हॉलीवूड चित्रपटांचे अधिकृत किंवा अनधिकृत रिमेक बॉलीवूडला काही नवीन नाहीत. या रिमेकचे लोण छोटय़ा पडद्यावरही मोठय़ा प्रमाणावर शिरलेले पाहायला मिळते. अगदी ‘जस्सी जैसी कोई नहीं’ पासून सुरुवात केल्यास आतापर्यंत ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’, ‘जिनी और जुजु’, ‘२४’ अशा टीव्हीवरील कित्येक मालिका हॉलीवूडच्या गाजलेल्या मालिकांचे रिमेक आहेत. या यादीमध्ये आता नवीन मालिकेची भर पडली आहे ती म्हणजे ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘लौट आओ त्रिशा’. आपल्या अपहरण झालेल्या मुलीच्या शोधात असलेल्या आईची ही कहाणी स्पॅनिश टेलिकादंबरी ‘दोंदे एस्ता एलिसा?’चा अधिकृत रिमेक आहे. यानिमित्ताने छोटय़ा पडद्यावरील रिमेक्सवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.
* मालिकांचे अधिकृत आणि अनधिकृत रिमेक
टीव्ही मालिका प्रामुख्याने सासू-सून आणि स्वयंपाकघरातील भांडणे या हिट फॉम्र्युल्यामध्ये अडकून पडल्या असल्या तरी कित्येक मालिकांनी या चौकटीबाहेर पडून इतर विषयांना हात लावायचे धाडस केले आहे. त्यासाठी कित्येकदा परदेशात गाजलेल्या मालिकांचे रिमेक करण्याचा प्रयत्नसुद्धा निर्मात्यांनी केला. यामध्ये प्रामुख्याने नोंद करायची झाल्यास ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेचा करता येईल. स्पॅनिश मालिका ‘यो सोय बेटी ला फि’चा रिमेक असलेल्या या मालिकेने रातोरात मोना सिंगला टीव्हीवरचा लाडका चेहरा बनवले होते. ‘प्यार की एक कहानी’, ‘माही वे’, ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या मालिकांच्या कथा हॉलीवूडमधील ‘ट्वाइलाइट’, ‘द डेव्हिड वेअर्स प्रादा’, ‘प्रिंसेस डायरी’ या गाजलेल्या चित्रपटांवर आधारित होत्या. ‘कुछ तो लोग कहेंगे’ ही मालिका तर पाकिस्तानमधील गाजलेली मालिका ‘धुप किनारे’चा रिमेक होता. पण, यातील बहुतेक मालिका या अनधिकृतपणे रिमेक केलेल्या होत्या. अगदी अलीकडची अमिताभ बच्चनची ‘युद्ध’सुद्धा ‘ब्रेकिंग बॅड’चा रिमेक असल्याचे सांगितले जाते. काही मालिकांसाठी मात्र मालिकांच्या निर्मात्यांनी मूळ मालिकेचे अधिकृत हक्क विकत घेतल्याचीही उदाहरणे आहेत. अनिल कपूरने त्याच्या ‘२४’ या मालिकेसाठी मूळ अमेरिकन मालिका ‘२४’चे हक्क विकत घेतले होते. तसेच ‘जिनी और जुजु’ ही मालिकादेखील ‘आय ड्रीम ऑफ जिनी’ची अधिकृत रिमेक होती.
* चाकोरीबाहेरचे पण भारतीय समाजाला भावणारे विषय
‘जस्सी’मधील साधारण चेहरापट्टीच्या मुलीची स्वत:ला सिद्ध करायची धडपड असो, ‘माही वे’मधील लठ्ठ मुलीचा आपल्या स्वप्नातील राजकुमार शोधण्याचा आटापिटा असो किंवा ‘कुछ तो लोग कहेंगे’मधील आपल्यापेक्षा वयाने किती तरी मोठय़ा वयाच्या डॉक्टरशी जुळलेले प्रेम असो. या मालिकांमधून भारतीय प्रेक्षकांना भावतील असा प्रश्नांना हात लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ‘लौट आओ त्रिशा’च्या निमित्ताने मालिकेचा रिमेक करण्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करताना ‘लाइफ ओके’ वाहिनीचे जनरल मॅनेजर अजित ठाकूर यांनी सांगितले, ‘आम्ही वाहिनीसाठी नवीन विषयाच्या शोधात भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक मालिका, कथा-कादंबऱ्यांची उजळणी करतो. चार वर्षांपूर्वी मी मूळ मालिका पाहिली होती. त्यातील आपल्या मुलीला शोधण्यासाठीची एका आईची धडपड हा विषय मला आजच्या काळाशी साधम्र्य साधणारा वाटला. त्यामुळे या मालिकेचा रिमेक करण्याचे आम्ही ठरवले.’
