ईद-उल-अझहाच्या सणानिमित्त ‘कुर्बानी’ (प्राण्यांचा बळी देणे) च्या प्रथेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रमझानच्याच महिन्यात ढाका येथे झालेल्या हल्ल्यावर अभिनेता इरफान खानने दुःख व्यक्त केले आहे. ढाका येथील रेस्टॉरन्टमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात तब्बल २० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
अभिनेता इरफान खानने आज सोशल मिडीयाद्वारे ढाका हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले. त्याचसोबत इस्लामच्या नावाखाली  अशी दुष्कृत्ये करणा-यांबाबत मुस्लिमान समाज निःशब्द का आहे? असा सवालही इरफानने केला आहे. रमझान सुरु होताच कोणत्या कारणामुळे निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे हेच कळत नाहीए. घटना एके ठिकाणी घडते, पण त्यामुळे इस्लाम आणि जगभरातील मुसलमान बदनाम होतो. दया, क्षमा आणि शांती हा इस्लामचा पाया आहे. असे असताना मुसलमान गप्प बसून आपल्या धर्माला बदनाम होऊ देणार का? उलट त्यांनी स्वतःच इस्लामचा खरा अर्थ समजून तो इतरांनाही समजवायला हवा. अत्याचार आणि निष्पापांची हत्या करणे हे इस्लाम होत नाही, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.