निलेश अडसूळ
ज्यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे त्यांचा अभिनयाचा किंवा कला क्षेत्राचा प्रवास काहीसा मार्गदर्शनपर आणि पूर्वनियोजित असतो. परंतु काही अशीही मंडळी असतात ज्यांच्या वाटा अगदी उनाड वाटेने धावत असतात, त्यापैकीच एक म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने घरघरात पोहोचलेला आशुतोष गोखले.
मालिकांमधून लहान-मोठय़ा भूमिका साकारत मुख्य भूमिकेपर्यंतचा प्रवास करणारा आशुतोष सांगतो, आजोबा लेखक होते आणि वडील अभिनय क्षेत्रात काम करत असल्याने घरातील वातावरण कलासक्त असण्यासाठी पोषक होते. शाळेत असताना विविध स्पर्धामधून याला सुरुवात झाली आणि अनेक स्पर्धा जिंकल्याही, परंतु लोकांकडून होणारं कौतुक मला आवडेनासं झालं. मग शाळेतल्या स्पर्धाना मी पूर्णविराम दिला. पण याच वेळी शिवाजी पार्कातल्या क्रिकेटने मला भुरळ घातली आणि क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. तो अगदी अंडर १९ च्या सामन्यांपर्यंत सुरू होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतरही हे वेड कायम होते. पण माझा आतेभाऊ म्हणजेच दिग्दर्शक अद्वैत दादरकर तेव्हा व्यावसायिक नाटक दिग्दर्शित करत होतो. त्यानिमित्ताने त्याचं नाटक पाहायला म्हणून मी पुन्हा एकदा नाटकाकडे वळलो. त्या क्षणी आपण पुन्हा एकदा नाटकाचा विचार करायला हवा अशी भावना मनात आली, पण ती तेवढय़ापुरतीच होती. पुढे कॉलेजमध्ये असताना मला दुखापत झाली आणि क्रिकेट थांबवावं लागलं. तेव्हा मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांला होतो. अशातच एकदा महाविद्यालयात जात असताना प्रांगणात आयएनटीसाठी ऑडिशन असल्याची पाटी वाचली आणि रुपारेलसारख्या कॉलेजमध्ये येऊन आपण नाटक नाही केलं तर काय केलं, याचा विचार येऊ लागला. माझ्या या विचारांना आईनेही हसून खतपाणी घातले आणि रुपारेलच्या नाटकमंडळींमध्ये माझे पहिले पाऊल पडले. त्याच वर्षी कॉलेजने युवा महोत्सव आणि एकांकिका स्पर्धासाठी पाच एकांकिका बसवल्या. सुदैवाने त्या पाचही एकांकिकांमध्ये मला सहभागी होता आले. मग एकांकिकेत इतका वाहवत गेलो की त्या वर्षी मी नापास झालो असेही आशुतोष सांगतो.
शाळेतील स्पर्धामुळे अभिनयची पायाभरणी आधीच झाली होती, पण एकांकिकेच्या रूपाने त्याचे पुनरुज्जीवन झाले. पुढे विविध नाटय़ संस्थांमधून प्रायोगिक नाटक करू लागलो आणि आता आपल्याला हेच व्यवसाय म्हणून करायचे आहे हे निश्चित केले, असेही तो सांगतो. एका स्पर्धेला आनंद म्हसवेकर परीक्षक म्हणून उपस्थित होते. तिथेच त्यांनी मला त्यांच्या व्यावसायिक नाटकासाठी विचारलं आणि ‘दुधावरची साय’ या नाटकाने माझे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झाले. पण भारत जाधव यांच्या ‘मोरूची मावशी’ या व्यावसायिक नाटकाने मला खरी ओळख मिळवून दिली. यात मला मोरूची भूमिका करण्याची संधी मिळाली. इथेच खरं नाटक जागल्याचा अनुभव आला. नाटकाचे दौरे, प्रयोगांमागून प्रयोग, भरत दादाकडून घेतलेले नाटकाचे धडे या सगळ्यांनी अभिनयाची शिदोरी अधिकच परिपूर्ण होती. त्यामुळे मोरूची मावशी हे अभिनयाच्या प्रवासाला दिशा देणारे नाटक होते असे आशुतोष सांगतो.
नाटक करतानाच मग दुसऱ्या बाजूला ऑडिशन देणं सुरू होतं. पण गमतीचा भाग म्हणजे मी आजवर ज्या ज्या मालिकांसाठी ऑडिशन दिली तिथे माझी कधीच निवड झाली नाही. मला मिळालेल्या मालिकांमध्ये मला थेट बोलावणं आलं. झी मराठीची ‘तुझं माझं ब्रेकअप’, कलर्स मराठीची ‘तुझ्या वाचून करमेना’ अशा मालिकांमधून माझी तोंडओळख झाली. पण ‘तुला पाहते रे’ या मालिकेने खऱ्या अर्थाने ओळख प्राप्त झाली. या मालिकेदरम्यान घडलेला किस्सा सांगताना आशुतोष म्हणतो, मी एरव्ही मित्रांमध्ये स्वच्छंदीपणे बागडत असतो. असंच एकदा मित्रांसोबत फिरत असताना बाजूने एक लहान मुलगी गेली आणि आपल्या आईबाबांकडे पाहून म्हणाली ‘ये आई हा बघ, तुला पाहते रे मधला वेडा.’ पुढे तो म्हणतो, लोक आपल्याला ओळखू लागले की आपण शहाण्यासारखं वागायचं असतं याची प्रचीती त्या दिवशी आली.
