साऊंड ऑफ म्युझिक
‘एमटीव्ही अनप्लग्ड’च्या सातव्या सीझनमध्ये वाजवलं गेलेलं ऑर्गन तयार केलं होतं आडिवरेच्या बाळा दाते यांनी. हे भारतात तयार झालेलं पहिलंच ऑर्गन. आता त्यांना त्यांचं पेटंट घ्यायचा ध्यास लागला आहे.
संगीत कलेला चिरतरुण राहण्याचं दैवी वरदानच असावं! दर क्षणी उत्स्फूर्ततेतून काही तरी घडत राहणारं, म्हणजे तरुण पिढीच्या भाषेत ‘हॅपनिंग’ असं असलेलं क्षेत्र म्हणजे संगीत.. आजच्या घडीला, नव्याने येणाऱ्या आणि प्रस्थापित असलेल्या संगीत घडामोडींची उदंड मांदियाळी आहे. पण त्यातल्या काही गोष्टी वेधक आणि आश्वासक वाटतात. त्यासाठीचा हा संगीत संवाद या लेखमालेतून करीत राहू.
मनुष्यप्राण्याला निसर्गाने बहाल केलेल्या दोन अफलातून गोष्टी म्हणजे हसणं आणि गाणं! गळ्याच्या दोन स्वरतंतूंमधून खळखळून हसणारा आणि सुरेल स्वर काढणारा माणूस मनाला किती सहज भावतो. कंठातल्या या सप्तसुरांना वाद्यातून उमटविण्याची क्रांती माणसाने नक्की कोणत्या क्षणी केली हे सांगता येणं कठीण आहे, पण त्याच क्षणी संगीतसाम्राज्य खऱ्या अर्थाने भूतलावर अवतरलं असणार. या वाद्यांची निर्मिती खरं तर कंठसंगीतानंतर आणि साथ करण्यासाठी झाली. पण वाद्यसंगीताने झपाटय़ाने प्रगती करीत आपलं शास्त्रीय कला स्थान स्वतंत्रपणे तयार केलं. इलेक्ट्रॉनिक्स जमान्यातील वाद्यांनी तर आता ‘आम्हां वगळता निष्प्रभ होतील तारांगणे’ अशी संगीत कार्यक्रमांची परिस्थिती बनवली आहे. गायकाला वगळूनही वादनाचे कार्यक्रम लोकप्रियता मिळवत आहेत. पं. प्रभाकर जोग यांचं ‘गाणारं व्हायोलिन’, झी मराठी सारेगमप वादकांचा ‘म्युझिशियन’, अमर ओक यांची ‘अमरबन्सी’, डॉ. विद्याधर ओक यांचा ‘हार्मोनियम एक रसास्वाद’ किंवा ‘की बोर्ड कचेरी’, आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू यांची ‘जादूची पेटी’ हे आणि बरेच सिनेसंगीत, भावगीत, नाटय़गीत यांचे वाद्यसंगीताचे स्वतंत्र आविष्कार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. याच यादीतील एक वेगळा, तरुणाईला आवडलेला वाद्य आणि संगीत प्रयोग म्हणजे ‘एमटीव्ही अनप्लग्ड’. हा प्रयोग १ ऑक्टोबर २०११ मध्ये प्रथम सुरू झाला. यामध्ये निवडक जगविख्यात आणि लोकप्रिय ध्वनिवाद्य (अॅकॉस्टिक इंस्ट्रमेंटस्) वाजविणारे वादक आणि गायक यांचा समावेश असतो. या कार्यक्रमातील वाद्यताफा अतिशय आधुनिक आणि सुसज्ज असतो.
लेखात आवर्जून उल्लेख करावा अशी एक गोष्ट ‘एमटीव्ही अनप्लग्ड’च्या सातव्या सीझनमध्ये म्हणजे डिसेंबर १७ मध्ये घडली. हा सीझन होता प्रसिद्ध बॉलीवूड संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल भारद्वाज यांचा. या कार्यक्रमात पहिल्यांदाच ऑर्गन हे वाद्य वाजवलं गेलं आणि हा ऑर्गन बनवला होता कोकणातल्या रत्नागिरीमधल्या आडिवरे गावचे कलाकार उमाशंकर ऊर्फ बाळा दाते यांनी. यानिमित्ताने पुन्हा एकदा संगीत कलेला भाषा आणि प्रांताच्या मर्यादा नसतात हे सिद्ध झालं.
