गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पावटॉलॉजी’ म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्न चित्रपटाच्या शीर्षकावरून पडणे साहाजिकच आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ११ एप्रिल रोजी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्याोत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या आगामी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी या दिग्दर्शक जोडगोळीने सांभाळली आहे. नुकतेच पुण्यामध्ये चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पार्थ भालेराव, अपूर्वा चौधरी, देवेंद्र गायकवाड, दीप्ती देवी, हरीश थोरात यांच्यासह दिग्दर्शकद्वयी आणि निर्माते उपस्थित होते.

या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी हे दोन दिग्गज अभिनेते प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार कलाकारांची फौज चित्रपटात आहे.