ऑडिशन देत असताना, छोटय़ा-मोठय़ा भूमिका करताना अचानक अशी प्रमुख भूमिका वाटय़ाला येणं ही कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाची संधी असते. म्हणून स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेसाठी निर्मात्यांनी मला विचारलं तेव्हा मी क्षणात होकार कळवला. असे सांगतानाच तो प्रमुख भूमिकेचे महत्त्व विशद करतो. त्याच्या मते, प्रमुख भूमिका ही केवळ प्रसिद्धीची बाब नसून ती जबाबदारी आहे. साहाय्यक भूमिका साकारताना तितकी जोखीम आपल्यावर नसत,े पण प्रमुख भूमिका लोकांना आवडून त्यांनी आपला स्वीकार केला तर मालिका तग धरते. कोणतीही मालिका ही सांघिक बळावर टिकून असली तरी प्रमुख भूमिकेचं दडपण हे असतंच आणि ते दडपण असायलाच हवं. कारण आपल्याला सगळं जमायला लागलं ही भावना मनात येता कामा नये. पात्राचा शोध हा सतत सुरूच राहायला हवा जो आजही माझा सुरूच आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून ‘काळ्या-सावळ्या’ वर्णावरून भेद करणाऱ्यांना उत्तम चपराक मारली आहे. या मालिकेत दीपा-कार्तिक या दोघांची ही गोष्ट आहे. कार्तिक एका ‘काळा’ रंग असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्याच्या आईचा मात्र काळ्या रंगाला विरोध असतो. अशा कुत्सित विचारांच्या माणसांची मानसिकता बदलू पाहणारी ही मालिका सध्या लोकांवर प्रभाव टाकत आहे. ‘एका गोऱ्या मुलीने लग्नासाठी सावळा मुलगा नको अशी समज करून घेतली होती, परंतु मालिका पाहून तिने आपले विचार बदलले आणि ज्या मुलाला सावळेपणामुळे नाकारलं होतं त्याच मुलाशी तिने लग्न केल्याचा अनुभव अशुतोष सांगतो.’ तर पुढे तो म्हणतो, हा केवळ विचार मालिकेपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. अनेकदा कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आणि मालिकेत दाखवलेला विचार यांचा प्रत्यक्षात संबंध नसतो. परंतु या मालिकेतून दिलेला संदेश कलाकारांनीच नाही तर प्रत्येक माणसाने आचरणात आणायला हवा.
तर प्रसिद्धीविषयी आशुतोष सांगतो, कलाकरांना प्रसिद्धी ही हवीच असते. अनेकदा टीव्हीतून दिसणारे कलाकार समोर आल्यांनतर सामान्य प्रेक्षकांचे भान हरपून जातं, आणि ते स्थळाकाळाचं भान न बाळगता कलाकारांसोबत फोटोची मागणी करतात. कधीतरी कलाकार त्या मानसिकतेत नसल्याने त्यांना याचा त्रास होणे स्वाभाविक आहे. पण आपणच आपल्या चाहत्यांना समजून घ्यायला हवे. कारण तेच आपल्याला डोक्यावर घेतात आणि जमिनीवर आणण्याचीही क्षमता त्यांच्यात असते.
दादरचा जन्म असलेल्या आशुतोषचे आणि शिवाजी पार्काचे नाते काही और आहे. तो म्हणतो, बाळासाहेबांच्या सभेपासून ते ब्रेकअपच्या गप्पांपर्यंत सर्व काही इथेच अनुभवलं. आयुष्यातल्या अनेक घडामोडींचा साक्षीदार हे शिवाजी पार्क आहे. इथेच मी क्रिकेट खेळलो, इथेच कॉलेजच्या मैफली केल्या. पैसे नसताना हाच कट्टा होता आणि पैसे आल्यांनतरही हाच कट्टा कायम आहे. म्हणून हे केवळ शिवाजी पार्क नाही तर जीवनातला एक भावनिक कोपरा आहे, असे तो सांगतो.
ऑडिशन गरजेचीच
कोणत्याही क्षेत्रात काम करताना तुमचं शिक्षण पाहिलं जातं, पण अभिनयाला अशी कुठल्याच शिक्षणाची चौकट नाही. त्यामुळे अनेकांना आपण या क्षेत्रात यावं असं वाटतं. परंतु हे तितकं सोपं नाही. या प्रक्रियेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडिशन. तिथे तुमचा खरा कस लागतो. ऑडिशन ही योग्यता ठरवण्याचं उत्तम साधन आहे, कारण शंभरातून आपली निवड होताना, आपण नेमके कुठे आहोत याची आपल्याला जाणीव होते.
-आशुतोष गोखले