ऑर्गन हे पाश्चात्त्य संगीतामधील अतिशय महत्त्वाचं पण गुंतागुंतीची रचना असलेलं वाद्य. ख्रिस्तपूर्व २८५-२२२ काळात ‘पाण्याचा ऑर्गन’ (वॉटर ऑर्गन) नावाचं वाद्य, शर्यती आणि खेळाच्या वेळी पुरातन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत वाजवलं जायचं. पुढे युरोपातील कॅथलिक चर्चमध्ये या वाद्यानं आपल्या नादमाधुर्याने कायमचं स्थान मिळवलं आणि त्याला घरंदाजपणा आला. या ऑर्गन वाद्याचे, पाइप ऑर्गन, थिएटर ऑर्गन, इलेक्ट्रिक ऑर्गन, हॅमाँड ऑर्गन, अॅलन ऑर्गन, रीड ऑर्गन असे अनेक भाऊबंद आहेत. यातील रीड ऑर्गन आणि भारतीय संगीतातील पेटी किंवा हार्मोनियम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. १७ व्या शतकात रीड ऑर्गनची निर्मिती सुरू झाली असली तरी त्याला हार्मोनियम हे नाव आणि योग्य स्वरूप देण्याचं काम १८४० साली अलेक्झांडर डेबन या फ्रेंच माणसानं केलं आणि पठ्ठय़ाने त्याचं पेटंटही घेऊन टाकलं. युरोपियन माणसांचा हा चटपटीतपणा पाहिला की वाटतं, तंतुवाद्य, सुषिरवाद्य, आघातवाद्य अशा अनेक वाद्यांचं पेटंट आपल्या पूर्वजांनी घेतलं असतं तर भारताला जगभर कर्ज वाटता आलं असतं. असो!
इंग्रज राजवटीत भारतामधील चर्चमध्ये वाजविल्या जाणाऱ्या या धीरगंभीर आणि नादमधुर वाद्याला गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांच्यासारख्या सूररत्नपारखी दिग्गजांनी संगीत रंगभूमीवर सामावून घेतलं आणि एक सुवर्णयुग साकार केलं. पुढे काळाच्या ओघात इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी या गुणवान वाद्याचा नाद दडपला. पण हे होणे संगीतकलेला मान्य नसावं. म्हणूनच या ऑर्गन उत्थापनाचं कार्य घडून आलं आडिवरे गावातील बाळा दाते या मेहनती आणि गुणी कलावंताकडून. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली अडिवरेच्या श्रीदेवी महाकाली मंदिरातील एका भजनाच्या कार्यक्रमात संगीत सुरांशी त्यांचा अनामिक ऋ णानुबंध जुळला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे गुरूकडे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसलेल्या या एकलव्य शिष्याने चक्क नोटेशनची पुस्तकं अािण सीडी यांनाचा आपले गुरू मानले. झपाटून संगीत साधना केली आणि १९९९ साली आकाशवाणीची ऑडिशन पास होऊन राजमान्यतादेखील मिळविली. यानंतर संगीत नाटकांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या ऑर्गन वाद्यांच्या सुरांनी त्यांना जणू वेडच लावलं. ऑर्गन बनवायचा ध्यास त्यांच्या मनाला लागला. भारतात ऑर्गन बनत नसल्यामुळे अनंत धडपडी करून मुंबईला एक ऑर्गन ‘साऊंड बॉक्स’ त्यांनी मिळविला. अमेरिकेतील एका मित्राकडून ५० ऑर्गनचे रिड्स मिळविले आणि अथक परिश्रमाने भारतीय बनावटीचा पहिला ऑर्गन बनविला. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्वक आणि कौशल्यपूर्ण कामाने वाद्यनिर्मितीला नवसंजीवनी दिली आणि कोकणवासीयांना नवीन उद्योगधंद्याची संधी निर्माण करून दिली. ऑर्गनचे ३५ ते ४० किलो वजन हा एक चिंतेचा प्रश्न असतो. यासाठी बनावटीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून १८ किलो वजनाचा ऑर्गन, ठरावीक सप्तकाचा हलता कीबोर्ड असलेला ऑर्गन, घडीचा ऑर्गन असे आत्तापर्यंत ४८ ऑर्गन त्यांनी तयार केले आहेत. आता त्यांना ध्यास आहे पेटंट मिळविण्याचा. १९५० नंतर अमेरिका आणि युरोपमध्ये ऑर्गनची निर्मिती जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. ही बाळा दातेंसाठी जमेचीच बाजू म्हणायला हवी. ‘एमटीव्ही अनप्लग्ड’ने याची नोंद घेणे म्हणूनच महत्त्वाचे आणि आश्वासक आहे. लवकरच ऑर्गन निर्मितीमध्ये बाळा दाते यांची मक्तेदारी झालेली बघायला मिळाली तर नवल वाटायला नको!
प्रा. कीर्ती आगाशे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा