भारताचे डॉ. एल. सुब्रमण्यम यांचा सन्मान करण्यासाठी बकिंगहम पॅलेस मध्ये राणी एलिझाबेथ २ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. बकिंगहम पॅलेसमध्ये झालेल्या भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रमात कमल हसन यांनी हजेरी लावली होती. दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील सांस्कृतिक बंध आणखीन दृढ करण्यासाठी २०१७ या वर्षात, डॉ. एल. सुब्रमण्यम काही प्रसिद्ध व्यक्तिंमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारा नामांकित केले गेले होते. इंग्लंडच्या बकिंगहम पॅलेसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या मुलाने म्हणजेच अंबी सुब्रमण्यमने सांगितले की ‘माझे वडिल डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी त्यांची कला सादर केली. सुब्रमण्यम यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी त्यांची कला सादर केली होती.’ सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या नावाची निवड केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
नुकताच इंग्लंडच्या बकिंगहम पॅलेसमध्ये राणी एलिझाबेथ २ यांनी भारत-इंग्लंड सांस्कृतिक कार्यक्रम २०१७ चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला राजकारण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले दिग्गज उपस्थित होते. क्रीडा जगतातून कपिल देव, फॅशन डिझायनर मनीष अरोरा आणि मनीष मल्होत्रा, गायक-अभिनेता गुरदास मान आणि सितार वादक अनुष्का शंकर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. यंदाचे हे वर्ष भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. या वर्षी या दोन्ही देशातील इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाची देवाणघेवाण होणार आहे. २०१५ मध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारताच्या स्वातंत्र्याची ७० वर्षे साजरी करण्यासाठी या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली होती.