिळत नव्हतं. एकाच प्रकाराच्या भूमिका करून मलाच स्वत:ची लाज वाटू लागली होती.’ असं अक्षय ‘केसरी’च्या प्रमोशनदरम्यान म्हणाला.

अक्षय नंतर साचेबद्ध भूमिकांमधून बाहेर पडला. ‘हेराफेरी’, ‘हेराफेरी २’ , ‘भागम भाग’, ‘हाऊस फुल’ यांसारख्या विनोदी चित्रपटातून त्यानं भूमिका साकारल्या. हे सर्वच चित्रपट सुपरहिट चित्रपट ठरले. त्यानंतर विनोदी चित्रपट आणि अक्षय कुमार असं नवं समीकरण तयार झालं मात्र स्वत:ला विनोदी भूमिकांमध्येही बांधून न ठेवता अक्षयनं सामाजिक विषयांवरील चित्रपटात काम करायला सुरूवात केली.