सनी लिओनीचा भुतकाळ हा माझ्यासाठी अडचण नाही, त्यामुळे मला भविष्यात तिच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल, असे अभिनेता आमिर खान याने सांगितले. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान, सनी लिओनीला कटू प्रश्नांचा सामना करावा लागला होता. तुला आमिर खानसोबत काम करायला आवडेल असे तु नेहमी म्हणतेस, मात्र तो तुझ्याबरोबर काम करायला तयार होईल का, असा प्रश्न यावेळी सनीला विचारण्यात आला. तेव्हा सनी लिओनीने या प्रश्नाला खेळकरपणे उत्तर नेत वेळ मारून नेली. दरम्यान, ही मुलाखत जेव्हा आमिरच्या पाहण्यात आली तेव्हा त्याने ट्विट करून सनी लिओनीला मला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल असे सांगितले. मुलाखतीदरम्यान, सूत्रसंचालकाकडून तुझ्या भुतकाळाचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला त्याविषयी मला कोणतीही अडचण नसल्याचे आमिरने यावेळी स्पष्ट केले. मात्र, या संपूर्ण मुलाखतीत सनी लिओनीने जितके सौजन्य आणि मोठेपणा दाखवला तेवढेच सौजन्य सूत्रसंचालकाने दाखवले असते तर बरे झाले असते, असे सांगत आमिरने सनीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या ट्विटनंतर सनी लिओनीने आमिरचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.