* भारतीय समाजानुसार केलेले आवश्यक बदलभारतात टीव्हीशी जोडला गेलेला प्रेक्षकवर्ग हा विविध स्तरांतील आणि विविध प्रदेशांतील आहे. त्यामुळे मालिका बनवताना मालिकेचा विषय सर्व स्तरांतील प्रेक्षकांना आपलासा वाटेल हे पाहणे निर्मात्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ‘लौट आओ त्रिशा’ ही भारतीय प्रेक्षकांसाठी आत्तापर्यंतची एक बोल्ड टीव्ही मालिका असल्याचा दावा मालिकेचे निर्माते करतात. ‘मालिकेचा मूळ गाभा जरी कुटुंबातील हरवलेल्या मुलीचा शोध घेणे हा असला तरी तपासादरम्यान या कुटुंबातील विस्कटलेल्या कित्येक नात्यांचे पदर या मालिकेतून पाहण्यास मिळतील. प्रत्येक कुटुंबाची अशी काही गुपिते असतात जी कधीही चारचौघांसमोर आणली जात नाहीत. या मालिकेमधून अशाच काही प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे,’ असे अजित यांनी सांगितले. पण, असे असले तरी मुलांचे अपहरण आणि त्यामुळे कुटुंबात उठणारे वादळ ही मांडणी कुठल्याही स्तरातील प्रेक्षकांना आपलीशी वाटू शकते. त्यामुळे मालिकेत उच्चभ्रू कुटुंब दाखवले असले तरी सामान्य घरातील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून मालिका तयार करण्यात आली आहे. म्हणूनच मूळ स्पॅनिश मालिके तील काही भागांमध्ये आवश्यक बदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
* मूळ मालिका आणि रिमेक मालिकेची लांबी
बहुतेक परदेशी मालिका मर्यादित भागांच्या असतात, पण ‘जस्सी’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘प्यार की कहानी’सारख्या
मालिकांच्या बाबतीत निर्मात्यांना आपल्या मालिका लांबवण्याचा मोह आवरता आला नाही. अलीकडच्या काळात बॉलीवूडची नामवंत स्टारकास्ट असलेली ‘२४’ मालिका मात्र, अनिल कपूरने २४ भागांमध्येच संपवली होती. ‘लौट आओ त्रिशा’ ही मालिका २००-२५० भागांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा आमचा मानस असल्याचे, अजित यांनी या वेळी सांगितले. मुळात मालिका त्रिशाला शोधण्याबाबत आहे. त्यामुळे जेव्हा तिची खबर लागेल तेव्हा साहजिकच मालिका संपेल. मूळ मालिका एक तासाच्या हिशोबाने १०० भागांमध्ये दाखवली गेली होती. आमची मालिका अध्र्या तासासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
* काल्पनिक आणि रिअॅलिटी शोचे रिमेक
रिमेकच्या या स्पर्धेत काल्पनिक आणि रिअॅलिटी शोसुद्धा मागे नाहीत. सध्या गाजत असलेला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो ‘द कुमार्स अॅट नंबर ४२’वर आधारित असल्याचे म्हटले जाते. तर, ‘हु वॉन्ट टु बी मिलेनिअर’, ‘डान्स्िंाग विथ स्टार्स’, ‘ब्रिटिश गॉट टॅलेंट’ यांवर आधारित ‘कौन बनेगा करोडपती’, ‘झलक दिखला जा’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे रिअॅलिटी शोसुद्धा आपल्याकडे बरेच गाजले आहेत. असे असले तरी यापैकी प्रेक्षकांच्या पसंतीस पोहोचलेल्या मालिकांची संख्या हातावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे सध्या तरी नेहमीच्या चाकोरीच्या विषयांबाहेर पडून प्रेक्षकांच्या पसंतीचा अंदाज घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयोगांपैकी हाही एक प्रयोग आहे, असे म्हणावे लागेल. प्रेक्षकांना हे प्रयोग पसंत पडले तर भविष्यात अजून विविध विषयांवरच्या परदेशी मालिकांचे रिमेक टीव्हीवर पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.